Thursday, November 5, 2009

करार

माझे कधी तुझ्याशी काही करार होते
ते मोड जीवना, ते फसवे, चुकार होते!

श्वासांसवे कधीही नव्हतेच सख्य माझे,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते!

वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
गेले मिटून जितके हळवे विचार होते

रात्री तुझ्या स्मृतींनी स्वप्ने लुटून नेली,
गाफील पापण्यांचे उघडेच दार होते!

विरल्या कशा दिशा? मी जाऊ कुठे कळेना
काळोख पांगताना चकवे हजार होते!

हातून सावलीचा निसटून हात गेला,
आयुष्य मी उन्हाचे शाकारणार होते!

2 comments:

 1. वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
  गेले मिटून जितके हळवे विचार होते ।
  फारच छान,कोवळं,हळवं .

  ReplyDelete
 2. वाटेतल्या फुलांनी स्वप्ने लुटून नेली,
  काळोख पांगताना उघडेच दार होते


  mastch

  ReplyDelete