Saturday, December 31, 2011

गुन्हा

काल तुझ्या दारी झरला ?
श्रावण केव्हाचा सरला !

पाणवठ्याची वाट सुनी,
मी घट अश्रूंनी भरला

बावरली जाणीव तसा
हात व्यथेचा मी धरला

का उरल्या विध्वंसखुणा ?
पूर कधीचा ओसरला

व्याकुळ झाला जीव तरी,
डाव तुझा मी सावरला

सोसत गेला जन्म पुरा
मात्र गुन्हा तोही ठरला !

Tuesday, December 27, 2011

आवेगधारा

नसे भाबड्या भावनांना निवारा 
कशा आवरू सांग आवेगधारा

तुझी मी तरीही तुझी ख़ास नाही, 
किती काळ साहू असा कोंडमारा ?

झरे स्पंदनातून आतूर प्रीती
कसा रे कळेना तुला हा इशारा ? 

खुळ्यासारखी घालते मीच रुंजी 
सखा आपला कोश सांभाळणारा !

तुझ्या श्रावणाच्या सरी जीवघेण्या,
फुलेना पिसारा, उठेना शहारा 

उधाणात बेभान वेगात आले, 
तुझ्याभोवती संयमाचा किनारा !


Friday, December 16, 2011

ऐल-पैल

ऐल मळा पैल तळे 
जायचे कुठे ना काळे 
टाकता पाऊल वळे
पुन्हा माघारी 

ऐल दिवा पैल वात
भेट नाही आयुष्यात 
मिट्ट काळोख घरात 
अवस दारी 

ऐल गंध पैल जाई 
मध्ये गूढ खोल खाई 
आक्रोश घुमत जाई 
कडेकपारी 

ऐल चंद्र पैल निशा 
घेरतात  सुन्न दिशा 
घुमतात वेड्यापिशा 
स्वप्नांच्या घारी

ऐल प्राण पैल सखा 
जीव भेटीला पारखा 
खुपतो काट्यासारखा
सल जिव्हारी 

ऐलपैलाच्याही पार 
तुझ्या महालाचे दार
त्याच्या पायरीशी थार
दे रे मुरारी 

Thursday, December 15, 2011

बिंब

रिमझिम थेंबात जशी
गुणगुण छंदात जशी
दरवळते,विरते मी
कणकण गंधात जशी

अविरत तू आसपास
सहज सुखद तरल भास
चंचल मन, अधिर आस
खळबळ बिंबात जशी !

Tuesday, December 13, 2011

नाममात्र

दुरावलेलीच रात्र आहे
मनात काळोख मात्र आहे

मरायची वेळ येत नाही,
जगायला मी अपात्र आहे

तिथे दुधी चांदणे फुलू दे
इथे जरी काळरात्र आहे

असेल आजार जीवघेणा,
इलाज का गलितगात्र आहे ?

मधेच किंचाळतात बेड्या,
'तिचा गुन्हा दखलपात्र आहे !'

उगाच अस्तित्व पाळते मी,
तसेहि ते नाममात्र आहे !

Monday, December 5, 2011

वसा

कुणा माहिती काल होतो कसा ?
मला मीच ना आठवे फारसा !

प्रवाहातल्या ओंडक्यासारखा
किती दूर वाहून आलो असा

दगा देतसे सावलीही मला
भरोसा करावा कुणाचा कसा ?

खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !

खरा चेहरा दाखवू पाहता
चरे पाडले, फेकला आरसा

नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा ?

उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !

Saturday, December 3, 2011

भूमिका

नव्हतेच मुळी मी येथे हा पडदा उठतानाही
अन् पडद्यामागे होते पडदा पडला तेव्हाही
टाळयांवर पडल्या टाळ्या, कौतुकात नाटक सरले
अन् मुख्य भूमिका माझी होती, हे तेव्हा कळले !

हे विचित्र नाटक, ज्याला नाट्याचा गंधहि नव्हता
मी गुंतुन जाण्याजोगा थोडासा बंधहि नव्हता
मी नसतानाही माझ्या नावावर होते चढले
माझ्याविन सर्वांना ते रुचले, पटले, उलगडले

'हे निर्विवाद यश माझे' दिग्दर्शक असे समजला
'ही दाद संहितेसाठी' लेखक या भ्रमात रमला
बोलले समीक्षक, 'अवघे नाटक पुरते भरकटले'
(अन् मुख्य नाट्य होते ते पडद्याच्या आडच घडले!)