Wednesday, September 23, 2009

रान

ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास
विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास
जळला मोहर, झडली पालवी,
दिसे रिता, पर्णहीन तो भकास

विषवल्ली तरारली, फोफावली,
वाढत चालली; वेढत चालली
घनदाट गर्द हिरव्या रानाला,
एकेका वृक्षाची गिळत सावली

रान कुठे आता? उध्वस्त स्मशान
घोंघावतो वारा एकटा बेभान
उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे
फांदीफांदीवर भुतांचे थैमान

क्षणात अवघे चित्र पालटेल
वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल
मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा,
पुन्हा रानात या गारवा दाटेल


मन रान, विषवल्ली अहंभाव
वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव
जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या,
आणि जिंकून घे आयुष्याचा डाव

2 comments:

 1. पहिली तीन कडव्यांमधून टोकाचं "निगेटीव्ह" वर्णन, उरलेल्या दोन कडव्यांमध्ये आयुष्याकडे पाहण्याचा "पॉझिटीव्ह" दृष्टीकोन...

  शेवटच्या चार ओळींमध्ये दिलेला "मन जिंकलंस तर आयुष्य जिंकलंस" हा सल्ला...

  सुरेख जमलंय !!!

  ReplyDelete
 2. >क्षणात अवघे चित्र पालटेल
  वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल
  मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा,
  पुन्हा रानात या गारवा दाटेल <


  वाह !

  क्या बात है... खुप सुंदर ओळी !

  ReplyDelete