Monday, July 23, 2012

हिंदोळा

तुझ्या ओठांवर हसू,
माझे भिजलेले डोळे 
नको टिपू एवढ्यात 
रंग आसवांचे ओले 

रंग आसवांचे ओले 
चढतील मनावर 
आणि तुझ्या पापण्यांत 
उचंबळेल सागर

उचंबळेल सागर
भिडेल तो आभाळाला
नको घालू उगा बांध,
वाहू दे या आवेगाला

वाहू दे या आवेगाला
मनमोकळेपणाने
प्रवाहात भिजून त्या
सूर गातील दिवाणे

सूर गातील दिवाणे
ऊन-पावसाचे गाणे
कधी दु:खाच्या बंदिशी,
कधी सुखाचे तराणे

कधी सुखाचे तराणे
चिंब सरींनी छेडले
तुझ्या सुरांच्या मेघांनी
माझे आभाळ वेढले

माझे आभाळ वेढले
गुणगुणून कानात
गात्र गात्र धुंदावले
पाय नाचले तालात

पाय नाचले तालात
खुळावला मनमोर
त्याचा पिसारा फुलला
तुझ्या मंदिरासमोर

तुझ्या मंदिरासमोर
झुले नवलहिंदोळा
तुझी नक्षत्र-बहार,
माझं निर्माल्य-पाचोळा
!

Friday, July 20, 2012

जुगलबंदी

त्याचा एकुलता एक जगावेगळा राग 
तार अन् अतितार सप्तकातच विस्तारणारा 
कायम केवळ द्रुत लयीतला 
फक्त दोनच स्वरांचा .............
षड्ज आणि पंचम.... अचल, अविचल स्वर 
आपल्या जागी ठाम !
[मी म्हणेन ती पूर्व]

तिच्या रागमालेत मात्र 
नेमके हेच अचल स्वर वर्ज्य!
तिचे स्वर बहुशः कोमल, क्वचितच तीव्र 
तळ्यात-मळ्यात, दबलेले गळ्यात!
मंद्र सप्तकातच घुटमळणाऱ्या तिच्या बंदिशी 
क्वचितच मध्यात मध्यमाला स्पर्श करणाऱ्या 
मध्यमातून सुरू होत मध्यमात संपणाऱ्या 
मध्यम.......तिचा स्वर, पाचवीला पुजलेला 
ग्रह, न्यास, विस्तार सारं काही मध्यम!
[हो, चालेल मला]

काही केल्या 
त्याचे स्वर उतरत नाहीत, तिचे स्वर चढत नाहीत 
बेसूर, भेसूर मैफल नुसती! 

कशा जुळतील त्यांच्या तारा?
कधी रंगेल सुरेल जुगलबंदी?
अधल्या-मधल्या सुरांचा सनातन, 
निरुत्तर करणारा प्रश्न ...........
सोडवायचा 
की .............
सोडून द्यायचा?

Wednesday, July 18, 2012

तू इथे नको भेटूस प्रिये.......

साहिर लुधियानवी यांच्या अजरामर 'ताजमहल'चा अनुवाद 

हा ताज प्रीतिचे प्रतिक, भावना तुझी खुशाल असू दे 
या रम्य स्थळावर असेल श्रद्धा तुझी, खुशाल असू दे 
तू इथे नको भेटूस प्रिये, अन्यत्र कुठेही भेट मला ...............

या शाही दरबारी गरीबांचे येणे व्यर्थ, निरर्थक 
ज्या वाटेवरती मोहर असते शाही सामर्थ्याची,
प्रेमी जीवांनी त्या वाटेवर जाणे व्यर्थ, निरर्थक

जगजाहिर प्रेमाच्या या खोट्या पडद्याआड प्रिये तू 
असतील पाहिल्या खुणा किती शाही अन् वैभवशाली 
असशील पाहिली आणि अपुली काळोखी, वैराण घरे,
मृत राजांची थडगी पाहुन रोमांचित, पुलकित झाली 

अगणित होते जगात ज्यांनी प्रीत अंतरातुन केली,
म्हणेल कोणी भाव तयांचे पवित्र वा उत्कट नव्हते?
जाहिर करण्यासाठी नव्हते साधन पण त्यांच्यापाशी,
तुझ्या नि माझ्यासारखेच ते गरीब अन् निर्धन होते 

हे कोट, बुरुज, ही तटबंदी, या इमारती, ही थडगी 
जुलमी राजेरजवाड्यांच्या महानतेचे स्तंभ फक्त 
या विश्वाच्या वक्षावरच्या जुनाट अन् ओल्या जखमा,
भळभळते ज्यांच्यातुन अपुल्या पूर्वसुरींचे रक्त 

सांग सखे तू, त्यांचेही तर प्रेम कुणावर असेल ना?
ज्यांच्या दिव्य कलेने या शिल्पाला सुंदर रूप दिले 
परंतु त्यांच्या प्रिय पात्रांची नावनिशाणी नसे कुठे,
अंधाऱ्या कबरींवर त्यांच्या कुणी दीप ना पाजळले 

हा यमुनेचा रम्य किनारा, हे महाल अन् उपवन हे 
भव्य कमानी, भिंती-दारे अनुपम नक्षी ल्यालेली 
ही केवळ एका राजाने संपत्तीचा घेत सहारा 
आम्हां गरिबांच्या प्रीतीची क्रूर मस्करी केलेली 

तू इथे नको भेटूस प्रिये, अन्यत्र कुठेही भेट मला ...............
आणि ही मूळ कविता

ताज तेरे लिये एक मजहर-ए-उल्फ़त ही सही 
तुझको इस वादी-ए-रंगीं से अकीदत ही सही 
मेरी मेहबूब, कहीं और मिला कर मुझसे 

बज़्म-ए-शाही में गरीबों का गुजर क्या मानी?
सब्त जिस राह पे हों सतवत-ए-शाही के निशां
उनपे उल्फ़तभरी रूहों का सफ़र क्या मानी?

मेरी मेहबूब, पस-ए-पर्दा-ए-तशहीर-ए-वफ़ा
तूने सतवत के निशानों को तो देखा होता
मुर्दा शाहों के मकाबिर से बह्लनेवाली
अपने तारीक मकानों को तो देखा होता

अनगिनत लोगों ने दुनिया में मुहब्बत की है
कौन कहता है कि सादिक न थे जज्बें उनके,
लेकिन उनके लिये तशहीर का सामान नहीं,
क्यों कि वो लोग भी अपनी ही तरह मुफ़लिस थे

ये इमारात-ओ-मकाबिर, ये फ़सीलें, ये हिसार,
मुत्लक-उल-हुक्म शहेनशाहों की अजमत के सतूं
सीना-ए-दहर के नासूर हैं, कुहना नासूर,
जज्ब है जिसमें तेरे और मेरे अजदाद का खूं

मेरी मेहबूब, उन्हें भी तो मुहब्बत होगी
जिनकी सन्नाई ने बख्शी है इसे शक्ल-ए-जमील
उनके प्यारों के मकाबिर रहे बेनाम-ओ-नमूद
आजतक उनपे जलाई न किसी ने कंदील

ये चमनजार, ये जमुना का किनारा, ये महल
ये मुनक्कश दर-ओ-दीवार, ये ताक़
इक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर
हम् गरीबों की मुहब्बत का उडाया है मजाक़
मेरी मेहबूब, कहीं और मिला कर मुझसे

साहिर लुधियानवी

Sunday, July 15, 2012

सहज निघाला विषय तरी


सहज निघाला विषय तरी तो जाइल कुठल्या कुठे दूरवर 

नसता काही कारण कोणी विचारील 'का उदास तू ग?'
आणि विचारिल कोणी, 'कसली व्यथा तुला, का हताश तू ग?'
विस्कटलेल्या रुक्ष बटांना बघून कोणी कुजबुज करतिल
पिचलेल्या बांगड्या बघुनही कितीतरी टोमणे मारतिल 
थरथरणारे हात पाहता खवचट, तिरके बोल बोलतिल

क्रूर, दुष्ट हे लोक तुझ्या प्रत्येक कृतीचा कीस पाडतिल 
सहज बोललो असे दाखवुन चर्चेमध्ये मला आणतिल
त्यांच्या असल्या चर्चांचा परिणाम नको व्हायला तुझ्यावर 
तुझ्या मनातिल भाव अन्यथा वाचतील ते तुझ्या मुखावर 
काही झाले तरी प्रश्न तू नको विचारू कधीच त्यांना 
माझ्याबद्दल उगीच काही बोलु नको तू मुळीच त्यांना 

