Sunday, August 30, 2009

करून झाले

त्याने जे जे सांगितले ते करून झाले
वा-याशी लावून शर्यती फिरून झाले

ज्यांनी माझी साथ दिली ते परके होते,
झाले तितके विरोध सारे घरून झाले

माघारीचे पाउल पहिले कुणि उचलावे ?
त्याचे माझे वाद एवढ्यावरून झाले

काटयांतहि फुलण्याचा त्याने वसा दिलेला,
झाले बहरुन पुन्हा, पुन्हा मोहरून झाले

काहीही दिसले नाही, जे नकोच होते,
आठवणींचे कपाटही आवरून झाले

आता सावर केवळ थकल्या श्रांत जिवाला,
कोसळणारे डोलारे सावरून झाले

Tuesday, August 25, 2009

कर्ज

उपकाराचे तुझ्या जीवन कर्ज जुने सांभाळत आले
चुकवाया मी तुझी तारणे, किती बंधने पाळत आले

किती टाळले तरिही त्यांना माझ्यावाचुन थारा नव्हता
तुझे भास सावलीसारखे पायांशी घोटाळत आले

नभछाया वा मळभकाजळी निष्प्रभ का करते सूर्याला ?
ग्रहण क्षणाचे सुटता त्याचे किरण पुन्हा तेजाळत आले

भलते होते वेड जिवाला राखेतुन अवतार घ्यायचे
अतिरेकी हट्टापायी त्या सर्वस्वाला जाळत आले

कुणी द्यायची साथ कुणाची, कधीच त्यांचे ठरले होते,
तुझी वाट शोधली सुखाने, मला दु:ख धुंडाळत आले

Wednesday, August 19, 2009

राधा

त्या सावळ्या सख्याच्या रंगात रंगले मी
त्या साजि-या सुखाच्या स्वप्नात दंगले मी


ते स्वप्न सत्य होते, की सत्य स्वप्न होते?
जाणीव-नेणिवेच्या गुंत्यात गुंतले मी


त्या रम्य संभ्रमाची जडली अनाम बाधा,
वृंदावनात राधा होऊन गुंगले मी


त्याच्या करात मुरली, मुरलीत सूर झाले,
त्या अधररससुधेला प्राशून झिंगले मी

हे गोड गुपित माझे सांगू कसे कुणाला?
त्या चित्तचोरट्याचे मन आज जिंकले मी

तो अंतरात वसतो, तो स्पंदनात घुमतो,
त्या सगुण निर्गुणाशी आयुष्य बांधले मी

तो विश्वरूप कान्हा, मी कृष्णरूप राधा,
अद्वैत हे युगांचे शब्दांत मांडले मी

न्यास

या जिवाला एक ज्याचा ध्यास होता
तोच की त्याचा खुळा आभास होता?

भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,
सक्तमजुरी आणि कारावास होता

रंगलेल्या मैफली उधळून जाणे,
हा कुणाचा सांग अट्टाहास होता ?

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी
गोंदलेला आमरण वनवास होता

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता!

पुन्हा

वाटते भय का प्रकाशाचे पुन्हा ?
वाहती वारे विनाशाचे पुन्हा

यायचे नव्हते तुला येथे कधी
का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा ?

वादळाहातीच ज्याचे होडके,
कोण साथी त्या प्रवाशाचे पुन्हा ?

कोरडे रडणे, उमाळे बेगडी,
दु:ख का फसवे उसाशाचे पुन्हा ?

सोंगट्यांनी डाव केव्हा साधला?
का बदलले दैव फाशाचे पुन्हा ?

बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा ?