Showing posts with label भक्तिधारा. Show all posts
Showing posts with label भक्तिधारा. Show all posts

Wednesday, August 28, 2013

मायबापा

विकल, विवश चित्ती वासनांचा विखार 
जनन-मरण यांचा व्यर्थ हा येरझार 
विफलपण हरोनी शांतवी अंतरंगा 
अगणित करुणेच्या सागरा पांडुरंगा

सगुणपण तुझे मी नित्य नेत्री भरावे 
अनवरत हृदी या निर्गुणाला स्मरावे 
समचरण पुजावे टेकुनी नम्र माथा 
विनित पतित भक्ता उद्धरी विश्वनाथा 

जड तनु वितळावी आणि मी मुक्त व्हावे 
चरणरजरुपाने पायरीशी रमावे 
भ्रमित जगत मिथ्या भौतिकाचा पसारा 
शरण तुज अरूपा, तूच अंती निवारा 

पसरुन विरलेली फाटकी जन्मझोळी 
विनवित विठुराया भाबडी, दीन, भोळी 
हरण करुनि न्यावे भोग, संताप, व्यापा 
चल-अचल जगाच्या एकल्या मायबापा

वृत्त - मालिनी 

Wednesday, June 12, 2013

जाग आता

तुझ्या दर्शनाची आस चराचरा
रखुमाईवरा जाग आता 

मंदावली रात्र पश्चिम अंगणी 
विरली चांदणी अखेरची 

पूर्वक्षितिजाशी उधळले रंग
कोवळे तरंग सोनसळी

केशरसड्याने शिंपून आकाश
किरण प्रकाश द्याया आले

तुझ्या किरिटात माणकाची आभा
तशी सूर्यप्रभा फाकतसे

मोती-पोवळ्याची प्राजक्तडहाळी
ऐकते भूपाळी पाखरांची

मढली सोन्याने मंदिराची वाट
प्रसन्न पहाट दारी आली

सनईचौघडे, मंगल गजर
भैरवजागर चोहीकडे

भक्तमेळा जमे सभामंडपात
तुझ्या चिंतनात दंगलेला

काकडआरती, चंदनसुवास
फुलांची आरास साद घाली

मुखप्रक्षालना उभी चंद्रभागा
ऊठ पांडुरंगा मायबापा


[ओवी/छोटा अभंग छंद]

Thursday, October 18, 2012

गोंधळ

आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ 
जळे प्राणांची दिवटी, वाजे श्वासांची संबळ 
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

दहा दिशांचा मंडप, चौक ग्रहांचा मांडला 
सूर्य चंद्र दोन दिवे, घट सागर भरला 
नऊ दिस, नऊ रात्री गर्जे ब्रम्हांड सकळ 
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

गणराया, सरस्वती, रखुमाईचा विठ्ठल
तेहतीस कोटी देवांना ग आवतण दिलं
तुझं आसन मांडलं आई काळजाजवळ
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

माझा जीव कुरवंडी, तुझी काढते ग दीठ
घाल लेकराच्या परडीत कृपा पीठ-मीठ
तुझ्या मायेचा जोगवा देई सोसायाचं बळ
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

देह कवडीमोलाचा, त्याची माळ ही गळ्यात
स्वार्थ, वासना चिंध्यांचा पोत जळतो हातात
आई, करुणेच्या ज्योतीनं या जन्माला उजळ
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

घेई धाव रे विठ्ठला

देह चिखल-मातीचा 
आत्मा साजिरे कमळ
राहो पवित्र, निर्मळ 
हेच मागणे विठ्ठला 

जन्म काजळला डोह 
मन अवसेची रात 
वाट दावी अंधारात 
तुझे चांदणे विठ्ठला

वासनांच्या जलाशयी
देह भागवी तहान
आत्म्यासाठी समाधान
तुला पाहणे विठ्ठला

जीव प्रपंची गुंतला
व्याप-ताप चिंता शिरी
आत्मा तुळसमंजिरी
तुला वाहणे विठ्ठला

पाण्याबाहेरचा मासा
तसा जीव कासावीस
काय करणी केलीस ?
घेई धाव रे विठ्ठला

पुरे पुरे झाला आता
जन्म-मरणाचा फेरा
कधी नेशील माहेरा
मायबापा रे विठ्ठला ?

