Sunday, September 16, 2012

हल्ली

सुचते-रुचते इतके भलते-सलते हल्ली 
कळले नसते तरिही सगळे वळते हल्ली

जखमा सजल्या, फुलल्या, खुलल्या, कविता झाल्या
कविता लिहिण्याकरिता जखमा जपते हल्ली

विसरू शकते चुटकीसरशी सगळी दु:खे,
रडता रडता फसवे हसणे जमते हल्ली

दुखणे असते परके पण मी म्हणते माझे,
भुलते मरणा, तरिही उपरे जगते हल्ली

खिडकीमधली चिमणी उडता उडता म्हणते,
'नुसता इमला म्हणजे घरटे असते हल्ली'

Tuesday, September 4, 2012

साहित्यिका

भाबडी-भोळी, तिला ना जाण साहित्यातली 
जिंकते संमेलने पण नित्य आयुष्यातली 

वाचली नाही तिने कुठली कथा-कादंबरी
भोवतीच्या व्यक्तिरेखा मात्र जपते अंतरी

ऐकते श्रुतिका न किंवा मालिका ती पाहते
भूमिका वाट्यास येती, त्याच खुलवित राहते

जाणते पोथ्या-पुराणे की न गाथा तत्वता
साधते जन्मांतरी पण सुफळता-संपूर्णता

गीत, कविता वा गझल सारेच जगते बावरी
अन बहर फुलवीत जाते काफिये हुकले तरी 

मैत्र

संवाद साधू पाहता 
वादात होते परिणती 
जमते न गमते तुजविना 
हे मैत्र गमतीचे किती

मैत्रीत नसते याचना
ना मान ना अपमानही
ना वंचनाही चालते,
ना गर्व ना अभिमानही

ही पारदर्शी काच जी
सुस्पष्ट सारे दाखवी
ना आरसा, जो दावितो
प्रतिबिंब केवळ लाघवी

रुसवे जरी क्षणकालचे,
होतात सारे दूर ते
ना गैरसमजाचे धुके
मैत्री-नभाला घेरते

नकळत तरीही ज्या क्षणी
संबंध होती बंधने,
वेळीच फुंकर घालुनी
जुळवायची दुखरी मने

फणसास काटे बोचरे,
पण आतली गोडी पहा
वादात-संवादातही
मित्रासमीप सदा रहा 

वाट विसरली

सुस्तावून पसरले अंबर 
धुके पांघरुन निजले डोंगर 
किरण विसरले प्रभातफेरी,
सूर्य म्हणाला, 'जाऊ नंतर!'

वारा लावुन बसे समाधी
हले-डुलेना एक पानही
पंख लपेटुन निवांत पक्षी
ना कुजबुज, ना समुहगानही

कळ्या-फुलेही अजुन निजेतच
दंव थिजले की टपोर मोती?
मुग्ध, विलक्षण गूढ शांतता
निळ्या, नितळशा तळ्यासभोती

दिशा गोठल्या, उन्हे न झरली
कुडकुडत्या हिरव्या पात्यांवर
रात घराची वाट विसरली,
रेंगाळत डोंगरमाथ्यांवर 

वजा

तुला रुचेल तेच मी करायला हवे 
मला वजा करून शून्य व्हायला हवे 

रडून काय लाभणार? फक्त वंचना
हसून मैफलीत वावरायला हवे

कुणा नसे फिकीर सावरायची तुला,
खुळ्या मना, तुझे तुला जपायला हवे

मलाच मी झुगारले, तुझ्यात गुंतले
तुझ्याहि बाबतीत हे घडायला हवे !

'थकायचे किती? जरा निवांत बैस ना!'
कधीतरी, कुणीतरी म्हणायला हवे

किनार फाटली, घडी चिरून चालली,
जिणे पुन्हा रफू करून घ्यायला हवे !

अशक्य फक्त वाटते, नसेल फारसे
जमेल ना जगायला? जमायला हवे..

.
.
.
.
.
झुळूक मंद, कोवळी, प्रसन्न चांदणे,
सभोवती असे कुणी असायला हवे !