Thursday, March 31, 2011

गझल

पुन्हा काल स्वप्नात आली गझल
खुले पापणी अन् उडाली गझल


कशी कोरडी मी, जरी वाहते
तुझ्या आठवांच्या पखाली गझल?


नसे वेगळे रूप माझे-तिचे,
मला वारशाने मिळाली गझल


"जरा एकटे वाटते, शब्द दे
तुझे सोबतीला" म्हणाली गझल


जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये,
क्षणार्धात माझीच झाली गझल!


नको या प्रवासात थांबा कुठे,
सवे आज माझ्या निघाली गझल

Sunday, March 27, 2011

एक वेळ येईल


"बस चंद करोडों सालों में" या गुलजार यांच्या कवितेचा स्वैर भावानुवाद.

एक वेळ येईल की सूर्य जाईल विझून,
थंड राख त्याची आणि दूर जाईल उडून
चंद्र ना ढळेल आणि धरती ना उजळेल,
विझल्या निखार्‍यापरी गारठून भटकेल
धूसरशा, मळकट प्रकाशात दिशाहीन

अशा वेळी कवितेचा कागद एखादा जरी
उडून पडेल विझलेल्या सूर्यावर, तरी
मला वाटतं, पुन्हा तो नक्की उठेल पेटून!

आणि ही मूळ कविता: बस चंद करोड़ों सालों में....
कवी: गुलजार

बस चंद करोडों सालों में
सूरज कि आग बुझेगी जब
और राख उडेगी सूरज से
जब कोई चाँद न डूबेगा
और कोई ज़मीं न उभरेगी
तब ठंडा बुझा इक कोयला सा टुकड़ा यह जमीं का
घूमेगा भटका भटका
मद्धम खाकीस्तरी रोशनी में

मैं सोचता हूँ उस वक़्त अगर
कागज़ पे लिखी इक नज़्म कहीं उडते उडते सूरज में गिरे
तो सूरज फिर से जलने लगे!!

Wednesday, March 23, 2011

व्यापार

केला सुखाचा व्यापार
दु:ख झाले, तोटा झाला
झोळीभर पश्चाताप,
खरा दाम खोटा झाला !

देवा, जगणं रुचंना
काय करावं सुचंना
भल्या सुपीक डोक्याचा
नर्मदेचा गोटा झाला !

तोंडावर लाडीगोडी
पाठ फिरताच खोडी
असे ग्राहक भेटले,
ठकसेन छोटा झाला !

जमा अक्कलखात्यात,
तुझी सावकारी त्यात
हात बुद्धीचे गहाण,
उभा जन्म थोटा झाला !

कधी केली ना लाचारी,
आज देणेकरी दारी
ऐकती ना विनवण्या
गोंधळ वांझोटा झाला !

खुळ्या मनाचं ऐकून
दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला !

Monday, March 21, 2011

प्रेम नावाचा म्हातारा


कवि माणिक वर्मा यांच्या "आँसू भीगी मुस्कानों से हर चेहरे को तकता है" या हिंदी गझलचा हा स्वैर भावानुवाद. तो शक्य तितका मूळ कवितेच्या आशयाला जपणारा असावा, या दृष्टीनं बाह्यरंग बदललं आहे, माझ्या परीनं मूळ काव्याचं सौंदर्य जपण्याचा, तोच अर्थ आणि आशय गीतरूपात मांडायचा प्रयत्न केला आहे. बाकी मग "रसिक देवो भव!"


डोळा पाणी, गळा गाणी, हासून सार्‍यांना पाही
प्रेम नावाचा म्हातारा बरळतो काहीबाही !

ओंजळीत सांभाळतो आठवांच्या काजव्यांना
ओझ्यापरी बोचक्यात नेतो वाहून स्वप्नांना
श्वासागणिक कुणाचे नाव क्षणोक्षणी घेई?

इवलासा देह याचा, फक्त अडीच अक्षरी
अंतरंग पहा, जसं सोनं शंभर नंबरी!
दिसे भोळा, तुम्हाआम्हापरी साधासुधा राही

नात्यातलं नातं जपा, व्यवहार नका करू
याचं मन अनमोल रे, व्यापार नका करू
स्वत: लुटूनही जगाला हा फसवून जाई !

भोळ्या खुळ्यापुढे उंची आकाशाची थिटी झाली,
याची खोली जाते पार सागराच्या तळाखाली
आभाळाचं या पाऊल, माती धरूनच राही !

