Tuesday, November 27, 2012

माया [माझी माय]


ती माया आहे 
नाव सार्थ करणारी
अमाप माया देणारी, निखळ, निर्व्याज प्रेम देणारी 
भावंडंलेकरंभाचरं, मैत्रिणीशेजार-पाजार,

झाडं,फुलंपाखरंमुकी जनावरं 
सगळ्यांना आपल्या मायेनं जिंकणारी 
प्रेमाच्याआपुलकीच्या धाग्यात बांधणारी 
माया 
ती सरोजही आहे 
लोभमोहद्वेषअसूयामत्सरआसक्ती 
भांडणंहेवेदावे यांनी भरलेल्या जगाच्या कर्दमात उमलूनही
या साऱ्यांपासून पूर्णपणे अलिप्त असलेली,
निर्मळ, सोज्वळ, सात्विक, धार्मिक
अगदी विपरीत परिस्थितीत सुद्धा हसतमुखानं फुलणारी
आणि आपल्या अस्तित्वाचा मंद सुगंध उधळत
सभोवतालचा आसमंत प्रफुल्लित करणारी
सरोज

आणि ती वसुधा सुद्धा आहे
क्षमाशील, सोशिक, प्रेमळ,
सगळ्यांचे सगळे अपराध पोटात घालणारी,
कटू अनुभवांचे, संकटांचे, वेदनांचे ज्वालामुखी
खोलवर दडपून
रसिकतेनं, आशेचे, आनंदाचे, समाधानाचे अंकुर रुजवत
समृध्दीची, उल्हासाची, चैतन्याची बाग फुलवणारी
वसुधा

माथ्यावरच्या तिच्या सावलीचं छत्र हेच आमचं पूर्वसंचित!
जिच्या ऋणात राहणंही भाग्याचं,
जिच्या एकेका रूपाची, एकेका गुणाची
गाथा-पोथी व्हावी
अशा आईची किती, कशी महती गावी?
एकच मागणं देवाच्या चरणी,
जन्मोजन्मी हीच माउली आम्हाला लाभावी!

प्रकाशमान


काळ्या, खिन्न, उदास, कातर किती अंधारलेल्या दिशा 
काळोखात दडून व्याकुळ उभी धास्तावलेली निशा 
येती सांद्र वनात दाट गहिऱ्या अदृष्टशा सावल्या,
जीवाला छळती भयावह स्मृती अतृप्त, वेड्यापिशा

कोणी बालक खेळणे भिरकवी जे आवडीचे नसे 
वा कोणी कचरा पुरा झटकुनी कोन्यात लावीतसे
किंवा जीर्ण, विदीर्ण वस्त्र मळके टाकून देई कुणी 
डोळ्यांदेखत दैव ओढुन मला गर्तेत फेकी तसे 

जावा झाकुन चंद्र मेघवलयी, मीही तशी राहिले 
अत्याचार अनंत सोसुन किती आघातही साहिले 
वक्रोक्ती, उपहास, व्यंग, कटुता, आरोप अन् वंचना 
यांनी मूढ, उदास होउन जरी या जीवना पाहिले 

झाला आज प्रकाशमान पथ हा, अंधार गेला लया 
जन्मापासुन जे मनात वसले, मी त्यागिले त्या भया 

[मराठी कविता समूहाच्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित]

Sunday, November 25, 2012

द्विधा

राजा रविवर्मा यांच्या एका सुंदर चित्रावरून सुचलेली ही कविता ..... [हे चित्र माझी लाडकी मैत्रीण माधवी भट हिच्याकडून मिळालंय]

आहे मनात काही, सांगू कसे सख्या रे 
ही भेट चोरटी अन् माझी स्थिती द्विधा रे 

कुरवाळुनी फुलाला बघते पुन्हा पुन्हा मी
जे अंतरात येते दावू कसे तुला मी?
नयनांत लाज वेडी, पाहू कशी तुला रे?

