Saturday, April 30, 2011

बेगमी


ऋतू भेटायचे झाले कमी,
उद्यासाठी करावी बेगमी!

तुझ्यापासून लपवावे कसे?
तुला सांगू कसे सारेच मी?

जराशी ऊब श्वासांची हवी,
किती सोसू कडाके नेहमी?

रुचेना एकदाही का तुला?
कितीदा तोच मांडू खेळ मी?

तुझ्यावाचून मी नाही कुणी,
तुझ्यासाठी, तुझी आहेच मी!

कधीची गुंतली आहे, पुन्हा
नको टाकूस जाळे रेशमी

हवे ते स्वप्न मी देते तुला,
उरी जपशील त्याला, दे हमी!Friday, April 29, 2011

काही गाणी अगदी कायम मनात रुंजी घालत रहातात, ती आपल्याला का आवडतात हे सहजासहजी सांगता येत नाही, पण कधीतरी अचानक काही भाव, काही शब्द मदतीला धावून येतात आणि त्या गाण्याचं आणि आपलं नातं उलगडून देतात. अशा या आगळ्यावेगळ्या कल्पनेला http://www.orkut.co.in/CommTopics?cmm=826350
इथून वेचलं आणि पहिला प्रयत्न केला.
जखमा फुलतील नव्याने,
थरथरेल मन तृणपाते,
भगव्याशा आभाळाचे
क्षितिजाशी धुरकट नाते

त्या कातरवेळी माझ्या
वेदनेस कंठ फुटावा
हुरहुरत्या सांजेला मी
माळून पूरिया द्यावा!

झाडांच्या पार तळाशी
घनदाट स्मृतींचा मेळा
काहूर जागवित याव्या
अन् सांजफुलांच्या वेळा

संध्येची गहिरी दु:खे
गात्रांत भरून उरावी,
मावळताना किरणांना
कविता आतून स्फुरावी

धूसरशा मेघांमधल्या
शिल्पातुन सूर झरावे,
मी ज्योतीसह थरथरता
हे एकच गीत स्मरावे,

"भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते,
मज तुझी आठवण येते!"


http://www.youtube.com/watch?v=x88r7JI4ljU


Tuesday, April 26, 2011

धन्यवाद आयुष्या!


मीर अली हुसैन यांच्या शुक्रिया ज़िंदगी, तेरी मेहरबानियां या कवितेचा स्वैर भावानुवाद.


गाळुन ये कवडशांत, फिकट तरिही चांदणेच,
क्षण काही फुलण्याचे कळीस भाग्य लाभलेच
ही तुझी अनंत कृपा, धन्यवाद आयुष्या!

एका रंगात कधी चित्र वेधते नजरा?
मोल सुखाचे कळण्या दु;खही हवेच जरा!
सजवाया विश्व हवे ऊन आणि सावली,
तक्रारी करण्याला सवड कुणा लाभली?
ही तुझी अनंत कृपा, धन्यवाद आयुष्या!


कधि मैत्री, वैर कधी, खेळ नित्य खेळतसे
कधि पिसाट, कधि हळवे नियतीचे रूप असे
मन झाले शांत जरा, उपकारच झाले ना?
सावज व्याधास भुले, हे अघटित झाले ना?
ही तुझी अनंत कृपा, धन्यवाद आयुष्या!


ही मूळ रचना

छन के आयी तो क्या चाँदनी तो मिली
चंद दिनही सही यह कली तो खिली
शुक्रिया ज़िन्दगी, तेरी मेहरबानियाँ

सिर्फ इक रंग से तस्वीर होती कहीं
ग़म नहीं तो ख़ुशी की कीमत नहीं
धूप छाँव दोनों हैं तो दिलकश जहां
क्या शिकायत करें, फुरसत कहाँ
शुक्रिया ज़िन्दगी, तेरी मेहरबानियाँ

अपनी तक़दीर की है यह दास्ताँ
कभी क़ातिलाना, कभी मेहरबाँ
मेहरबानी जो दिल को करार आ गया
अपने क़ातिल पे भी प्यार आ गया
शुक्रिया ज़िन्दगी, तेरी मेहरबानियाँ

- मीर अली हुसैनThursday, April 21, 2011

विसरावे, हेच बरे!

जावेद अख्तर यांच्या "भूल जाऊँ अब यही मुनासिब है" या कवितेचा स्वैर भावानुवाद.विसरावे, हेच बरे! विसरावे सांग कसे?
असशी तू वास्तवात, हे केवळ स्वप्न नसे!

समजेना मन वेडे, छळवादी, दुष्ट कसे,
जे कधी न घडले, त्या भासांचे जपत ठसे!

बंदिश ती, सूर जिला लाभला कधीच नसे,
गुपित राहिले मनात, ओठी आलेच नसे!

बंध जो परस्परांत राहिला, न आज असे,
घडले काही न तरी माझ्या स्मरणात कसे?

फसव्याला, चकव्याला मन हळवे भुलत असे,
या अशा स्थितीत तुला विसरावे सांग कसे?

असशी तू वास्तवात, कल्पित वा स्वप्न नसे!!!!


आणि ही मूळ कविता

भूल जाऊँ अब यही मुनासिब है
मगर भुलाना भी चाहूँ तो किस तरह भूलूँ
कि तुम तो फिर भी हक़ीक़त हो कोई ख़्वाब नहीं

यहाँ तो दिल का ये आलम है क्या कहूँ कमबख़्त
भुला सका न ये वो सिलसिला जो था ही नहीं

वो इक ख़याल
जो आवाज़ तक गया ही नहीं

वो एक बात
जो मैं कह नहीं सका तुम से

वो एक रब्त
वो हम में कभी रहा ही नहीं

मुझे है याद वो सब
जो कभी हुआ ही नहीं

अगर ये हाल है दिल का तो कोई समझाए
तुम्हें भुलाना भी चाहूँ तो किस तरह भूलूँ
कि तुम तो फिर भी हक़ीक़त हो कोई ख़्वाब नहीं

- जावेद अख्तरWednesday, April 13, 2011

पंचम


गीतकार आणि कवी गुलज़ारजी यांनी त्यांचा परममित्र पंचम म्हणजेच आर. डी. बर्मन यांच्या आकस्मिक निधनानंतर लिहिलेली  पंचम ही अतिशय भावपूर्ण कविता. या कवितेचा स्वैर भावानुवाद करण्याचा हा माझा प्रयत्न.

आठवतात पंचम ते कुंद पावसाळी दिवस?
ओलसर वातावरणात डोंगराखालून, बोगद्यामधून
धुक्याच्या पडद्यातून गूढ अनंताकडे जाणारे
रेल्वेचे रूळ?

बसलो होतो दोघं त्या धुक्यात,
जशी दोन कुजबुजती झुडुपं, शेजारीशेजारी उगवलेली.
कितीतरी वेळ बसलो होतो
आदल्या रात्रीच येणार्‍या
त्या अनाहुत पाहुण्याची चर्चा करत.
कोण होता, कसा होता, कशासाठी येणार होता?
आला तर नाहीच, येण्याची वेळही टळून गेलेली.
तरीही आपण बसलो होतो कितीतरी वेळ
त्या रुळावर, दाट धुक्यात, चुकल्या क्षणाची,
त्याची, त्याच्या गाडीची वाट पहात,
न गाडी आली, न तो आला.
तू उठलास पाय मोकळे करायला,
धुक्यावर पावलं उमटवत निघूनही गेलास,
कुठंतरी अज्ञातात.

पंचम, मी एकटाच बसलो आहे रे धुक्यात, अजूनही
तुम्हा दोघांची वाट पहात, एकाकी!

आणि ही मूळ कविता.

पंचम

याद हैं बारिशों का दिन पंचम
जब पहाड़ी के नीचे वादी में,
धुंद से झाँक कर निकलती हुई,
रेल की पटरियां गुजरती थी..!

धुंद में ऐसे लग रहे थे हम,
जैसे दो पौधे पास बैठे हो..
हम बहुत देर तक वहाँ बैठे,
उस मुसाफ़िर का जिक्र करते रहे,
जिसको आना था पिछली शब, लेकिन
उसकी आमद का वक़्त टलता रहा!

देर तक पटरियों पे बैठे हुए
ट्रेन का इंतज़ार करतें रहे
ट्रेन आयी, न उसका वक़्त हुआ,
और तुम यूं ही दो कदम चल कर
धुंद पर पाँव रख के चल भी दिए

मैं अकेला हूँ धुंद में पंचम!!


- गुलज़ार

Saturday, April 9, 2011

चकवा


समजूत का? कशाला? रुसवा कधी न होता
लटका विरोध माझा कडवा कधी न होता

विनवायची जरी मी, म्हटलेस त्यास आज्ञा,
हलकेच बोल होते, फतवा कधी न होता

झुकण्यात जन्म सारा सरला, मिटून गेला
बुजरा स्वभाव खोटा, फसवा कधी न होता

फुलले न फारशी, ना बहरून धुंद झाले
ऋतु कोणताच माझा नटवा कधी न होता

मनमोकळे कधी ना रडले, न हासले मी
नव्हते कठोर, बाणा हळवा कधी न होता

जळती मशाल किंवा विझली न राख होते,
धुमसायची जराशी, वणवा कधी न होता

इतकेच जाणते की जगणे खरेच होते,
नुसताच भास किंवा चकवा कधी न होता


Monday, April 4, 2011

तुझा सहवास


तुझ्या नजरेने गात्रांवर गोंदलेली धुंदी
श्वास श्वासांत माळून गेले बकुळ सुगंधी
तुझ्या बोलण्याने छेडलेली मंद नंदधून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

तुझ्या प्राजक्ताचा गंध माझे फुलवी अंगण
तुझ्या भासाचे-ध्यासाचे माझ्याभोवती रिंगण
धुंद होते, मिरवते तुझ्या चाहुली लेऊन
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

वीज लहरे देहात अशी तुझी नेत्रबोली
तिच्या वर्षावात चिंब होते लाजून अबोली
मला लपवू पहाते, डोळे माझेच झाकून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!


तुझी हिरव्या चाफ्याची प्रीत भिनते अंगात
जागेपणी रंगते मी तुझ्या स्वप्नांच्या रंगात
जग विसरते, जाते देहभान हरपून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!