Sunday, March 25, 2012

सख्या आज तरी ये ना रे

मराठी कविता समुहाच्या काव्यछंद - लावणी या उपक्रमासाठी   लावणी रचण्याचा हा माझा पहिलावहिला [नवसाचा] प्रयत्न.  या प्रकारच्या लावणीला बैठकीची लावणी म्हणतात, असं जाणकारांनी सांगितलं. 

मनी रातराणी दरवळे, तरी तळमळे जीव हा सजणा
जशी रात अनावर चढे, जाऊ कुणिकडे सांग मनरमणा
तुझी याद अशी गुलजार, करी बेजार, सोसवेना रे 
सख्या आज तरी ये ना रे

बघ गर्द निळी पैठणी, नार देखणी आज ही नटली
ठुशी, चंद्रहार, गळसरी, सुबक साजिरी अंगठी सजली
तुजवीण सुना शृंगार, जिवाला भार सोसवेना रे
सख्या आज तरी ये ना रे

पदी पैंजण शोभुन दिसे, मेंदीचे ठसे लाल हे भलते
हातात काकणे-चुडे, घडवुनी विडे वाट मी बघते
तुझी प्राणसखी सुकुमार, विरह आजार सोसवेना रे
सख्या आज तरी ये ना रे

कुठे गुंतलास राजसा, येईना कसा अजून दारात
तुझ्या वाटेवर बावरा, जीव घाबरा झुरतो दिनरात
बरसावी शीतल धार, उरी अंगार सोसवेना रे
सख्या आज तरी ये ना रे

Saturday, March 10, 2012

तेथ नेई पांडुरंगा

जेथ अमृताचे तळे
त्यात वैराग्यकमळे 
कैवल्याचे दाट मळे 
तेथ नेई पांडुरंगा

जेथ नाही द्वेष, क्षोभ
मोह-माया, क्रोध-लोभ
दु:ख, व्यथेचा प्रक्षोभ
नाही जाणिवांचा दंगा
तेथ नेई पांडुरंगा

जेथ जीव विसावेल
भावसमाधी लावेल
माझ्या तृषेला लाभेल
तुझ्या चरणीची गंगा
तेथ नेई पांडुरंगा

जेथ मांगल्याचा गंध
तुझ्या नामाचा मरंद
जेथ गातील स्वच्छंद
सूर तुझिया अभंगा
तेथ नेई पांडुरंगा

जेथ ब्रम्हांडाचे मूळ
संतचरणांची धूळ
असे अद्भुत राऊळ
दावी लोचनां श्रीरंगा
तेथ नेई पांडुरंगा 

Friday, March 9, 2012

गोपाळा

मिळावा जन्मजन्मी आगळा सत्संग गोपाळा 
कधी जाणार जो नाही, असा दे रंग गोपाळा 

नसे मी सत्यभामा, रुक्मिणी, कुब्जा, सखी राधा
खुळी मीरा तुझ्या ध्यानात राही दंग गोपाळा

तुझ्या कंठात मी माला, तुझ्या ओठांत मी वेणू
तुझ्या वेणूत मी वृंदावनी सारंग गोपाळा

नसे राज्ञीपदाची लालसा, ना सोस रत्नांचा
नको धनसंपदा, झाले पुरी नि:संग गोपाळा

तशी आसक्त मी नाही, तरी ही आस जीवाला,
दिसावा एकदा माझा सखा श्रीरंग गोपाळा