Friday, December 31, 2010

कळा लागल्या

कळा लागल्या पार आतून होत्या
किती यातना खोल दाटून होत्या!

जरी घाव आता उभारून आला,
मुळाखालच्या वेदना जून होत्या

तुला पाहता मी मलाही भुलावे,
अशा सूचना काळजातून होत्या!

कशी बाग माझी मला सापडावी?
कळ्या वेगळा गंध माळून होत्या

मला हारण्याचीच संधी मिळाली,
तुझ्या सोंगट्या डाव साधून होत्या!

जगावेगळे भाग्य दारात आले,
[तशा चाहुली कालपासून होत्या!]

तुझ्या अंगणी सावल्या या कुणाच्या
सुखाची खुळी आस लावून होत्या?

कुणाला, किती, कोणते दु:ख द्यावे?
मुक्या कुंडल्या सर्व जाणून होत्या

कशाची सजा आणि माफी कशाची?
चुका फक्त माझ्याच हातून होत्या!

2 comments:

  1. “कुणाला, किती, कोणते दु:ख द्यावे?
    मुक्या कुंडल्या सर्व जाणून होत्या”

    ….. superb

    ReplyDelete
  2. सुन्दर आहे ही गझल

    ReplyDelete