Thursday, January 27, 2011

एका चंद्रासाठी


सांज गर्भारली, चंद्र प्रसवेल । घर उजळेल, सृष्टी हरखली
सांज प्रसवली, टपोर चांदणी । आली ग अंगणी, सृष्टी उसासली!
फिरून सांजेला चंद्राचे डोहाळे । कौतूकसोहाळे होती अतोनात
पुन्हा एकवार सांजेच्या अंगणी । नवीन चांदणी, कौतूक ओसरे
कितीतरी झाले नवससायास । दिवा लावायास चंद्र नाही आला
आभाळ भरून चांदण्यांची दाटी । एका चंद्रासाठी किती आटापिटा!
थकली-भागली सांज मावळली । जन्माची काहिली, भोग नवसाचे
आक्रीत कसं हे झालं एकाएकी? लोक म्हणे लेकी कपाळकरंट्या!
आली नवी सांज एका चंद्रासाठी । चांदण्यांच्या पाठी दुर्दैवाचा हात
नव्या सांजेलाही नव्याची चाहूल । चंद्राचीच हूल इथून-तिथून
सांज कौतुकाच्या मखरी बसली । हळूच हसली गर्भात चांदणी!
कुणीतरी बोले, "चंद्र नाही बाई!" सरे नवलाई, सांज पिसाटली
गर्भातच विरे चांदणहुंकार । दाटला अंधार, रिते घरदार
सोसती चांदण्या जन्माची आबाळ । झुरतं आभाळ एका चंद्रासाठी!

Sunday, January 23, 2011

राती


जागून जन्म सारा गेल्या शिणून राती
झाकून काजव्यांना गेल्या निजून राती

कोजागिरी सखी ही लाजून लाल झाली
श्वासांत चांदण्यांच्या गेल्या भिजून राती

जादू तुझ्या सुरांची, की मोहिनी रुपाची?
या मैफलीत येता गेल्या खिळून राती

जागेच राहणे का दैवात आज आहे?
घेऊन नीज माझी, गेल्या निघून राती

झाले जराजरासे आभाळ केशराचे,
ओल्या पहाटगर्भी गेल्या थिजून राती

"काळोख फार झाला, द्या ना उजेड थोडा!"
मी एवढे म्हणेतो गेल्या विरून राती

आली फुलून गात्रागात्रात रातराणी
शिंपून चंद्र आता गेल्या इथून राती

त्याने कधी निखारे रंध्रांत पेरलेले,
त्याच्याच फुंकरीने गेल्या विझून राती!

तू फक्त हाक दे, मी सोडून जन्म येते,
तेथेच जायचे ना, गेल्या जिथून राती?

Friday, January 21, 2011

नकार आहे


तुला न मी पाहिले तरीही मनात श्रद्धा अपार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
सदैव काट्यांत गुंतलेल्या, उजाडलेल्या विराण बागा
अजाणता मोहरून आल्या, तुझ्यामुळे ही बहार आहे!
तुझ्या मनाच्या जुन्या व्रणांनी कसे भरावे? कसे सुकावे?
अजून तो बोलतोच, त्याच्या हरेक शब्दास धार आहे
मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!
मला जराही कळू न देता लुटून नेलेस गाव माझे,
पिसाट दैवा, तुझ्या छडीचा अखेरचा हा प्रहार आहे
कसे, किती शोधले, कुठेही तपास ज्याचा नसे कुणाला,
असा निराकार सावळा श्रीहरी मला भेटणार आहे!

Wednesday, January 19, 2011

गोंदण

तुझ्या सावलीला तुझे रूप द्यावे
तुझे स्वप्न देहात गोंदून घ्यावे ॥

मनोमंदिरी या तुला पाहते मी
नसे फूल तेव्हा मला वाहते मी
मना हेच ठावे, तुला नित्य ध्यावे ॥

उषेच्या कपोली प्रियाचीच लाली
तुझ्या चाहुलींचा तसा रंग गाली
अलंकार नाही, तुझे भास ल्यावे ॥

फुलांनी टिपावे सुखाच्या कणांना
जिथे मी जपावे सुगंधी क्षणांना
अशा स्वप्नलोकी मला तूच न्यावे ॥

नसावी तिथे बंधने या जगाची
झणी तृप्त व्हावी तृषा ही युगाची
सुधेने सुधेलाच आकंठ प्यावे ॥

Saturday, January 15, 2011

फक्त दे तू हात या हातात माझ्या!

