Tuesday, February 26, 2013

रेशिमगाठी

ती व्याकुळ होउन गाते 
भावार्त, निरागस गाणी तरुण व्यथांची 
अन् मनस्मरणीवर जपते                     
विस्मरली नावे विरलेल्या शपथांची 

ती केविलवाणे हसते
भरल्या डोळ्यांच्या रित्या करून पखाली 
दंव जसे फिकटते, विरते 
सुकतात आसवे तशीच थबकुन गाली 

ती अलिप्त होउन लिहिते 
कधि तिचीच असुनी नसते अशी कहाणी 
वाचून मनाशी म्हणते,
'इतकी अगतिक का असते कुणी दिवाणी?'

भिरभिरत एकटी फिरते 
भंगून विखुरल्या स्वप्नांच्या वाटांनी 
फिरफिरुन रोज सावरते 
घरकूल कैकदा विस्कटले लाटांनी 

मुखवटे कितीक घडविते 
लावून वर्ख ती फसव्या हास्यासाठी 
हट्टाने बांधत बसते 
तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी 

No comments:

Post a Comment