Wednesday, May 26, 2010

तुझ्या रूपातले राग

काही तालात, सुरात, काही लयीत चुकले
तुझ्या रूपातले राग मनापासून शिकले

रात्री जागवल्या मालकौंस, बागेसरी गात
आर्त विराण्या गाइल्या जोगियाच्या प्रहरात
भल्या पहाटेला भैरवाच्या चरणी झुकले

काळजात कोमेजले मुक्या कळ्यांचे नि:श्वास
तरि ग्रीष्मकहराचा नाही केला रे दुस्वास
सारंगाच्या सुरांत या वेड्या जिवाला जपले

मल्हाराच्या लडिवाळ, मृदू सरी श्रावणात,
आळविले केदाराचे सूर संध्यावंदनात
तुला भूपात गाताना मीच मला हरवले

अखेरच्या मैफलीत विठू लाज माझी राख
ऐक प्राणांतून घुमणारी भैरवीची हाक
दयाघना, भेट आता; आळवून मी थकले

Wednesday, May 19, 2010

गोष्टी तुझ्या

हा माझा अनुवादाचा आणखी एक प्रयत्न. अर्थातच अनुवादात बर्‍याच मर्यादा आहेत, काही ठिकाणी तो भावानुवाद न होता केवळ शब्दशः अनुवाद झाला आहे, मूळ काव्यातल्या कल्पनांची चमक तितक्या ताकदीनं उतरवता आली नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. तरीही एक प्रामाणिक प्रयत्न केलाय. गझल क़मर जलालवी यांची  "कभी कहा न किसीसे" छंद वेगळा [२४ मात्रा]

नाही कधीच कथिल्या गोष्टी तुझ्या कुणाला
कळली कशी न ठावे वार्ता उभ्या जगाला!

कित्येक पद्धतींनी घरट्यास बांधले मी,
बागेत वीज तरिही सोडे कधी न त्याला

तू मैफलीत परक्या जाणार नाहि, कळले
म्हणशील तर सजवितो या दीन कोटराला!

वर मागताच बहराचा, बाग अशी फुलली,
जागा जरा न उरली माझ्या इथे घराला

बागेत आज जा तू परि ध्यानि ठेव व्याधा,
सोडून एकटे मी आलो तिथे घराला

जळती पतंग माझ्या कबरीवरी फुका हे,
लावू नका दिवा हो, विनवीत आपणाला!

फिरवून पाठ जाती, देऊन मूठमाती,
अवधीत क्षणांच्या होई काय हे जगाला?

होईल यात कधिही उल्लेख तुझा आता,
तू सांग, कहाणी ती संपेल या क्षणाला

बदनाम व्हायची ना भीती तुला जराही?
भर चांदण्यात सखिला समजावया निघाला!

आणि ही मूळ गझल ::::::::

कभी कहा न किसी से तेरे फंसाने को
न जाने कैसे ख़बर हो गई जमाने को

चमन में बर्क़ नहीं छोडती किसी सूरत,
तरह तरह से बनाता हूं आशियाने को

सुना है गैरों की महफिल में तुम न जाओगे,
कहो तो आज सजा लूं ग़रीबखाने को

दुआ बहार की मांगी तो इतने फूल खिले,
कहीं जगह न रही मेरे आशियाने को

चमन में जाना तो सय्याद देखकर जाना,
अकेला छोडके आया हूं आशियाने को

मेरी लहड़ पे पतंगों का खून होता है,
हुजूर शम्मा न लाया करें जलाने को

दबा के कब्र में सब चल दिए, दुआ न सलाम,
जरासी देर में क्या हो गया ज़माने को?

अब आगे इसमें तुम्हारा भी नाम आएगा,
जो हुक्म हो तो यहीं छोड दूं फंसाने को!

क़मर, जरा भी नहीं तुझको खौफ़-ए-रुसवाई,
चले हो चांदनी शब में उन्हें मनाने को!

Saturday, May 15, 2010

सजा

उदासी नसे, मौन हे बोलते
खुशाली विचारी मला रोज ते!

दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते

धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!

अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना,
कसे पुण्य अन् पाप ते कोणते?

पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी,
न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!

Friday, May 14, 2010

अबोल प्रीत

जाणते अबोल प्रीत, आर्जवे मनात किती
रंगते सुरेल गीत, स्पर्श बोलतात किती!

मन चंचल फुलपंखी भिरभिरते तुजभवती
स्मरणरंग भरुन तुझे चित्र रेखिते नवती
तेज चांदण्यास नवे, चंद्रही भरात किती!

रुणझुणत्या स्वप्नांचे हिंदोळे झुलवित ये
मंद मदिर समिरासह चैत्रबहर फुलवित ये
संग क्षणांचा भरतो रंग जीवनात किती!

अधरांच्या उंब-यात नाव तुझे का अडते?
अधिर गूज थरथरत्या पापण्यांत का दडते?
लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती!

Wednesday, May 12, 2010

तृषार्त


राहु दे मला तृषार्त, राहु दे मला अतृप्त
बंधनात राहुनही मन माझे बंधमुक्त

गूज मनाचे मनास मौनातुन उलगडले
शब्दावाचून भाव शब्दांच्या पलिकडले
ओळखले नजरेने, जरि अबोल अन अव्यक्त

ते हळवे, तरल स्पर्श सांगुन गेले सारे
ओठ बोलले न तरी बोलुन गेले सारे
आगळेच प्रेमगीत गुणगुणते अधिर चित्त

नवलाचे क्षण अलगद अंतरात साठवु दे
ते फुलणे, ते खुलणे, ती हुरहुर आठवु दे
चिंतनात अविरत मी, आणि तुझा ध्यास फक्त 

स्वप्नापरि जे घडले ते अभंग राहू दे 
झुरण्यातच विरण्याचे सौख्य मला साहू दे
ओलांडून मोहाचे उंबरठे, मी विरक्त!

Friday, May 7, 2010

नवे गीत

ओल्या जखमेमधून नवे गीत पाझरावे
कोसळते घर जसे वादळाने सावरावे

वेदनेच्या पाळण्यात खुळे स्वप्न जोजवावे,
व्यथा ठेवावी उशाशी आणि दु:ख पांघरावे

मृगजळापाठी धावताना तोल सांभाळावा,
सावल्यांशी खेळताना देहभान विसरावे

बेफाम जगावे, जशी वाहे पुरातली नदी,
ओहोटीच्या दर्यापरी हळुवार ओसरावे

कोण आता इथे ज्याला आस तुझ्या प्रकाशाची?
काजळी कलंक माथी मिरवीत का उरावे?