Thursday, February 17, 2011

जोगी

सृजनाचा अनवट राग,
तशी अलवार फुलांची जाग
कुणि अलख गर्जतो जोगी,
त्याला स्वप्न हवे ते माग

दंवभरल्या डोळ्यांतून सांडते
सांजनिळे आभाळ,
ऋतुस्पर्शी आर्जव त्याच्या ओठी,
तुझा मूक अनुराग!

अव्यक्तामधुनी व्यक्त विलक्षण भाव,
जसा घननीळ
मुरलीतनु स्पर्शुनी उधळित जाई
धुंद रंग-रस-राग!

अनुरक्त तुझ्यावर चंद्र
घुमवितो चांदणहळवी शीळ
उतरेल खुळा ग, धरून येइल
चंद्रकळेचा माग!

देहावर गोंदणखूण,
प्राण स्पर्शून सखा वेल्हाळ
जाईल घेउनी नीज,
तुला ग जन्मभराची जाग!

2 comments:

 1. जन्मभराची जाग म्हणजे खूप झाले .. मागिताल्यापेक्षाही मोठे देणे ..

  ReplyDelete
 2. अप्रतिम केवळ अप्रतिम... खूप आवडली कविता !!!

  सृजनाचा अनवट राग,
  अलवार फुलांची जाग,
  सांजनिळे आभाळ,
  ऋतुस्पर्शी आर्जव ,
  चांदणहळवी शीळ,
  चंद्रकळेचा माग

  किती सुंदर शब्द आहेत ? त्याहून सुंदर भावना आणि तितक्याच सुंदर कल्पना....

  अतिशय सुंदर!

  ReplyDelete