Tuesday, January 26, 2010

अंगाईनीज आली, पेंगलेले नेत्र झाकी श्रीहरी
सानुलीशी झाकलेली मूठ चाखी श्रीहरी

या मुठीतुन काय झरते अमृताची धार रे?
गीत सृजनाचे तुझे हे कोवळे हुंकार रे
रुणुझुणू या घाग-यांचा नाद रोखी श्रीहरी

गोड अंगाई तुला ही रातराणी ऐकवी
              मंद हिंदोळ्यात बाळा चंद्र हलके जोजवी            
अजुनि तुझिया लोचनी का जाग बाकी श्रीहरी?

ओठ इवले मुडपुनी का रुससि लटके तान्हुल्या?
खुदुखुदू हससी क्षणातच, चांदण्या जणु सांडल्या!
साद देती का तुला रे स्वप्नपाखी श्रीहरी?

Thursday, January 14, 2010

वाट चुकवेल वाट

पुन्हा नवी धून छेड, जुने राग गाऊ नको
वाट चुकवेल वाट, वळणांनी जाऊ नको

रानवारा अंगणात, गुणगुणेल कानात,
तुला वेळूच्या बनात बोलावेल; जाऊ नको

धुंद केवड्याचे रान, गंधमुग्ध पान पान,
हरपून गेले भान, असे वेड लावू नको

माझ्या भाळी गोंदले तू गर्द पळसाचे ऋतू
भावबंधाचे हे सेतू ओलांडून जाऊ नको

येता सांज अंधारून, कशी निघू रे घरून?
काळवेळ विसरून आर्त साद देऊ नको

नको घाई, जरा थांब; पावसात चिंब चिंब
ओंजळीत चार थेंब, टिपून ते घेऊ नको

Thursday, January 7, 2010

ओझी

आहे तीच जड झाली, नका लादू रे आणखी
खुळ्या अपेक्षांची ओझी किती पेलावी सारखी?

रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा
उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा
तोही राही कुठे आता? जग झाले अनोळखी

पाय-यांना ओलांडून थेट शिखराचा ध्यास
वेड्या पतंगासारखा उंच जाण्याचा हव्यास
जाग येते तेव्हा दशा होते पिसाटासारखी

बोल समजुतीचेही खुपतात जसे काटे
गणगोत, आप्त-मित्र कुणी आपले न वाटे
पिता प्रेमाचा भुकेला, माय मायेला पारखी

अपयश सोसवेना, येते पदरी निराशा
कुणी जाणून घेईना मूक आक्रोशाची भाषा
काही क्षणांची वेदना होते आयुष्याची सखी

उमलत्या फुलांना का कोमेजण्याचीच आस?
प्राण कंठाशी आलेले, घुसमटणारे श्वास
असं मरण सोसून कोण झालं कधी सुखी?

Tuesday, January 5, 2010

ती

ती समीप माझ्या येते, निसटुन जाते
मी स्तब्ध, बावरी मलाच विसरुन जाते

ती देउन जाते अर्थ नवे शब्दांना
जोजवते हृदयी सृजनाच्या स्वप्नांना
संध्यारंगांसह नभात मिसळुन जाते

तळहाती रेखुन अलगद हलकी रेषा
तनमनी जागवुन नवी अनामिक भाषा
ती मोहरलेल्या क्षणांत हरवुन जाते

मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही
ते मनासारखे कधीच उमटत नाही
ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते

ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी,
ती कविता, आराधना, साधना माझी
निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते

Friday, January 1, 2010

चंद्र खुणावतोपुन्हा पौर्णिमेचा चंद्र खुणावतो
पुन्हा तेच भास, जीव नादावतो,
पुन्हा चांदण्यांचा रासरंग दारी,
पुन्हा श्वासातला गंध वेडावतो

पुन्हा सांज होते आतुर, कातर
पुन्हा मनामध्ये स्मृतींचा जागर
जसा भरतीच्या लाटांनी सागर
उफाळून आकाशात झेपावतो

पुन्हा तेच स्वप्न जागते लोचनी
हुरहूर तीच भांबावल्या मनी,
धुंद निशिगंध रात्रीच्या अंगणी
चांदणे पेरून मला बोलावतो

पुन्हा जीव गुंतलेला त्या क्षणांत,
सूर बासरीचे घुमती प्राणांत
पुन्हा पुन्हा माझ्या मनदर्पणात
सजण होऊन चंद्र डोकावतो