Thursday, June 28, 2012

ठिणगी

वनवास नि अग्निपरीक्षा या चक्रातच घुटमळते 
रामायण सरले तरिही वैदेही अजुनी जळते 

वंशाला पुत्रच तारी, गर्भात निपजली कन्या
मग अगतिक माता खुडते त्या फुलणाऱ्या चैतन्या
कन्याद्वेषाची ठिणगी पडताच गर्भजल गळते

कधि विवाहवेदीवरती सुखस्वप्नांचा पाचोळा
निर्जीव संपदेसाठी जन्माचा चोळामोळा
अनिवार लालसाठिणगी दावानल होउन छळते

उन्मत्त वासनांधाच्या कपटास बळी कुणि पडते
निष्पाप, पवित्र असुनही पातकी, अमंगल ठरते
शापाची पडता ठिणगी, ती शिळा होत कोसळते

कधि पाश यमाचे होती नात्यांचे रेशिमधागे
जाज्वल्य तेज असुनीही द्रौपदी पणाला लागे
सूडाची दाहक ठिणगी लाव्हा होऊन उसळते

निर्धनास वरता होई अपमान पित्याच्या दारी
जपण्यास प्रतिष्ठा पतिची, अग्नीस कवळते नारी
अवमान, वंचना ठिणगी उडता माहेरहि जळते

ठिणग्यांचे वणवे होती, लाक्षागृह आयुष्याचे
कधि राख जिवाची होते, कधि धुमसे रान मनाचे
फुलतात चितेत निखारे, ज्वालांनी रक्त वितळते 

Wednesday, June 27, 2012

वर ढग डवरले

वर ढग डवरले 
अन् काजळी माखलं गच्च आभाळ 
उतू उतू आलं 
पिसाटागत भणभणत सुटला वारा 
उभी-आडवी मारझोड करत 
विध्वंसाची भेरी घुमवत 

वर ढग डवरले 
तसं जीव मुठीत धरून 
कसाबसा तग धरून उभ्या 
खोपटाच्या काळजात धस्स झालं 
'गुदस्ता साल कसंतरी निभावलं
हा पावसाळा निघेल?'

वर ढग डवरले 
अन् आता खचण्याइतकंही त्राण न उरलेल्या 
कुडाच्या भिंती थरथरल्या,
कुडकुडत राहिल्या,
'किती आयुष्य उरलंय, कोण जाणे?'

वर ढग डवरले 
अन् काड्या काड्या विस्कटून चाळणी होत गेलेल्या 
गवताच्या अशक्त छपरानं 
उसासा सोडला,
'यंदा पण राहिलीच शाकारणी 
आता तर या झपाटल्या वाऱ्याची पण भीती.'

वर ढग डवरले
तसं ती दोघं उगाचच करत राहिली 
निर्जीव होत चाललेल्या खोपटाच्या डागडुजीचे 
निष्फळ प्रयत्न 
घरघर लागलेल्या, अखेरचे आचके देणाऱ्या जिवाला 
घास भरवावा, तसे!

वर ढग डवरले
अन् फाटक्या झग्यातली झिपरी पोर 
ताडकन उठली, 
वाऱ्यावर उडणारे कागद गोळा करत 
धावत सुटली 
पोलिओनं लुळ्या झालेल्या धाकल्या भावाला 
पावसाच्या पाण्यात सोडायला 
छान छान होड्या करून देण्यासाठी! 

रक्षाच फक्त उरली


कैफ़ी आज़मी यांच्या एका अप्रतिम गीताचा अनुवाद करण्याचा माझा प्रयत्न. अनुवाद खूप व्यवस्थित जमला नाहीय, मूळ रचनेतले काही भाव मराठीत व्यक्त करणं महाकठीण आहे.


