Monday, November 7, 2011

माग


त्या सावळ्या सख्याचा कोठून माग घ्यावा ?
शब्दांत शोधता मी अर्थात तो असावा !

यमुना, कदंब, धेनू, नवनीत, रासलीला
का मोरपीस अजुनी कुरवाळते दिठीला 
मनगोकुळात घुमतो त्याचा सुरेल पावा 

ते रूप लाघवी मी काव्यात गुंतवावे
तालासुरांत त्याला गुंफून नित्य गावे
वाटे, परी उडे तो भारी खट्याळ रावा !

माळून कौतुकाने वेणीत चांदराती 
मी वाटुली पहावी उजळून नेत्रवाती 
तो खोडसाळ वारा, दारावरून जावा !

भासात मी जगावे, ध्यासात दंग व्हावे
लावून आस वेडी ज्योतीपरी जळावे
त्याने उगा छळावे, करुनी कुटील कावा 

असतो सभोवताली तरिही कुठे दिसेना
माझ्याच अंतरी तो, नेत्रांत का ठसेना ?
स्वप्नात भेटणारा सत्यात का नसावा ?

[मराठी कविता समूहाच्या ई-दिवाळी अंक-२ मध्ये पूर्वप्रकाशित]

1 comment:

  1. क्रांति, भन्नाट लिहिलं आहेस. समोर असतीस तर तुला खरंच साष्टांग नमस्कार केला असता.

    ReplyDelete