आणि ही मूळ हिंदी गझल:

आँसू भीगी मुस्कानों से हर चेहरे को तकता है
प्यार नाम का बुढा मानव जाने क्या क्या बकता है

अंजुरी भर यादों के जुगनूँ, गठरी भर सपनों का बोझ
साँसों भर के नाम किसी का पहरों-पहरों रटता है

ढाई आखर का यह बौना, भीतर से सोना ही सोना
बाहर से इतना साधारण हम-तुम जैसा लगता है

रिश्तों की किश्ते मत भरना, इसके मन का मोल ना करना
यह ऐसा सौदागर है जो खुद लुटकर भी ठगता है

कितनी ऊँची है नीचाई इस भोले सौदाई की
आसमान होकर धरत पर पाँव-पाँव ये चलता है

- माणिक वर्मा

Friday, March 18, 2011

पिवळ्या पाचोळ्याचा ऋतू

नुकताच सरला ग पिवळ्या पाचोळ्याचा ऋतू
इथेतिथे मोहक, खट्याळ रंग जाती उतू

शुभ्र ढगांचे घोळके विहरती आभाळात,
हिरव्या तृणाचे गालिचे धरतीच्या अंगणात

दोघे भेटलो तेव्हाही होते हेच सारे काही,
आहे तिथेच, तसेच, तेच; एक तूच नाही!



आणि ही मूळ कविता, जावेद अख़्तर यांची.

पीले पत्तों का मौसम जा चुका हैं..........

पीले पत्तों का मौसम जा चुका हैं
ज़मीन में हर तरफ रंग ही रंग हैं
शोख और दिलकश

उजले आसमान में
सफ़ेद बादलों की टुकडियां तैर रही हैं

वादियों में हरी घास की कालीन भीच गए हैं

यही सब कुछ था जब हम तुम मिले थे
वोहीं सब कुछ है लेकिन तुम नहीं हो

- जावेद अख्तर

Wednesday, March 9, 2011

तिची गोष्ट

तिने सावली मागितली की धावत धावत ऊन जायचे
कणसांतुन दाणे भरताना तिचे मळे करपून जायचे

तिला चार थेंबांची आशा, ढग तेव्हा नुसते फुगलेले
तिला भूल वर्षेची देउन अर्ध्यातुन परतून जायचे

पुनव तिने अंगावर घ्यावी, तेव्हा चंद्राने रुसायचे,
जरा चांदणे वेचू जाता आभाळच हरवून जायचे!

तिने खळाळुन हसू पहावे तो ओठांना तडे जायचे
रडे आवरू म्हणताना ती, नेत्र भरून झरून जायचे

तिने उन्हाशी मैत्री केली, ग्रीष्माचा सारंग छेडला,
आणि ठरवले, ऊन पांघरुन सावलीस विसरून जायचे!

तिला तिचा अंधार भावला, जन्मभराची अवस पावली
तिची निश्चयी नजर पाहता चांदणेच शरमून जायचे!

हसू तिच्या ओठांवर आता येते केवळ तिच्याचसाठी,
तिने ठरवले हास्यालाही अश्रूंनी मढवून जायचे!

तिला एवढे कळले आता, न मागता जे मिळून गेले
तेच आपले, परक्यासाठी काय हात पसरून जायचे?

Tuesday, March 1, 2011

सोयरा



श्रावणाने आटलेला तो झरा माझाच होता
वादळांनी बांधलेला आसरा माझाच होता

कैक त्या पात्रात गेले, अन् सुखे परतून आले,
मी बुडाले एकटी, तो भोवरा माझाच होता

तो जरी चुकवून गेला ताल माझ्या बंदिशीचा,
मैफलीला जिंकणारा अंतरा माझाच होता

वाजले पाऊल माझे आणि त्या निश्चिंत झाल्या
काढला माझ्या व्यथांनी धोसरा माझाच होता!

खेचताना राहिल्या का घागरी खाली, तळाशी?
खोल बारव, काचणारा कासरा माझाच होता

हार त्याची, जीत माझी; ऐन वेळी घात झाला
हारला जो जिंकताना, मोहरा माझाच होता

भांडताना पाहिले मी काल माझ्याशीच ज्याला,
आरसा आता म्हणे, तो चेहरा माझाच होता!

तू म्हणे दारात त्याला ना दिला थारा कधीही,
मी कसे दु:खास टाळू? सोयरा माझाच होता!