Tuesday, January 31, 2012

जाता जाता

एक गुन्हा नक्कीच करावा जाता जाता
हात तुझा हातात धरावा जाता जाता 

ही फसवी चाहूल सुखाची ठायीठायी,
भास खुळा हा सत्य ठरावा जाता जाता

सुन्न, रिकामा पोकळ वेळू आयुष्याचा
आज तरी तू सूर भरावा जाता जाता

जन्म सरे ज्याच्या फुलण्याच्या ध्यासापायी
तो हिरवा चाफा बहरावा जाता जाता

शेवटचा लावून दिवा गंगेच्या काठी
त्याच प्रवाही प्राण झरावा जाता जाता

मी सरणाच्या आधिन होता माझ्यामागे
एक उसासा फक्त उरावा जाता जाता


जरा वेगळे वाटते

रोजचेच तारांगण जरा वेगळे वाटते 
मोजू पहाता चांदण्या गच्च धुक्याने दाटते 

पायाखालची ही वाट रोजचीच, सरावाची
वाटते का अनोळखी खूण माझ्याच गावाची ?

वेगळीच दिसे मूर्ती, तीच माती तोच साचा
रंग, कुंचलेही तेच, भास वेगळ्या रंगाचा

गुलमोहराच्या खाली झुले रोजच्यासारखी
वेगळ्याच खांद्यावर दिवास्वप्नाची पालखी

वाटे कवेतच आहे, तरी कल्पांतापल्याड
काही केल्या उघडेना आज मनाचे कवाड

जरा वेगळे वाटते, काय, कसे आकळेना
अर्थ शब्दाला मिळेना, शब्द सुरात ढळेना


Sunday, January 29, 2012

निरोप

मन रान, रान जळणारे ,
हेमंती उष्ण उसासे 
हुलकावुन श्रावण जातो
नुसते देऊन दिलासे

संन्यस्त, विरागी वारा,
वेलींचे पान न हलते
चित्ताच्या आत, तळाशी
गलबलते, काही सलते

विसरावी कोणी वचने
मुरलेल्या सहजपणाने
तितक्या सहजी गळती का
स्मरणांची पिवळी पाने ?

ती गुणगुणताना झरते
कातळनेत्रांतुन पाणी
सांजेला कुणी शिकवली
ही करुणविव्हळशी गाणी ?

आत्म्याच्या आत झिरपत्या
उत्कट दु:खाच्या धारा
आवेग असा की जावा
थेंबात बुडून किनारा

प्राणांच्या घुमटामधल्या
घंटांचे गंभिर ठोके
अस्वस्थ जिवाला करती
किति ठेवू बंद झरोके ?

ही कुण्या दिशेची यात्रा,
या गूढ कोठल्या वाटा ?
निष्प्राण कलेवर तैशा
निस्तेज पसरल्या लाटा

विरल्या स्वप्नांची दाटी
मिटणाऱ्या पापणकाठी
दे निरोप माझ्या इथल्या
शेवटच्या यात्रेसाठी 

Sunday, January 22, 2012

भैरवी

ओल्या सुरावटींच्या संमोहनात आहे
ग्रीष्मातही खुळी मी मल्हार गात आहे

माझेच सूर त्याला सांभाळता न आले
गंधार छेडते मी, तो धैवतात आहे !

बेसूर फक्त नाही, बेताल मी, तरीही
जिंकेन मैफली या वेड्या भ्रमात आहे

वेडी अबोल आशा देते उगा दिलासा,
'कंठात शोधसी का? गाणे मनात आहे'

संवादिनीस माझ्या नाहीच वर्ज्य काही
षड्जास टाळण्याचा त्याचा प्रघात आहे

गाता जरी न आले, हेही कमी न झाले
नाते तरी सुरांशी जोडून जात आहे

'मैफल सरेल आता, जा, भैरवी तरी गा'
आदेश हा कुणाचा? मी संभ्रमात आहे 

Wednesday, January 18, 2012

योग

आज त्याला पाहण्याचा योग होता
संचिताच्या पारण्याचा योग होता

ऐन मध्यान्हीच यावा चंद्र दारी ?
पौर्णिमेने लाजण्याचा योग होता

भाग्य माझे थोर, माझ्या वाळवंटी
हर्षगंगा वाहण्याचा योग होता

बिंब माझे पाहता नजरेत त्याच्या,
मी स्वतःवर भाळण्याचा योग होता

आस होती थेंब स्वातीचा मिळावा,
अमृताने नाहण्याचा  योग होता  !

