Monday, February 4, 2013

चाकोरी

कक्षा वाढत जाते, फिरणे संपत नाही 
चाकोरी सोडावी इतकी हिंमत नाही !

खोटी आश्वासने तुझी अन् वृथा वल्गना,
सोड सुखा रे, बरी तुझ्याशी संगत नाही 

दुर्लभ होते जे जे, त्याची फोल अपेक्षा,
जे जे लाभत गेले, त्याची किंमत नाही 

अलिप्त, परके, विभक्त होणे पचनी पडले
हल्ली मी माझ्यात जराही गुंतत नाही

जाता-येता श्वास तेवढे मोजत गेले,
इतके सोपे जगणे म्हणजे गंमत नाही !

वाटा फुटतिल जिथे, तिथे मनमुक्त फिरावे,
मुक्कामाचा प्रवास कधिही रंगत नाही ! 

Tuesday, January 29, 2013

अज्ञात

असेल कोणी खुळा गुंतला जीव तुझ्या मोहात सखे,
असेल कोणी यथेच्छ डुंबत डोळ्यांच्या डोहात सखे 

कुणास भुलवित असेल गोऱ्या भाळीची गोंदणटिकली 
असेल कोणी शोधत वेडा प्रीत तुझ्या नजरेमधली

तुझी पैंजणे नादतील अन् कुणी बावरा वळेल ग
तुला जाणही नसेल, त्याची दिठी तुझ्यावर खिळेल ग

कुठेतरी ग असेल कोणी तुझ्याचसाठी झुरणारा
खट्याळ वारा सुगंध उधळित तुझ्याभोवती फिरणारा

असेल कोठे तुझी अर्चना, तुझी साधना करत कुणी
तुझे शब्द-स्वर, तुझीच गाणी असेल चित्ती स्मरत कुणी

असेल तो तर असेल केवळ तुझ्या गोड स्वप्नात सखे
नकोस शोधू वास्तवात, तो असू देत अज्ञात सखे


http://yasakhyannoya.blogspot.in/p/blog-page_26.html या माझ्या सख्यांच्या अंकात प्रकाशित :)

Thursday, January 24, 2013

नांदी

कुंदकळ्यांच्या लागुन कानी
भ्रमर गुणगुणे कुठली गाणी?

स्वरलीपीने नटली फांदी
प्रीतीनाट्याची ही नांदी
भुरळ घालिते मंजुळ वाणी

वसंतातली मोहक रंगत
शरदचांदण्यामधली संगत
रंग-गंध-रसभरित कहाणी

वचने देई मुग्ध आगळी
खुलवित जाई कळी-पाकळी
फुले उमलती गोजिरवाणी


'रोज रोज डाली-डाली क्या लिख जाये भंवरा बावरा' या गुलजार गीतासाठी ही कविता.

बावरा..............