Saturday, June 22, 2013

नाही

प्रत्येक खुळ्या वाटेने मन आता धावत नाही
कविताही भावत नाही, की गझल खुणावत नाही

कोलाहल फक्त पहाते मी मूक-बधीरपणाने
पण हातभार कुठल्याही चर्चेला लावत नाही

कोशात सुरक्षित होते, पंखांनी पार बुडवले
झडतील? खुशाल झडू द्या, आता फडकावत नाही

वाढून चिघळण्याआधी वादावर पडदा पडतो
माघार तीच घेते, अन् तोही सरसावत नाही

मी दान मिळाल्यासरशी ओंजळीस झाकुन घेते
म्हणतात उघडले तर ते दात्याला पावत नाही

विसरावे मीपण तेव्हा संगती आपसुक येतो
अन् स्वत:स शोधू जाता तो कुठेच गावत नाही

तो मला भरारीसाठी आकाश तोकडे देतो,
पण माझी झेप कधीही कुंपणात मावत नाही
Thursday, June 13, 2013

मालकी

सागराची जरी मालकी घेतली 
वादळांची कुणी का हमी घेतली?

सौख्य मेण्यात घालून नेलेस तू
वेदने, मी तुझी पालखी घेतली !

गाळली, टाळली नेमकी उत्तरे 
मीच माझी जरी चाचणी घेतली 

शब्द देऊन मी पाळला रे उन्हा,
सोबतीला तुझी सावली घेतली

जन्म होता निखारा, धुनी की चिता?
जाळला जीव अन् राखही घेतली !

आश्रितासारखे दु:ख आले तरी
लेकरासारखी काळजी घेतली

आजही पावलांना गती मी दिली
आणि माघार मी आजही घेतली !

कोडे

काळोखाच्या आडोशाला उडणाऱ्या पाकोळीनं 
उजेडाचा ध्यास घ्यावा तसा वेडा हट्ट काही 
आततायी भावनांच्या भोवऱ्यात खुळं मन 
गरागरा फिरे, त्याला आर नाही पार नाही 

सावल्यांनी हकारावे उन्हालाच सोबतीला 
वादळांना किनाऱ्याने द्यावा कुशीत आसरा 
अशा काही गूढ-मूढ विचारांचे चक्रव्यूह
भेदायची शक्ती नाही, जीव एकाकी घाबरा

नेणिवांचे जाणिवांशी जुंपलेले महायुद्ध
नम्रतेच्या जिवावर उठलेला अहंकार
अतिरेकी अपेक्षांचे जीवघेणे शस्त्राघात
अगतिक देह-प्राण, कधी थांबेल संहार?

विस्कळित कल्पनांचा खच पडे जागोजाग
तुडवीत धावतात संभ्रमांचे मत्त घोडे
अस्तित्वाची धूळ-माती वाऱ्यावर उधळून
जीव कसे सोडवील अनाकलनीय कोडे?

Wednesday, June 12, 2013

जाग आता

तुझ्या दर्शनाची आस चराचरा
रखुमाईवरा जाग आता 

मंदावली रात्र पश्चिम अंगणी 
विरली चांदणी अखेरची 

पूर्वक्षितिजाशी उधळले रंग
कोवळे तरंग सोनसळी

केशरसड्याने शिंपून आकाश
किरण प्रकाश द्याया आले

तुझ्या किरिटात माणकाची आभा
तशी सूर्यप्रभा फाकतसे

मोती-पोवळ्याची प्राजक्तडहाळी
ऐकते भूपाळी पाखरांची

मढली सोन्याने मंदिराची वाट
प्रसन्न पहाट दारी आली

सनईचौघडे, मंगल गजर
भैरवजागर चोहीकडे

भक्तमेळा जमे सभामंडपात
तुझ्या चिंतनात दंगलेला

काकडआरती, चंदनसुवास
फुलांची आरास साद घाली

मुखप्रक्षालना उभी चंद्रभागा
ऊठ पांडुरंगा मायबापा


[ओवी/छोटा अभंग छंद]