तू मात्र न्याहळीसी, लवते न पापणीही
एकांत हा अनोखा, भवताल ना कुणीही
मन बावरे तरीही बुजते जरा जरा रे

पाहील का कुणी ही भीती मनात दाटे,
क्षणसंग या घडीला फुटतील लाख फाटे
वाटे तरी हवासा सहवास हा तुझा रे 

Saturday, November 17, 2012

फाईल

एक भली मोठी फाईल गहाळ झालीय म्हणे.
त्याच्या मृत्युपत्राची.
त्याचं मृत्युपत्र? आणि तेही भलीमोठी फाईल होण्यासारखं? खरंच असेल हे?
तो तर एक भणंग कवी, आत्ममग्न, मनस्वी, एकटा, अगदी एकटा. 
आपल्याच धुंदीत जगणारा, मस्तमौला. 
एकटा असला तरी एकाकी नसलेला.
मातीच्या कुशीत लोळत आकाशातल्या ताऱ्यांशी गुजगोष्टी करणारा.
किनाऱ्यावरच्या कातळावर रेलून ओहोटीच्या लाटांशी अंताक्षरी खेळणारा.
फुलांच्या कानांत भुंग्याची चोरटी गुपितं सांगणारा.
अवखळ बालकानं साबणाच्या फेसाचे फुगे बनवून 
आपल्याच नादात उडवत जावेत, तसे 
भावनांच्या द्रावणात स्वप्नांची नळी बुचकळून 
हलकीशी फुंकर घालत तरल, हळुवार, सुंदर कवितांचे 
सप्तरंगी फुगे उडवत जाणारा. 
नजरा खिळवून ठेवणारे लहानमोठे असंख्य फुगे!

अंगानं अन् खिशानंही फाटका,
पण प्रतिभेची अचाट, अफाट श्रीमंती लाभलेला तो कवी. 
पायांखालची जमीन जराही हलू न देता आभाळाहून उंच झालेला.
काय लिहिलं असेल त्यानं आपल्या मृत्युपत्रात?
त्याच्या मोहिनी मंत्रानं भारलेल्या कवितांची मालकी? 
कुणाला दिली असेल?
त्याच्या अमोघ, अद्वितीय प्रतिभेचा वारसाहक्क?
कुणाच्या नावे केला असेल तो?
कुणाला सांगितला असेल त्याच्या अनन्यसाधारण शब्दसंपदेचा ठावठिकाणा?
त्याच्या अमर्याद, उत्कट प्रतिमांच्या खजिन्याची किल्ली 
कुणाच्या वाट्याला आली असेल?
हेच सारं असेल त्यात की आणखी काही असेल?

की मृत्युपत्र नसेलच त्या फाइलमध्ये? 
इतरच काही असेल त्यानं लिहिलेलं?
त्याच्या ऋतूंशी रंगलेल्या कानगोष्टींची टाचणं,
रात्र-रात्र चंद्राशी चालणाऱ्या गजालींची टिपणं, 
माणसातला माणूस शोधताना त्यानं गोळा केलेले पुरावे, 
त्याच्या दिव्यत्वाशी होणाऱ्या गाठीभेटींचे व्यापक संदर्भ,
की असेल त्याची आणखी एखादी अलौकिक दीर्घ कविता,
त्या जगाच्या गूढ वाटेवर निघता निघता सुचलेली?
असलीच, तर कशी असेल ती? 
तरल, आर्त, व्याकुळ, हळवी, उदात्त, विलक्षण, अभूतपूर्व,
जी वाचून वाटावं की बस! इथून पुढे काहीही वाचायचं नाही! 
[तशा त्याच्या सगळ्याच कविता अशा विस्मयचकित करणाऱ्या, जागीच खिळवून ठेवणाऱ्या असतात.]

तर मृत्युपत्र, की त्याच्याच काही खास गोपनीय गोष्टी की कविता?
काय असेल त्या फाईलीत? शोध घ्यायलाच हवा!
खरंच गहाळ झाली असेल ती? कशी, कुठं, कधी?
कुणी घेतली असेल? कशासाठी?
की त्यानंच नेली असेल कुणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून? 
आता तर ती फाईल मिळायलाच हवी आहे!
मग त्यासाठी तो गेला, त्याच वाटेनं जावं लागलं तरी चालेल,
ती फाईल शोधणं आवश्यक आहे! 

अलख

हा अलख कुणा जोग्याचा
ही गहन कुणाची वाणी
प्राणांच्या कंठी रुजली
संध्यापर्वाची गाणी

झाकोळुन नभ गंगेच्या
पाण्यात उतरले थोडे
क्षितिजाच्या पार निघाले
अन् सूर्यरथाचे घोडे

या मूक उदास जलावर
धूसर वलये वाटोळी
रेखाटत बसली कुठल्या
कवितेच्या अनवट ओळी?

