Tuesday, September 28, 2010

कळले नाही

फुलांतला का गंध रुतावा, कळले नाही
व्यथेसवे का स्नेह जुळावा, कळले नाही

अधांतरी अन् एकाकी टाकून मला का
हात तुझा हातून सुटावा, कळले नाही

गुन्हेगार तो असूनही 'बा-इज्जत' सुटला!
कुणी, कुठे दडपला पुरावा, कळले नाही

अजाणता मी त्याच्या वाटा तुडवित गेले,
कसला चकवा, कसा भुलावा, कळले नाही

अनोळखी मी, मलाच नाही कधी गवसले,
तुला कसा लागला सुगावा, कळले नाही

4 comments:

  1. आवडली.
    आधी ’रूतावा’ लक्षात आलं नाही, मग ’पोहोचलं’ :-)

    ReplyDelete
  2. अनोळखी मी, मलाच नाही कधी गवसले,
    तुला कसा लागला सुगावा, कळले नाही

    फारच छान ..
    आवडली...

    ReplyDelete
  3. अजाणता मी त्याच्या वाटा तुडवित गेले,
    कसला चकवा, कसा भुलावा, कळले नाही
    वा सुंदरच.

    ReplyDelete