Saturday, May 18, 2013

चांद

जावेद अख़्तर यांच्या एका सुंदर गझलचा अनुवाद करण्याचा हा प्रयत्न

सुकी डहाळी, एकट पक्षी आणि फिकटसा चांद
डोळ्यांच्या मरुभूमीमधला आसूभिजला चांद

त्या माथ्याला चुंबुन आता किती लोटला काळ
सौभाग्याचा तिलक तसा ज्या भाळी सजला चांद

सुरुवातीला वाटलीस तू अलिप्त, परकी खूप
तसा प्रतिपदेला असतो ना धूसर, भुरका चांद

या सौख्यांनी संपणार ना तू नसण्याचा त्रास
लाटांवर कधि तरंगतो का सरितेमधला चांद?

आता याचे करून तुकडे वाटुन घेऊ भाग
ढाका, रावळपिंडी आणिक दिल्लीमधला चांद!

मूळ रचना : जावेद अख़्तर
स्वैर भावानुवाद : क्रांति

ही मूळ रचना

सूखी टहनी तनहा चिडिया फीका चांद
आंखों के सहरा में एक नमी का चांद

उस माथे को चूमे कितने दिन बीते
जिस माथे की ख़ातिर था इक टीका चांद

पहले तू लगती थी कितनी बेगाना
कितना मुब्हम होता है पहली का चांद

कम हो कैसे इन खुशियों से तेरा ग़म
लहरों में कब बहता है नदी का चांद

आओ अब हम इसके भी टुकडे कर लें
ढाका, रावलपिंडी और दिल्ली का चांद

Friday, May 17, 2013

सावल्या

रात्र जागवाया सांजेलाच येतात सावल्या 
पार दूरातून, अदृष्टाच्या माळरानातून 
आणि संगतीला मारव्याचा संन्यस्त धैवत 
वितळत्या किरणांचे आर्त सूर पांघरून 

घुसमटलेली हवा, हिरमुसलेला ऋतू 
खाचा झालेल्या डोळ्यांना खुपणारे वाळवंट
आटलेल्या अखेरच्या झऱ्यासारखा कोरडा
तान समेवर येता येता सुकलेला कंठ

जपलेल्या खाणाखुणा होत जाती दृष्टिआड
आषाढाचा गच्च मेघ तसं काळीज तुडुंब
कुणी घरंदाज लेक-सून सोशिक, सालस
तसा पापणीच्या उंबऱ्यात समंजस थेंब

अखेरच्या किरणांची रंगरंगोटी पुसून
हळुहळू सांज होत जाते एकाकी, मलूल
भेदरल्या सावल्यांना घेतो काळोख कवेत
कधी अवसघोंगडी, कधी चांदण्यांची झूल 

भांडण

ज्याच्या-त्याच्या तत्वासाठी भांडत आलो आपण नियमित 
घरपण विसरुन घरही झाले आखाडा किंवा रण नियमित 

कधी सकारण, कधी अकारण अहंकार गोंजारत गेलो 
निसटत गेले परस्परांना समजुन घेण्याचे क्षण नियमित 

'इथे सुखाला प्रवेश नाही' अशी सूचना दरवाजावर 
तिरसट वागुन घालत गेलो आनंदावर विरजण नियमित 
कुठल्या वळणावरून येइल वादग्रस्त प्रश्नांचे वादळ,
कुंपण, फाटक, छप्पर, भिंती यांच्यावरही दडपण नियमित 

चुका कुणाच्या, दोष कुणाचे पुन्हापुन्हा याचीच उजळणी 
कोण किती तर्कटी नि ताठर, या मुद्द्यावर भांडण नियमित 

शांतपणावर उदक सोडले, विश्वासाचे श्राद्ध घातले 
विवेक, संयम, विचारशक्ती यांच्या नावे तर्पण नियमित 

एकच रस्ता तरी न मिटले मनामनातिल अनंत अंतर 
'आपण' नाही झालो, जपले 'तू-पण' आणिक 'मी-पण' नियमित