Wednesday, October 6, 2010

वेगळ्या रूपात

पाकळीला जाण नको, देठालाही ताण नको
फूल असं अलगद टिपायचं
उणादुणा बोल नको, देताघेता मोल नको
नातं असं हळुवार जपायचं ॥

सांज जरा कलताना, जाईजुई फुलताना
रूप मनदर्पणात पहायचं
धुंद पश्चिमेची लाली, उतरता गोर्‍या गाली
नाजूकसं गीत एक लिहायचं ॥

पापणीला आच नको, डोळ्यांनाही जाच नको
स्वप्न असं नकळत बघायचं
मनात काहूर नको, आसवांचा पूर नको
पाऊल न वाजवता निघायचं ॥

चंद्रज्योती मालवता, नव्या आशा पालवता
ओंजळीत दंव गोळा करायचं
आठवणींची रांगोळी, कवितेच्या चार ओळी
वेगळ्या रूपात मागे उरायचं!

4 comments:

  1. आठवणींची रांगोळी, कवितेच्या चार ओळी
    वेगळ्या रूपात मागे उरायचं!


    aawadali kavita...

    ReplyDelete
  2. मन गहिवरुन टाकणारे लेखन केले आहेत. तुमची प्रतीभा अजुन उज्वल करो हीच प्रभुचरणी प्रार्थना.

    www.bolghevda.blogspot.com
    www.rashtravrat.blogspot.com

    ReplyDelete
  3. “पापणीला .....
    ... पाऊल न वाजवता निघायचं”
    या ओळी खूप आवडल्या.

    आणि शेवटच्या ओळींत
    कविता खास उंची गाठते.... नेहमीप्रमाणेच.

    ReplyDelete
  4. एकदम भन्नाट, सूप्पर, चाबूक, वगैरे .
    तुमच्या कविता मनाला खूप आनंद देतात.
    अशाच सुन्दर कविता लिहित रहा व रसिकांना आनंद वाटत रहा.
    शशांक

    ReplyDelete