Thursday, October 29, 2009

वेडी आशा


स्वप्नातल्या गावाची वाट शोधत
भिरभिरणारी वेडी आशा
हिरव्या अवखळ पाउलवाटा,
वळणावरचा देखणा पळस,
इंद्रधनू पंखांची फडफड
मावळत्या सूर्याचा लामणदिवा
चुकार ढगाला सोन्याची झालर,
डौलदार राजहंस चंदेरी तळ्यात
आणि -----------
आणि अचानक आलेली वावटळ
धुळीचं वादळ, पिसाट वारा
बेभान पाऊस भरकटलेला
उदास धुक्याचे गहिरे पडदे,
कोंदटलेल्या दाही दिशा
उरी दाटून आलेले श्वास,
आसवांनी भरलेले काजळकाठ
-------------------
पायांखालची वाट कुठे
हरवून गेली, कळलंच नाही !
भिरभिरणारी वेडी आशा
अजून तिथेच, त्याच वळणावर
स्वप्नातल्या गावाची वाट शोधतेय!

Tuesday, October 27, 2009

मनाला

धरू कसे बेबंद मनाला?
नकोच होते पंख मनाला!

इथे-तिथे फिरते, भरकटते
कसा नसे निर्बंध मनाला?


दिले तुझ्या प्राजक्तफुलांनी
नव्या ऋतूचे रंग मनाला


सळाळणा-या रात्रनागिणी,
अन् स्मरणांचे दंश मनाला


तिथे तुझी लाटांवर होडी,
इथे छळे आतंक मनाला


कसे, कधी तू सांग वाचले
खळाळत्या स्वच्छंद मनाला?


अजून छळती कधीकाळच्या
जुन्या चुकांचे डंख मनाला


खुणावती वाटा परतीच्या,
अता करू नि:संग मनाला!

Sunday, October 25, 2009

अज्ञात

अज्ञाताच्या प्रवासातल्या धूसर धूसर वाटेवर
अकल्पिताच्या गूढ़ प्रदेशी मला खुणविते माझे घर


उन्हात भिजला श्रावण हसतो, गहि-या डोहावर झरतो,
सारंगाच्या घेत लकेरी, तनमन भिजवी हलकी सर

निळाशार हा शांत जलाशय, इंद्रधनूचे रंग नभी,
हलके हलके नाव डोलते चमचमणा-या लाटेवर

गहन, अनाकलनीय दिशांच्या आवर्तातुन फिरताना
धुक्यात हरवुन जाते मीही भिरभिरणा-या वा-यावर

ओढ अनावर कुठे नेतसे अंतराळ भेदून मला?
अखंड का हे झुरणे अन फिरणे स्वप्नांच्या वाटेवर?

Thursday, October 22, 2009

बहुधा

त्याला माझे मोहरणे रुचलेच नसावे
त्याचे माझे बंध कधी जुळलेच नसावे

शब्दांचे हे गाव पोरके, केविलवाणे,
भावार्थाचे बीज इथे रुजलेच नसावे


भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती,
वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे !

त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला
आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे


मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे


येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे !


कालकुपीतुन काही क्षण हलकेच चोरले,
त्यांत जशी जगले मी, कधि जगलेच नसावे !


पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !

Thursday, October 8, 2009

नेणार काय मी?

माझे माझे किती म्हणावे? जाताना नेणार काय मी?
काहीही ना जगात माझे, कोणाला देणार काय मी?


देण्यासाठी तुझे हात अन् मी घेण्यासाठीच जन्मले,
माझ्यासाठी तुला मागते, तुझ्याविना घेणार काय मी?


जाण्याआधी चुकती केली जन्मभराची सारी देणी,
काही वचने, शपथा उरल्या, पुन्हा इथे येणार काय मी?


देता-घेता जीवन सरले, दिले-घेतले इथेच विरले
मुठी झाकल्या, रित्या ओंजळी, दिले काय? घेणार काय मी?


जाता जाता तुझ्या अंगणी शब्दांचा प्राजक्त लावते,
तीच संपदा माझ्या हाती, तुला दुजे देणार काय मी?

Tuesday, October 6, 2009

खुशाली

एकेक स्वप्न मातीतुन उगवत जाते
मी आठवणींचे वावर तुडवत जाते

तू समोर येता गीत नवे रुणझुणते,
शब्दांत तुझ्या स्पर्शांना रुजवत जाते

टाके कधि तुटती, कुठे निसटतो धागा,
नात्यांची विरली वाकळ उसवत जाते

काही न बोलता गुन्हेगार ठरलेली
मी, मान तुकवते, मलाच फसवत जाते

पोटिची भूक चंद्रात भाकरी बघते,
व्याकुळ मन त्यातुन कविता फुलवत जाते

प्रतिबिंबाआडुन काळ खुणावत जातो,
की पिसाट नियती हासुन रडवत जाते?

कधितरी तुला लिहिलेले पत्र बिचारे,
माझीच खुशाली मलाच कळवत जाते

Sunday, October 4, 2009

जळाविण मीन

जिवावीण जीवनाचा अर्थ किती अवघड
जळावीण मीन तशी जीवघेणी तडफड


जीव होई कासावीस, कसा सोसावा दुरावा?
तृषा वाढते मनाची, वाटे आषाढ झरावा
अंतर्घट तृप्त व्हावे, अशी कोसळावी झड


वाटे सर्वस्व त्यागून रूप अरुपाचे घ्यावे
नदी जशी सागरात, तसे एकरूप व्हावे
नको क्षणाचे अंतर, संग रहावा अखंड

असे आयुष्य सरेल खुळ्या ध्यासात, भासात
श्वास आत्म्याचा विरेल परमात्म्याच्या श्वासात
जगावेगळी ही भक्ती, जगावेगळे हे वेड

Saturday, October 3, 2009

भैरवी

एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही
परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही


विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी,
कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही


तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले,
वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही


संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले,
रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही


पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना,
भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही