Tuesday, September 29, 2009

तिजोरी

तू सांभाळ तिजोरी मिटली
तुझी खरी दौलत रे लुटली


तुझ्या घरीही गोकुळ होते
तुझ्याचसाठी व्याकुळ होते
तुला न त्याची ओळख पटली


पिले पाखरे उडून गेली
नवी पालवी झडून गेली
अखेरची फांदीही तुटली


रिता माळ अन एकाकी तू
शून्याचीच वजाबाकी तू
आस तुझी ना अजून सुटली

Friday, September 25, 2009

आधाराचा हात

दोन शब्द सांत्वनाचे, एक आधाराचा हात
हलका मायेचा स्पर्श हवा होता वादळात


झाले काही भलतेच, सारे सोबती पांगले,
फुंकरीने कोसळावे जसे पत्त्यांचे बंगले
जसा वणवा पेटावा उभ्या, भरल्या घरात

संकटांचे काळे ढग भोवती, जरी अदृश्य,
उसन्या आनंदावर कसे तरावे आयुष्य?
घर फिरता घराचे वासे सुद्धा फिरतात


रोज माझ्यासाठी एक नवं दिव्य घडणार
रोज मरे त्याला कोण किती काळ रडणार ?
सावलीही देत नाही साथ कधी अंधारात!

तसा माझा कुणावर आहे काय अधिकार?
जगू देऊन जगाने केले मोठे उपकार
आता मरणाने घ्यावा हाती हलकेच हात

Wednesday, September 23, 2009

रान

ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास
विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास
जळला मोहर, झडली पालवी,
दिसे रिता, पर्णहीन तो भकास

विषवल्ली तरारली, फोफावली,
वाढत चालली; वेढत चालली
घनदाट गर्द हिरव्या रानाला,
एकेका वृक्षाची गिळत सावली

रान कुठे आता? उध्वस्त स्मशान
घोंघावतो वारा एकटा बेभान
उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे
फांदीफांदीवर भुतांचे थैमान

क्षणात अवघे चित्र पालटेल
वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल
मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा,
पुन्हा रानात या गारवा दाटेल


मन रान, विषवल्ली अहंभाव
वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव
जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या,
आणि जिंकून घे आयुष्याचा डाव

Monday, September 21, 2009

भोंडला

सयेबाई संसार मी भुलाबाईचा मांडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला


रांगोळीनं पाटावर हत्ती रेखला देखणा
सेवा स्वीकाराया आला दारी गणेश पाहुणा
खेळ ऐलमा पैलमा गणरायानं मांडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

कमळाच्या मागे राणी, हन्मंताची निळी घोडी,
धाडू माहेरी करंज्या, त्यांची आगळीच गोडी
मन भरून आनंद गाण्यांतून ओसंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला


कसं माहेर साजिरं, कसं सासर ते द्वाड
माहेरानं दिलं प्रेम, केली माया जिवापाड
सासरच्या वाटे काटे, श्वास उरात कोंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला


बालपणीचा भोंडला हरपला थोरपणी
कुठं शोधू ते अंगण ? कुठं वेचू आठवणी?
विखुरल्या खिरापती, डबा कधीचा सांडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला


सोळा वर्षं भोंडल्याची गेली कधीची सरून
आता कोरडेच हस्त, गाणी गेले विसरून
फेर संपता संपेना; देह, प्राण भोवंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

Thursday, September 17, 2009

पुन्हा केव्हातरी

संवाद काही राहिले, साधू पुन्हा केव्हातरी
काही तराणेही नवे, छेड़ू पुन्हा केव्हातरी

"सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या
सांगायच्या गोष्टी आशा, सांगू पुन्हा केव्हातरी!

झाले कधी हाराकिरीचे वाद; केली भांडणे,
तेव्हा असे का वागलो, बोलू पुन्हा केव्हातरी

दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे,
आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी!

सांगून नाही भेटलो तेव्हा, कधी भेटूनही
हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी"!

आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

Monday, September 14, 2009

मंजूर नाही

नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही

कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला?
मृदंगास ठेकाच मंजूर नाही

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही!


हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही?


तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही


मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही


लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही!


अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
"तुझी भेट आताच मंजूर नाही!"

Thursday, September 10, 2009

निमंत्रण

हिरकणीला स्वर्णकोंदण
चैत्रबहराचे निमंत्रण


या मनी डोकावला तो
एक क्षणभर थांबला तो
आणि हसुनी बोलला तो
"घे तुला आभाळ आंदण!"


उमलल्या चैतन्यवेली
अमृताने बाग न्हाली
बहरली वेडी अबोली
अंगणी प्राजक्तशिंपण


लाभल्या दाही दिशाही
घ्यायचे उरले न काही
तो तरीही देत राही
स्फूर्तिचे सौभाग्यगोंदण


भाव मनिचे व्यक्त झाले
मी ऋणातुन मुक्त झाले
धन्य झाले, तृप्त झाले
लेवुनी हे स्रृजनकंकण

Wednesday, September 9, 2009

अंतरा

शह प्रतिशह माझ्याच मनाचे, वजीर मी अन् मीच मोहरा
अविरत दिसतो जुन्या दर्पणी मलाच माझा नवा चेहरा

खोल विवर मन, गूढ़ विलक्षण, अथांग गहिरे, ठाव न लागे
शांत नदीच्या पात्रामधला गहन, अनाकलनीय भोवरा

कुठे अता त्या नात्यामधला ओलावा जपणा-या भिंती ?
अदृष्टाची काळी छाया थांबविणारा कुठे उंबरा ?

खुणा कालच्या विध्वंसाच्या जपुन आज का शाप भोगणे ?
आज जगा मस्तीत, उद्याचे कोसळणारे स्वप्न सावरा

किती रंग चढवले, उतरले, जशा भूमिका बदलत गेल्या,
रोज बदलले किती मुखवटे, कुणास ठाउक कोणता खरा ?

मनात नसता कसे जुळावे लय तालाशी सुरेल नाते ?
स्थाईला ना स्पर्श सुरांचा, सांग कसा गाणार अंतरा ?

Thursday, September 3, 2009

समिधा

उभ्या जन्मात मी बहुधा
तुझ्या यज्ञातली समिधा

कधी मी सावली झाले
तुला ग्रीष्मात जपणारी
तुझ्या बहरात मी झाले
कळी गंधात रमणारी
बहरले धुंद मी कितीदा
तुझ्या यज्ञातली समिधा

कधी अभिसारिका झाले,
प्रिया झाले, सखी झाले
रमा नारायणाची,
शंकराची पार्वती झाले
कधी कृष्णा तुझी राधा
तुझ्या यज्ञातली समिधा


तुला पाहून माझ्या अंतरी
प्राजक्त दरवळतो
कुठेही जा, तुझ्यासाठीच
माझा जीव घुटमळतो
प्रिया, तू सूर्य मी वसुधा
तुझ्या यज्ञातली समिधा

Wednesday, September 2, 2009

आयुष्या

सुरांनी मांडली दारी तुझ्या आरास आयुष्या
अरे, आता तरी सोडून चिंता हास आयुष्या !


कधी काट्यापरी सलणे, कधी गंधाळणे, फ़ुलणे
दिले तू वेदनेला चांदण्यांचे श्वास आयुष्या !


तुला माझी, मला त्याची सदा हुलकावणी चाले,
जिवाचा खेळखंडोबा पुन्हा केलास आयुष्या


जिथे होते तुझे घरटे, अता ती मोडली फांदी
तसे माझे तरी उरले कितीसे श्वास आयुष्या ?


कधी जन्मांतरीचे आपले नाते खरे होते ?
कधी होतास तू माझ्याचसाठी ख़ास आयुष्या ?


दिवे मंदावता येशील माझ्या सोबतीसाठी
मला तू एवढा देशील का विश्वास आयुष्या ?