सहज निघाला विषय तरी तो जाइल कुठल्या कुठे दूरवर 

ही आहे मूळ रचना : बात निकली तो बहोत दूरतलक जायेगी 

बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी

लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे
ये भी पूछेंगे के तुम इतनी परेशां क्यूँ हो
उंगलियां उठेंगी सूखे हुए बालों की तरफ़
एक नज़र देखेंगे गुज़रे हुए सालों की तरफ़
चूड़ियों पर भी कई तंज़ किये जायेंगे
काँपते हाथों पे भी फ़िकरे कसे जायेंगे

लोग ज़ालिम हैं हर एक बात का ताना देंगे
बातों बातों में मेरा ज़िक्र भी ले आयेंगे 
उनकी बातों का ज़रा सा भी असर मत लेना
वरना चेहरे की तासुर से समझ जायेंगे
चाहे कुछ भी हो सवालात ना करना उनसे
मेरे बारे में कोई बात न करना उनसे

बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी

- कफील आजेर

Saturday, July 14, 2012

तहान

पुन्हा एकवार कैफ़ी आज़मी यांच्या एका अपूर्व रचनेनं 'तहान' वाढवली. लालारुख चित्रपटात या गीताचे जे दोन भाग आहेत, त्यातल्या आशा भोसले यांच्या गंभीर भाव असलेल्या भागाचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. मला यातली हलकीफुलकी रचना मनापासून आवडत असली ऐकायला तरी अनुवादासाठी  माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे गंभीर रचना घेतली आहे 

ओझरत्या दर्शनाने उचंबळली तहान 
रूप अपूर्व तुझे तू दाखवायलाच हवे 
तेज उरे ना चंद्रात, फिकटल्या तारकाही 
माझे जिणे उजळाया तुला यायलाच हवे 

विरहात रात्र रात्र नित्य जागविसी मला,
जा, तुलाही दुराव्यात नीज येणारच नाही 
तुझ्या पापणीमधून रोज झरेल सकाळ,
काळजात कळ सले, तशी सरेल निशाही 

नाही इच्छा, ना अपेक्षा उरली न काही आस 
प्रीतीवाचून न आता अन्य भावना मनात 
माझ्या दुर्दैवाचे फेरे, त्यात त्रास या जगाचा 
अदया रे, एवढीच तुझी कृपा जीवनात ! 



आणि ही मूळ रचना 

प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखलाके
तुझको परदा रुख़-ए-रोशन से हटाना होगा 
चांद में नूर न तारों में चमक बाकी है 
ये अंधेरा मेरी दुनिया का मिटाना होगा 

ऐ मुझे हिज्र की रातों में जगानेवाले 
जा कभी नींद जुदाई में न आयेगी तुझे 
सुबह टपकेगी तेरी आंख से आंसू बनकर 
रात सीने की कसक बनके जगायेगी तुझे 

कोई अरमां है, न हसरत है, न उम्मीदें हैं 
अब मेरे दिल में मुहब्बत के सिवा कुछ भी नहीं 
ये मुकद्दर की खराबी, ये जमाने का सितम 
बेवफ़ा तेरी इनायत  के सिवा कुछ भी नहीं 

Saturday, July 7, 2012

तहान

युगांची तहानलेली, तापलेली धरणी 
सोसत आलीय जन्माची असोशी 
आतुर डोळ्यांत प्राण आणून 
वाट पहातेय तुझ्या घनघोर बरसण्याची 

विरहाच्या वणव्यात होरपळणाऱ्या 
भेगाळ, सुकल्या, कोमेजल्या कायेला 
कधी रे भिजवशील चिंब चिंब 
अमृताच्या वर्षावानं?
कधी रुजवशील सृजनाचे कोवळे कोंब
तिच्या आसुसलेल्या कुशीत?

आळवून, वाट पाहून थकली-भागली 
हिरमुसली बिचारी 
आणि अचानक ..........

वेळूच्या बनात गुणगुणला वारा
आभाळाच्या हातातून निसटला पारा
अन् एक चुकार, अवखळ, खट्याळ मेघ
क्षणांत सुखाचं शिंपण देऊन
'थांब, थांब' म्हणेतो निघूनही गेला!