Saturday, March 10, 2012

तेथ नेई पांडुरंगा

जेथ अमृताचे तळे
त्यात वैराग्यकमळे 
कैवल्याचे दाट मळे 
तेथ नेई पांडुरंगा

जेथ नाही द्वेष, क्षोभ
मोह-माया, क्रोध-लोभ
दु:ख, व्यथेचा प्रक्षोभ
नाही जाणिवांचा दंगा
तेथ नेई पांडुरंगा

जेथ जीव विसावेल
भावसमाधी लावेल
माझ्या तृषेला लाभेल
तुझ्या चरणीची गंगा
तेथ नेई पांडुरंगा

जेथ मांगल्याचा गंध
तुझ्या नामाचा मरंद
जेथ गातील स्वच्छंद
सूर तुझिया अभंगा
तेथ नेई पांडुरंगा

जेथ ब्रम्हांडाचे मूळ
संतचरणांची धूळ
असे अद्भुत राऊळ
दावी लोचनां श्रीरंगा
तेथ नेई पांडुरंगा 

Friday, March 9, 2012

गोपाळा

मिळावा जन्मजन्मी आगळा सत्संग गोपाळा 
कधी जाणार जो नाही, असा दे रंग गोपाळा 

नसे मी सत्यभामा, रुक्मिणी, कुब्जा, सखी राधा
खुळी मीरा तुझ्या ध्यानात राही दंग गोपाळा

तुझ्या कंठात मी माला, तुझ्या ओठांत मी वेणू
तुझ्या वेणूत मी वृंदावनी सारंग गोपाळा

नसे राज्ञीपदाची लालसा, ना सोस रत्नांचा
नको धनसंपदा, झाले पुरी नि:संग गोपाळा

तशी आसक्त मी नाही, तरी ही आस जीवाला,
दिसावा एकदा माझा सखा श्रीरंग गोपाळा


Friday, September 30, 2011

पाहुणी

नवरात्र जागवित आली घरी पाहुणी
माय अंबिका देखणी

मांडते मी चंदनी पाट
काय आईचा वर्णू थाट
भरजरी कुसुंबी काठ, हिरवी पैठणी
माय अंबिका देखणी

गळा शोभे माळ पुतळ्यांची
कानी कुडी मोती-पोवळ्यांची
पैंजणे सोनसाखळ्यांची, रत्ने कंकणी
माय अंबिका देखणी

साज सोन्याचा बावनकशी
चंद्रहार, वजरटिक, ठुशी
हिरकणी शोभली कशी सोन्याच्या कोंदणी
माय अंबिका देखणी

अंबा जगतजननी माउली
आली शकुनाच्या पाउली
नित्य राहो तुझी सावली माझ्या ग अंगणी
माय अंबिका देखणी 

Tuesday, September 13, 2011

गौरितनय

लंबोदर, शूर्पकर्ण, अमित, विनय
भालचंद्र, धूम्रवर्ण, गौरितनय ||धृ||

ब्रह्मतत्व तूच, तूच आत्मरूप
वाणीरूप, नामरूप, जीवरूप
अद्वितीय, ज्ञानरूप, मंगलमय ||१||

त्रिविधशक्तिरूप तूच, तू गुणेश,
उत्पत्ती, स्थिति, लय तू, श्रीगणेश
पाशांकुश धारिसी हे सांबतनय ||२||

तीन काल, तीन देह आणि त्रिगुण
यांपरता तू, निर्गुण आणि सगुण
ओंकारा, तारि भक्त देत अभय ||३||