संकटांचे मेघ आभाळात माझ्या,
फक्त दे तू हात या हातात माझ्या!

तेल ना वाती, तरीही तेवती हे
आठवांचे दीप अंधारात माझ्या

तार छेडावी सख्याने अन् भिनाव्या
मालकंसाच्या लडी श्वासात माझ्या

"ये, जरा गंधात न्हाऊ सायलीच्या"
बोलला वारा हळू कानात माझ्या!

सावली माझी मला सोडून गेली,
तू उभा मागे, जरी भासात माझ्या!

आज हे आयुष्य पूर्णत्वास गेले,
नाव त्याचे गुंफले नावात माझ्या!

Tuesday, January 11, 2011

ती थकलेली, झुकलेली

ती थकलेली, झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी
भाळावर सुरकुतलेल्या, धूसरशा प्राक्तनओळी

अनवट रागांचे पलटे, सळसळत्या अवघड ताना
कधि गुणगुणते, कधि गाते ती सहज न कळत्या ओळी

कधि म्हणते, "माझी सगळी वाटेत हरवली गाणी,
तू तुझ्यापासली दे ना, मी भरून घेते झोळी"

मातीत शोधते काही, वाकला देह वाकवुनी
पुसता म्हणते, "स्वप्नांची चिवडते राखरांगोळी!"

एकदा म्हणाली, "पोरी, देशील चितेला अग्नी?
झालीच तशीही आहे या अस्तित्वाची होळी!"

"का असे बोलसी बाई? काळीज चरकते, दुखते!"
"हे दु:खच जन्म घडविते, जागविते आशा भोळी"


ती कुणीच माझी नसते, तरिही माझ्यातच असते,
त्या निर्विकार नजरेने माझ्यातच माझी होळी!

Saturday, January 8, 2011

टाळले सार्‍या दिशांनी

टाळले सार्‍या दिशांनी सांगणे माझे
आणि झाकोळून गेले चांदणे माझे

हारला तो डाव, त्याची चूक ही नाही,
चूक होती डाव त्याचा मांडणे माझे!

ऐन मध्यान्हीच गेला सूर्य अस्ताला,
त्या क्षणाला सिद्ध झाले थांबणे माझे

जाणत्यांनी जाणले नाही, न जाणे का?
जाणिवांचा उंबरा ओलांडणे माझे!

मी तुला भेटून येताना मुकी होते
रात्र माझी, चंद्र माझा, चांदणे माझे!

कोणत्या माझ्या चुकीची ही सजा आहे,
दैव एका वादळाशी बांधणे माझे?


क्रांति

Wednesday, January 5, 2011

सोबतीला सांजवेळी

सोबतीला सांजवेळी आठवांची तटबंदी
खंदकात एकटीच फिरते मी, जायबंदी!

सोबतीला सांजवेळी ओल्या हळदीचे ऊन
लाजलाजरी पश्चिमा रंग होळीचे माखून

सोबतीला सांजवेळी रातराणीच्या चाहुली
हूड वारा डोकावता अंगणात रानभुली

सोबतीला सांजवेळी ऐन भरतीच्या लाटा
वाळूवर पावलांनी कोरल्या सोनेरी वाटा

सोबतीला सांजवेळी दूर पांगत्या सावल्या
टपोरल्या जाईजुई पानांतून डोकावल्या

सोबतीला सांजवेळी पक्ष्यांची शुभंकरोती
देवापुढे, वृंदावनी तेवणार्‍या दीपज्योती

सोबतीला सांजवेळी उगवती चंद्रकोर
दाराआडून डोकावे जशी बुजरीशी पोर

सोबतीला सांजवेळी ध्यास-भासाचा हा खेळ,
तुझी वाट पाहणारी आतुर कातरवेळ

सोबतीला सांजवेळी द्वाड, बोचरा गारवा,
कधी श्वासात पूरिया, कधी ओठांत मारवा!