ज्या सांद्र वनातुन घुमले
अस्वस्थ क्षणांचे पावे
ते वन सोडून निघाले
अज्ञात दिशेला रावे

ढळत्या सांजेच्या पदरी
अस्फुटसा लुकलुक तारा
परतून चालला जोगी
अन् अलख घुमवितो वारा

 [मिसळपाव.कॉम या संकेतस्थळाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली माझी कविता]

Monday, November 12, 2012

अलिप्त

पानावरच्या दवबिंदूपरि अलिप्त मी
माझ्यातच असुनी माझ्यातुन विभक्त मी

तृप्तीनेही तृषा न भागे कधी कधी
अतृप्तीच्या काठावर शांत, तृप्त मी

आहे तरिही नाही माझी अशी स्थिती,
आसक्तीची वस्त्रे लेवुन विरक्त मी

जातानाचे संचित हाती न मावते,
येताना परि आलेली रिक्तहस्त मी

धन्यवाद ईश्वरा तुला द्यायचे कसे?
बंधांचे ऋण असूनही बंधमुक्त मी

Wednesday, November 7, 2012

मुक्तछंद


गुन्हा मी न केला, तरी घेरती व्यर्थ दावे किती 
विरोधात माझ्या उभे ठाकले हे पुरावे किती

धडे जीवनाने कितीदा दिले, जाण नाही दिली,
कुठे थांबवावे, कधी संपवावे, जगावे किती ?

निराळ्या दिशेच्या नव्या गूढ वाटा मला लाभल्या,
कळेना खऱ्या त्यातल्या कोणत्या अन् भुलावे किती

किती वेगळाल्या रिती-पद्धतींनी करू मांडणी ?
उरे शून्य हाती, सुखाला सुखाने गुणावे किती ?

पुन्हा तेच ते प्रश्न अन् उत्तरांच्या चुका त्याच त्या,
यथायोग्य जे, तेच सांगायला मी शिकावे किती?

असावे जरासे जिणे मोकळे मुक्तछंदापरी,
सदा वृत्त, मात्रांत, खंडांत त्याला चिणावे किती ?

Tuesday, November 6, 2012

माझ्या ठायी

यावेळी अनुवादासाठी आकृष्ट करून गेली कृष्णबिहारी 'नूर' यांची एक सुंदर गझल.

आग, जल, हवा, माती सारे माझ्या ठायी 
तरी मानणे देवहि आहे माझ्या ठायी

माझ्यातुन वगळून मला माझ्यात दडे जो,
आता केवळ तो सामावे माझ्या ठायी

तळमळणाऱ्या अपुऱ्या इच्छांपरी विखुरलो,
काय शोधतो तो केव्हाचे माझ्या ठायी ?

वसंत, वर्षा, शिशिर, ग्रीष्म, हेमंत, शरद मी 
सध्या कुठला ऋतू न जाणे, माझ्या ठायी !

काय असे मी, दर्पण केवळ हेच सांगते 
का न दाखवी जे जे आहे माझ्या ठायी ?

'नूर' जीव हा देणे केवळ बाकी आहे, 
प्रेम किती तुज कसे कळावे माझ्या ठायी ?


आणि ही मूळ रचना

आग है, पानी है, मिट्टी है, हवा है, मुझ में| 
और फिर मानना पड़ता है के ख़ुदा है मुझ में| 

अब तो ले-दे के वही शख़्स बचा है मुझ में,
मुझ को मुझ से जुदा कर के जो छुपा है मुझ में| 

मेरा ये हाल उभरती हुई तमन्ना जैसे, 
वो बड़ी देर से कुछ ढूंढ रहा है मुझ में|

जितने मौसम हैं सब जैसे कहीं मिल जायें, 
इन दिनों कैसे बताऊँ जो फ़ज़ा है मुझ में| 

आईना ये तो बताता है के मैं क्या हूँ लेकिन, 
आईना इस पे है ख़मोश के क्या है मुझ में| 

अब तो बस जान ही देने की है बारी ऐ "नूर", 
मैं कहाँ तक करूँ साबित के वफ़ा है मुझ में| 

__कृष्ण बिहारी 'नूर'