Thursday, July 7, 2011

निजधामा नेई

मनाच्या अवस्था 
आसक्ती विरक्ती
विठू तुझी भक्ती 
हेच सत्य ||

तुझ्या दर्शनाचा 
अहोरात्र ध्यास
येताजाता श्वास
नाम जपे ||

नको नको झाला
मायेचा पसारा
भौतिकाचा सारा
डामडौल ||

प्रपंच मी केला
नेटकाच देवा
आता तुझी सेवा
हेच ब्रीद ||

तुवा सोपविले 
कार्य पुरे होई 
निजधामा नेई
पांडुरंगा ||

Monday, July 4, 2011

स्वामी समर्थ


वटवृक्ष छायेखाली
नांदती स्वामी समर्थ
अक्कलकोट हे तीर्थ
पुण्यभूमी ||

दत्त अवतार दिव्य
देती भक्तांना आधार
स्वामीभक्तिने उद्धार
जगी होई ||

मूर्ति भव्य, तेज:पुंज
शांत, मायाळू, सात्विक
कृपादृष्टि अलौकिक
भक्तांवरी ||

नित्य पाठीशी भक्तांच्या
स्वामींची कृपाळू छाया
जशी माउलीची माया
बालकाला ||

व्यर्थ जन्म मानवाचा
सद्गुरूवाचून होई
राहो समर्थांच्या ठायी
श्रद्धा  माझी ||

स्वामीनामाचा गजर
मनोभावे आराधना
हीच माझी उपासना
जन्मांतरी ||

Wednesday, June 1, 2011

आदेश

मजसाठी योजियले जे, ते कार्य पुरे केले मी
आता मज प्रस्थानाचा आदेश मिळावा स्वामी

मंतरलेल्या ऊर्मींचे आभाळ पांघरुन झाले
चौर्‍यांशी लक्षांच्या या चक्रात संचरुन झाले
भोवळ येते प्राणांना, आवेग विरावा स्वामी

का भ्रामक अनुबंधांच्या वचनात व्यर्थ गुंतावे?
जाणीव दुरावत जावी अन् अखेरचे थांबावे!
थकलेल्या आसक्तीचा उद्धार करावा स्वामी

उसळत्या भोग-योगाच्या उत्कटल्या आतुर वेगा
सांभाळावे, अन् घ्यावी झेलून शिरावर गंगा
पाताळ गाठण्याआधी आधार मिळावा स्वामी

स्वामी, या जड देहाला सूक्ष्मात विलीन करावे
भेदून कोश कायेचा प्राणांना मुक्त करावे
आत्म्याचा परमात्म्याशी संयोग घडावा स्वामी

Sunday, October 10, 2010

जोगवा

दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माउली
गांजती त्रिविध ताप, संताप, व्याप, तू होई साउली ॥

घेउनी कायेची परडी, तुझ्या मी आले ग दारी
चेतवी पोत मनाचा, आई अंबे सत्वर उद्धारी
दीन ही लेक तुझी विनवी येई करुणेच्या पाउली ॥

त्यागुनी तुझी पायरी, सांग कशी जाऊ मी माघारी,
दाह हा तनामनाचा सोसेना, विटले या संसारी
तुझ्या चरणांचे अमृत दे माते, थांबव ही काहिली ॥

नांदती गर्वासुर, दंभासुर, नगरी मलीन ही झाली
मातले षड्रिपु, फिरती अस्त्रे-शस्त्रे परजित भवताली
चंडिका माय भवानी दुष्टांच्या संहारा धावली ॥

तुझी मंगलमय मूर्ती सदैव नांदो माझ्या अंतरी
ज्योत आशिर्वादाची अखंड तेवत राहो मंदिरी
ब्रम्ह तू, माया तू, शक्ती-दुर्गा तू, सकळां पावली ॥

Wednesday, July 21, 2010

अरूपाचे रूप

अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई


भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत


दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग


भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात


मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन

Wednesday, May 26, 2010

तुझ्या रूपातले राग

काही तालात, सुरात, काही लयीत चुकले
तुझ्या रूपातले राग मनापासून शिकले

रात्री जागवल्या मालकौंस, बागेसरी गात
आर्त विराण्या गाइल्या जोगियाच्या प्रहरात
भल्या पहाटेला भैरवाच्या चरणी झुकले

काळजात कोमेजले मुक्या कळ्यांचे नि:श्वास
तरि ग्रीष्मकहराचा नाही केला रे दुस्वास
सारंगाच्या सुरांत या वेड्या जिवाला जपले

मल्हाराच्या लडिवाळ, मृदू सरी श्रावणात,
आळविले केदाराचे सूर संध्यावंदनात
तुला भूपात गाताना मीच मला हरवले

अखेरच्या मैफलीत विठू लाज माझी राख
ऐक प्राणांतून घुमणारी भैरवीची हाक
दयाघना, भेट आता; आळवून मी थकले

Thursday, March 25, 2010

चैत्रगौर

गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला

घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे

सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी

सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी

गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी

रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती

जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

Wednesday, November 18, 2009

बळ

किती, कसे उपकार तुझे मानू मी अनंता?
सृजनाचा कल्पवृक्ष मला दिला भगवंता!

