Monday, November 21, 2011

संचारबंदी

व्यथेच्या पहाऱ्यात आनंद बंदी
तटाभोवती यातनांची शिबंदी

खुशालीत मी, दु:ख वाढीव लाभे
भले विश्व सोसेल दुष्काळ, मंदी

जगावे कसे? श्वास कैदेत आहे
मरावे कसे? जीव देण्यास बंदी

खुलासे नको रे, दिलासाच दे ना
जरा ऐक आक्रंदने मुक्तछंदी

फुले त्रासलेली, कळ्या गांजलेल्या
उदासीन झाडे, ऋतू जायबंदी

कुणी कापले दोर माघारण्याचे?
कडेलोट व्हावा, अशी ही बुलंदी

मनाच्या महाली सदाची अशांती,
किती वाढवू रोज संचारबंदी ?

3 comments:

 1. जगावे कसे? श्वास कैदेत आहे
  मरावे कसे? जीव देण्यास बंदी


  khup khup bhavali hi gazal manala

  ReplyDelete
 2. जगावे कसे ? श्वास कैदेत आहे
  मरावे कसे ? जीव देण्यास बंदी

  फुले त्रासलेली, कळ्या गांजलेल्या
  उदासीन झाडे, ऋतू जायबंदी

  अप्रतिम!!

  शेवटचा संदिग्ध, अस्पष्ट - मला कळला नाही.

  ReplyDelete