माझ्यात काय अजुनी शोधे तुझी दिठी ही
ठिणगी न मी निखारा, रक्षाच फक्त उरली

ती प्रीत राहिली ना, उरल्या न त्या स्मृतीही
चित्तात आग भडके अन् दग्ध सर्व काही
प्रतिमा जपून ज्याची नेत्रांत ठेवली तू,
मी मूक चिता त्याची, तो प्राणसखा नाही

होते भलेच, जर का हास्यात जन्म सरता,
आता असो, तसा तो अश्रूंतही सरेल
उध्वस्त प्रीतिची मी हृदयात राख जपली,
चिवडून सारखी ती विखरेल अन् विरेल

अपराध कामना अन् अपराध प्रेम, आशा
फसव्या जगामध्ये या प्रीती अशक्य आहे
बाजार वेगळा हा, इथली विचित्र नीती
आत्मा विकून काही घेणे अशक्य आहे

मूळ रचना : कैफ़ी आज़मी
स्वैर भावानुवाद : क्रांति


मूळ रचना


जाने क्या ढूंढती रहती हैं ये आंखें मुझमें
राख के ढेर में शोला है न चिंगारी है

अब न वो प्यार, न उस प्यार की यादें बाकी
आग यूं दिलमें लगी, कुछ न रहा, कुछ न बचा
जिसकी तसवीर निगाहों में लिये बैठी हो
मैं वो दिलदार नहीं, उसकी हूं खामोश चिता

ज़िंदगी हंसके गुजरती तो बहोत अच्छा था,
ख़ैर हंसके न सही, रोके गुजर जायेगी
राख बरबाद मुहब्बत की बचा रखी है
बार बार इसको जो छेडा तो बिखर जायेगी

आरजू जुर्म, वफ़ा जुर्म, तमन्ना है गुनाह
ये वो दुनिया है, जहां प्यार नहीं हो सकता
कैसे बाजार का दस्तूर तुम्हें समझाऊं
बिक गया जो वो खरीददार नहीं हो सकता

Sunday, June 17, 2012

जखम मनाची

सुकता सुकता पुन्हा पुन्हा ती झरत असावी 
जखम मनाची कधीच खपली धरत नसावी 

चिघळत जाते, भळभळते, ठसठसते, खुपते
वरवर वाटत असते की ती भरत असावी

अखंड सलते, व्याकुळ करते श्रांत जिवाला,
अमरत्वाचा शापमार्ग अनुसरत असावी

या जखमेची व्याप्ती-खोली कळे कुणाला?
बुजता बुजता नवा घाव ती करत असावी

फुंकर घालावी तर होतो तिचा निखारा,
वैशाखाच्या वणव्यातुन अवतरत असावी

होइन मी चेतनाशून्य ती विरून जाता,
संगत माझी-तिची म्हणुन अनवरत असावी 

कुणी काढली खपली?

फसव्या हास्याच्या खपलीच्या आड कधीची लपली 
जखम जराशी सुकली होती, कुणी काढली खपली?

कसेबसे टाके घालुन मी कडा जुळवल्या होत्या 
उरी वेदना जपून ओठी कळ्या फुलवल्या होत्या 
सांत्वन चंदनलेप लावला, हळूवार ती जपली 
जखम जराशी सुकली होती, कुणी काढली खपली?

शब्दांचे कशिदे काढुन मी दाहक खूण बुजवली 
व्रण लपवावे म्हणुन भरजरी कविता तिथे सजवली 
आज अचानक कशिदाकारी कुण्या दिठीला खुपली?
जखम जराशी सुकली होती, कुणी काढली खपली?

भळभळणारी जखम मनाची फिरून भिजली आहे 
लेप संपला, शब्द उसवले, कविता थिजली आहे 
उपहासाचा वार असा की क्षणात शुद्ध हरपली 
जखम जराशी सुकली होती, कुणी काढली खपली?


Monday, June 11, 2012

माउली


वसे घ्यायचे आणि सांभाळण्याचे तिच्यापासले मी वसे घेतले 
दुभंगूनही बिंब न्यारे दिसावे, असे जादुई आरसे घेतले 

तिचे भोग अन् भोगणेही निराळे, निराळी तिच्या सोसण्याची तऱ्हा 
कडाका असो की असो काहिली, जे मिळाले, जसेच्या तसे घेतले 

जरा सावरू पाहते तोच यावी नवी यातना पाहुणी अंगणी 
सुखांना तिच्या शोषले खंगलेल्या व्यथांनी, पुन्हा बाळसे घेतले 

तिचे वेद-गीता, तिचा धर्म-अध्यात्म सारे तिच्या कोटरी नांदले 
वृथा अक्षरे वाचली फक्त आम्ही, तिने अंतरी ते ठसे घेतले 

नसे वेदनांची कधी ज्यास पर्वा, असे शांत, लोभावणारे हसू 
तिने काळजाच्या कळा सोसताना कधी हास्य हे छानसे घेतले?