थरथरलेली, मोहरलेली चकित धरणी,
चातक अवाक, पावशा स्तब्ध!
तनाच्या घुमटात मनाचा पारवा
भान विसरून घुमतोय, फिरतोय!

अरे खट्याळ, वेल्हाळ मेघा,
युगायुगांची तहान तिची
अशा क्षणांच्या शिंपणानं
कधीतरी भागेल का रे?
एवढ्यानेच कशी होईल ती तृप्त?

तुझ्या घनघोर आवेगाचे उसळणारे अमृतघट
मुक्तपणे रिते करशील तिच्या तना-मनावर,
तेव्हाच होईल तिच्या जन्माचं सार्थक!

सांज

उगवती सांज 
पानांहाती चिपळ्या, फुलांकडे झांज 

प्रवाहात दिवे 
मावळत्या दिसालाही अर्घ्य द्याया हवे 

सांजभुली रंग 
तटावर औदुंबर विचारांत दंग 

सूर्य दारी उभा 
पश्चिमेच्या मुखावर नवतीची प्रभा 

नभांवर नक्षी
पिलांसाठी कोटराच्या वाटेवर पक्षी

सोन्याचा कळस 
केशराच्या पताकांनी सजला पळस 

मंद सळसळ 
नामजप करी जसा विरागी पिंपळ 

देव गाभाऱ्यात 
आसमंत सारा नजरेच्या पहाऱ्यात 

Thursday, July 5, 2012

चढण

तोल सावरावा अशी नव्हतीच ती चढण 
आणि ओलांडून जावं असं नव्हतं वळण 
वाट नागमोडी, कुठं कडा, कुठं घसरण 
उन्मळून कोसळावे असे आले किती क्षण

कुठं दिवा ना काजवा, मिट्ट काळोखी लांबण
ठाव नाही मुक्कामाचा, दिशाहीन वणवण
सैरभैर व्हावा जीव असं मूक रितेपण
वाटे, असेल का याच्याहून सुखाचं मरण?

पैलतीरी बरसला अशा अवेळी श्रावण
आणि मोहरून आला कोमेजला कणकण
लख्ख उजळलं मन, जसं सुटावं ग्रहण
दिशादिशांत झळाळ अलौकिक, विलक्षण

वाट मोहमयी झाली आणि लाघवी वळण
इथंतिथं पायांखाली सोनचाफ्याचं शिंपण
त्याच वाटेवर आता मन घालतं रिंगण
असो चढण, वळण, घसरण, उतरण 

Sunday, July 1, 2012

खुळा पाऊस

जाणून धरेचा ध्यास 
खुले आकाश 
अचानक भरले 
घन गर्द दाटता
गात्र गात्र मोहरले 

चाहूल सख्याची घेत 
हळूच कवेत 
लाजली धरती 
घन निळे-जांभळे 
झरले वृक्षांवरती 

पाण्यात पाहती बिंब 
सुखाने चिंब 
तरूंवर वेली
सत्यात उतरली 
स्वप्ने रंगवलेली 

दरवळे हवासा गंध 
कराया धुंद 
बरसले पाणी 
सुचवून फुलांना 
थेंबनाचरी गाणी 

ओढाळ मनाची आस 
तुझे आभास 
घनागत झरले 
मन दाटुन येता 
व्याकुळ डोळे भरले 

घनरिते पापणीबंध 
अनावर गंध 
तरळला भवती 
फिरफिरुन स्मृतींची
तृणपाती लवलवती 

हा असा खुळा पाऊस 
नको देऊस 
पिसाट मनाला 
बरसेल घनातुन 
जाळिल आत जिवाला 


उपाशी

केलास तू, करुन का विसरून जाशी?
माझा करार नव्हता मरणा तुझ्याशी 

गेले निघून जखमा करुनी शिकारी,
एकेक घाव सलतो अजुनी उराशी

ओढे कुणी नकळता भलताच धागा,
मी गुंतते, अडकते प्रतिकूल पाशी

तू घेतल्यास शपथा विसरून जाण्या,
पारायणे करुन मी जपल्या मनाशी

होतात दूर सगळी क्षणसंग नाती,
आखीव वाट चुकुनी सुटता जराशी

काहीतरी करुन मी फुलतेच आहे,
आत्मा तृषार्त जरि वा मनही उपाशी