Saturday, December 11, 2010

मिसरे

रदीफ़ ना काफ़िया- अलामत, सुटेसुटेसे चुकार मिसरे
जुन्या वहीचे कवाड खोलुन खुणावणारे हजार मिसरे

अनंत वाटांवरून माझा प्रवास चाले तुझ्या दिशेने,
जिथेतिथे सोबतीस माझ्या नवेजुने बेसुमार मिसरे

जमीन नाही पहात, मात्रा मोजत नाही, वृत्तहि नाही,
मनात येते तेच सांगती, बहर नसे तरि बहार मिसरे

तुझी ठेव ही धुंद शायरी, तुझ्याच गझला, तुझेच नग़मे,
घुसमटताना जगण्यासाठी तूच दिलेले उधार मिसरे!

नकार खोटा ओठांवरचा, मनात आहे रुकार दडला,
नकार होकारात बदलती खुल्या दिलाची पुकार मिसरे

तिच्या खळीच्या शिंपल्यातला मोती पाउस घेउन गेला,
उनाड वारा तिच्या बटांवर लिहून गेला चिकार मिसरे!

4 comments:

 1. apratim ...


  तिच्या खळीच्या शिंपल्यातला मोती पाउस घेउन गेला,
  उनाड वारा तिच्या बटांवर लिहून गेला चिकार मिसरे!

  faar aawadale..

  ReplyDelete
 2. "नकार खोटा ओठांवरचा, मनात आहे रुकार दडला,
  नकार होकारात बदलती खुल्या दिलाची पुकार मिसरे"

  सुंदरच .... :)
  --------------------------------------------
  (या पोस्ट मध्ये फॉन्ट साईज इतका छोटा का वापरलाय ?)

  ReplyDelete
 3. छान.


  उनाड वारा तिच्या बटांवर लिहून गेला चिकार मिसरे!
  -वा वा.

  जमीन नाही पहात, मात्रा मोजत नाही, वृत्तहि नाही
  हा मिसरा अजून लयीत असता तर मजा आली असती.

  ReplyDelete