तिचे दु:ख,कौशल्य दु:खासही सौख्य मानायचे घेतले मी जरी 
तरी मंद निष्पाप, जाईजुईसारखे हासणे का नसे घेतले? 

असे माउली ती, जिने या जिवाला दिला सार्थ आकार अन् चेतना 
जिणे धन्य झाले, अनायास मीही तिचे तृप्तिचे वारसे घेतले 

Sunday, June 10, 2012

अतर्क्य

दोन जिवांचे असे गुंतणे 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 
वास्तवातही स्वप्न गुंफणे 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

एकतानता किती असावी, 
एकरूपता किती असावी?
भिन्न देहि मन एक नांदणे 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

भेट जीवनी क्वचितच घडते
तरी कधी ना अंतर पडते 
दूर दूर, तरि तीच स्पंदने 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

गूज कधी अपुले सांगावे 
कधी आसवांतून झरावे 
कधी काहिली, कधी चांदणे 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

जशी मंदिरी ज्योत तेवते
तशी भावना मनात वसते 
मेघ-धरित्री तशी बंधने 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

नाव न या नात्याला काही 
नसे दूरता, जवळिक नाही 
द्वैतातुन अद्वैत सांधणे 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

असा घ्यावा वसा


असा घ्यावा वसा जशी सावित्रीची पाटी 
ज्ञानाचं भांडार खुलं लेकीबाळींसाठी

असा घ्यावा वसा, चिंधी जशी सिंधू व्हावी
आभाळालाही मायेची पाखर घालावी

असा घ्यावा वसा, जशी बाबांची साधना
यज्ञकुंडातही समिधेची आराधना

असा घ्यावा वसा, राणी-अभय निर्भय
ज्याला नाही स्वार्थ त्याला कशाचे ना भय

असा घ्यावा वसा, सुख द्यावं दु:ख घ्यावं
प्राणीमात्रांत ईश्वर, त्याला नित्य ध्यावं

असा घ्यावा वसा, अहंकार ओलांडावा
निर्मळ मनाच्या दारी आनंद सांडावा

असा घ्यावा वसा, द्यावा काळोखा प्रकाश
क्रोध, लोभ, माया, मोह सोडवावे पाश

असा घ्यावा वसा, फुलवावा रिता माळ
माती तिथली पूजाया झुकेल आभाळ

असा घ्यावा वसा, उतू नये, मातू नये
घेतलेला वसा जन्मभर टाकू नये 

जगण्यावर जीव जडावा



चिरमुक्तीचा अलख जागवित तेजस जोगी मनात यावा 
तृप्तीने अंतर निथळावे अन् जगण्यावर जीव जडावा

लहरत यावी साद सावळी, ह्रुदयगोकुळी रास सजावा
तनमन जणु वृंदावन व्हावे अन् जगण्यावर जीव जडावा

कुठला कान्हा, कुठली राधा, स्वत्व विरावे, भेद मिटावा 
द्वैत सरावे, भान हरावे अन् जगण्यावर जीव जडावा

परमात्म्याच्या दर्शनमात्रे निमिषातच संदेह सरावा 
आसक्तीचा पाश गळावा अन् जगण्यावर जीव जडावा

नश्वर देहाच्या बंधातुन आत्मानंद विमुक्त उडावा
धुके भ्रमाचे वितळुन जावे, अन् जगण्यावर जीव जडावा


मेघश्याम जादुगारा

डोळां स्वप्न दावण्याची 
जीवा ओढ लावण्याची
तुझी निराळीच तऱ्हा
मेघश्याम जादुगारा

तुझ्या पावरीचे सूर
मोहवून नेती दूर
ध्यानीमनी नसताना
पायी नादती नुपूर
चित्ततार छेडण्याची
संभ्रमात पाडण्याची
तुझी निराळीच तऱ्हा
मेघश्याम जादुगारा

यमुनेच्या तीरावर
येते घेऊन घागर
पांघरून निळेपण
तुझे तनामनावर
रंग-गंध शिंपण्याची
देह-प्राण जिंकण्याची
तुझी निराळीच तऱ्हा
मेघश्याम जादुगारा

तुझा मनात निवास
तरी दुरावा दिलास
तुला भेटण्यासाठीच
जन्मभराचा प्रवास
द्वैतभाव मोडण्याची
जिवा-शिवा जोडण्याची
तुझी निराळीच तऱ्हा
मेघश्याम जादुगारा