भेट नवलाची खरी की स्वप्न माझे?
अद्भुताने भारण्याचा योग होता

कल्पनेचा खेळ मोठा रंगलेला,
संपला तो, जागण्याचा योग होता


समजायचेच आहे

बदलायची दिशा की बदलून जायचे हे समजायचेच आहे 
हरवून जायचे की हलवून जायचे हे समजायचेच आहे 

सहजीच भेटलेल्या गुलजार मोहराचे कळती जरी इशारे,
बहरास टाळुनी की बहरून जायचे हे समजायचेच आहे

अजुनी कधी कधी या वळणावरून येते प्रतिबिंब चांदण्यांचे,
कवळून घ्यायचे की उधळून जायचे हे समजायचेच आहे

अलवार भावनांचे हळुवार गीत गाते अलगूज ओळखीचे
कुठल्या सुरात केव्हा हरवून जायचे हे समजायचेच आहे

सृजने चितारणारे अनमोल रंगठेवे मिळती कुणाकुणाला,
मिटवून जायचे की सजवून जायचे हे समजायचेच आहे

इथुनीच एक जाते म्हणतात वाट त्याच्या गुलमोहरातळाशी
तुडवायचे तिला की वगळून जायचे हे समजायचेच आहे 

Monday, January 9, 2012

श्रद्धांजली


तुझ्या सावल्यांच्या झुगारून बेड्या पुढे सर्व गेले सखेसोबती 
मला एकटीलाच जाऊ न देती, तुझ्या सावल्या झिंगती भोवती 


जसे काळरात्रीत दाटून यावे दिशांच्या मुखी वेदनांचे धुके,
तशी घेरते या जिवाला उदासी, भुलाव्यापरी वाट माझी चुके 


चरे काळजाला असे यातनांचे, जसा आरशातील पारा उडे 
असे मारले तू, रुतू लागले पावलोपावली वंचनांचे खडे 


किती सोसण्याचीच आरास मांडू, किती भोग माळू फुलासारखे ?
अशा बेगडी कौतुकांनीच झाले मला बावरीला जिणे पारखे 


अरे, आज आयुष्य अस्तास जाता सुखाची मिळे एकही ना घडी 
अशी हारताना मला पाहिले की तुला वाटते धन्यता केवढी !


तशीही पराभूत आहे कधीची, कशाला हवी वाच्यता नेहमी ?
तुझ्या जिंकण्याला मुकी संमती, तू पुढे जायचे आणि मागेच मी 


तुझ्या बंदिशाळेत मी एक कैदी, नसे अन्य काही मला स्थानही 
गुन्हेगार तू अन् सजा भोगते मी, तुला वास्तवाचे नसे भानही 


अती होत जाता हसू येत जावे, अशी शक्यताही कुठे राहते ?
अखेरीस माझ्याच शब्दांत गुंफून श्रद्धांजली मी मला वाहते ! 

Tuesday, January 3, 2012

ऐक जरा ना...........

ऐक जरा ना...........
छपरावरच्या पागोळ्यातुन टपटपणा-या थेंबांचे जलतरंग सुमधुर 
पहिल्या भेटीला जाताना बावरलेल्या पैंजणातली नवथर हुरहुर

ऐक जरा ना............
तुझ्या बोलक्या डोळ्यांमधली स्वप्ने चोरुन रंगवलेली धुंद रुबाई
तुझ्या पेंगत्या स्वप्नांना जोजवीत हलके गुणगुणली वत्सल अंगाई

ऐक जरा ना............
खळाळणा-या झ-यातल्या जलप-या चालल्या गात ऋतूंची अवखळ गाणी
वाळूच्या उबदार उशीवर शांत पहुडल्या लाटांची लयबद्ध कहाणी

ऐक जरा ना............
वा-यासरशी सळसळणारी मंत्रभारली अद्भुत, दैवी पिंपळबोली
अन त्या घनगंभीर सुरांच्या कुशीतल्या घरट्यात किलबिले कुजबुज ओली

ऐक जरा ना............
शांत, निरागस, मंद ज्योतिच्या छायेमधली पावन स्तोत्रे, सांजवंदना
अन ऑर्गनच्या सुरांतून त्या क्रूसावरच्या करुणामय आत्म्यास प्रार्थना

ऐक जरा ना............
विश्वाला व्यापुन उरलेल्या नीरवातल्या गगनश्रुतींचा नाद अनाहत
चराचराला गुंगविणारे, अणुरेणूतुन पाझरणारे स्वरधन शाश्वत

ऐक जरा ना............
तुझ्याचसाठी, फक्त तुझ्यासाठीच रंगले मौनातुन संवाद लाडके
या हृदयाने त्या हृदयाला सांगावेसे, ऐक जरा ना, ऐक कौतुके !