Friday, November 27, 2009

ते जीवच वेडे होते

ते जीवच वेडे होते, झुंजून रणी मरणारे
झोतात पुढे आले ते, मागे झेंडे धरणारे


त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी,
कैदेतुन निसटुन जाती अक्षम्य गुन्हे करणारे


आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे,
म्हणती गजराज स्वत:ला मुंगीला घाबरणारे


वादंग जरी वरवरचे, आतून सारख्या खोडी,
ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे


त्यांनीच विषारी जाती पैदा केल्या सापांच्या,
अन पाठ थोपटुन घेती, "आम्हीच साप धरणारे!"

कित्येक पिढ्यांच्या नावे जमवून ठेवली माया,
निश्चिंत, सुखी झाले ते; मरतील, मरो मरणारे!

2 comments:

  1. क्रान्ति शेवटचे तीन शेर अप्रतिम... कविता आवडली.:)

    ReplyDelete
  2. त्यांनीच विषारी जाती पैदा केल्या सापांच्या,
    अन पाठ थोपटुन घेती, "आम्हीच साप धरणारे!"
    kya bat hai!

    ReplyDelete