असो भले की वाईट, इथे जे काहीही होते,
तुझ्या इच्छेने, आज्ञेने, तुझ्या मर्जीने ते होते

माझ्या चुका, तुझी क्षमा; माझी हाव, तुझे देणे,
तुझी आभाळसाउली माझ्यासाठी भाग्यलेणे


तुझ्या अगाध लीलांना नाही आदि, नाही अंत
तूच सखा, पाठीराखा, मला कशाची रे खंत?

नाही माघार घेणार, येवो वादळे कितीही,
संकटांचे भय नाही, झुंजण्याचे बळ देई!

Friday, June 19, 2009

स्फूर्ति

तूच ध्यानी, मनी, स्वप्नी, तुला कसे विसरावे?
तुझ्या चिंतनी रमावे, तुझ्या ध्यासात झुरावे

तुझे ध्यान माझी पूजा, तुझी भक्ती माझी शक्ती
तुझ्या दर्शनाने मिळे सा-या दु:खातून मुक्ती

तुझ्या चरणांची धूळ रोज मस्तकी लावावी
माझ्या भावनांची फुले तुझ्या चरणी वहावी

पंचप्राणांची आरती लोचनांच्या निरांजनी
जळे कापूर देहाचा, धूप मनाचा चंदनी

माझ्या श्रद्धेच्या मंदिरी सदोदित तुझी मूर्ती
तूच आयुष्याचे सार, तूच जीवनाची स्फूर्ति

Tuesday, June 2, 2009

परब्रह्म

परब्रह्म विटेवरी दोन्ही कर कटेवरी
वाट भक्ताची पाहतो देव पुंडलिकादारी

संत जनाईच्या घरी दळण कांडण करी
ओव्या गातो भक्तासंगे भावाचा भुकेला हरी

देव एकनाथाघरी कावडीने पाणी भरी
सांभाळितो चोखोबाची गुरे सावळा मुरारी

तुक्याचे अभंग तारी कान्होपात्रेला उद्धारी
निवृत्ति, सोपान, मुक्ता ज्ञानियाचा हात धरी

दुमदुमली पंढरी रिंगणात वारकरी
नित्यनेमाने चालते आषाढी कार्तिकी वारी

संत मी ना वारकरी आळविते तुला तरी
आस मुक्तीची घेऊन आले देवा तुझ्या दारी

Tuesday, May 26, 2009

मुक्ती

रोमरोमात जागली तुझ्या मुरलीची साद
दाही दिशा ओलांडून घुमे आज अंतर्नाद

भल्या पहाटे प्राणांत जणु काकडा पेटला
तिन्ही जगांचा नियंता अंतरंगात भेटला

आसावल्या पावलांना दिसे वाट पंढरीची
सावळ्याच्या भेटीसाठी नेते ओढ़ अंतरीची

द्रौपदीच्या दारी उभा चराचराचा हा स्वामी
भुकेल्याची तृप्ति इथे जाणवते अंतर्यामी

दूर भौतिकापासून, भक्तिमार्गाला निघाले
अंतर्बाह्य बदलले, मन विश्वरूप झाले

लक्ष चौ-यांशीचे फेरे किती काळ आता साहू?
मुक्ती देई मायबापा, असा अंत नको पाहू

Sunday, May 24, 2009

करुणा कर

सांब सदाशिव शंकर नीलकंठ गौरीहर
हे उमापती महेश भूतनाथ गिरिजावर

करी धारिसि त्रिशुल डमरु हे नटवर शशिशेखर
अंगी चिताभस्म लेप सर्पमाळ व्याघ्राम्बर

मदन दग्ध करिसि तूच हे त्रिनेत्र नंदीश्वर
रौद्र तुझे तांडव ते भीषण अन् प्रलयंकर

शंभो कैलासनाथ भालचंद्र गंगाधर
तूच सत्य, शिव, सुंदर करुणाकर करुणा कर