Wednesday, April 24, 2013

नाती अमरत्वाची



पिकल्या, गळल्या पानांना नाजुक हिरव्या हातांनी
काही क्षण तोलुन धरले
'किति जपाल रे वेड्यांनो, उपयोग कशाचा आता?
जीवन तर माझे सरले!

येईल कुठुनसा वारा, हलकासा एकच धक्का
तुमच्याही नकळत द्याया
उडवेल मला वा खाली, निजवील धरेवर माझी
मातीत मिसळण्या काया'

'हो, ठाउक आहे आम्हां, तू किंवा आम्ही सारे
त्या वाटेचेच प्रवासी
पण आतुन वाटुन गेले, क्षणभर कवळावे तुजला
विझवावी तुझी उदासी'

सुकता सुकता जो लाभे हा अनपेक्षित ओलावा
त्या पिकलेल्या पानाला,
भारावुन ते गहिवरले अन् आनंदाने गेले
सामोरे निर्वाणाला

सहजी घडली घटना ही पण शिकवण देउन गेली
सृष्टीतिल परतत्वाची
पिकतिल अन् गळतिल पाने पण तुटायची ना कधिही
ही नाती अमरत्वाची


पाखरांची बोली



 जाणू नको सये पाखरांची बोली 
काळजाची खोली व्यापणारी 
वेल्हाळ पाखरं वेड लावतात 
स्वप्न दावतात भरारीचे

तुझे थिटे पंख, चौकोनी आकाश 
प्रपंचाचे पाश किनारीला 
मन पाखराचे, देह जडशीळ 
काचणारा पीळ तुझे दैव

पाखरांच्या मनी डोकावू नकोस 
कशाला हा सोस जीवघेणा?
पाखरांची ओव्या त्यांना गाऊ द्यावी
आपण वेचावी सुरावट

त्यांच्या विभ्रमांनी मुखी येता हास्य 
क्षणभर दास्य विसरावे 
इतकेच राहो तुझे त्यांचे नाते 
स्वप्न येते-जाते जसे डोळां

उडता पाखरू स्वप्न मावळेल 
पीस ओघळेल आठवांचे 
ओल्या पापण्यांनी हळूच टिपावे 
पीस ते जपावे अंतरात

Thursday, April 4, 2013

येशील?

काय गंमत आहे ना?
नेहमीच मी तुला सजवत आलेय माझ्या रंगा-ढंगानं
साच्यातून काढलेल्या मूर्तींसारखं
आखीव-रेखीव, प्रमाणबद्ध, कोरीव शिल्पच जसं.
साचे बदलतील तसे भाव फक्त बदलले आहेत 
आणि वेगळा दिलाय जामानिमा तुला
कधी भरजरी पैठणी न् पदरावरचे मोर,
टोप-पदरी नऊवारी इरकल कधी,
कधीतरी फुलंपानं रेखाटलेलं झुळझुळीत रेशीम
अन् त्यातही
सांज सरत्या आकाशाचे झरझर बदलत जाणारे रंग,
क्वचित जराशा हिरव्या-पिवळ्या आनंदाच्या मंद छटा,
अन् अवसेच्या अंधाराचा काळाभोर टिळा बहुधा नेहमीच.
टापटिपीचं, विचारपूर्वक, निरखून-पारखून वागणं दिलं
ओठांपुरतं मोजकं हसणं, तोलून-मापून बोलणं दिलं
यम-नियमांत बांधलेलं वेळेत बांधलेलं गाणं दिलं
अगदी माझ्याचसारखं!

खरंच सांग, भावलं का ग हे सगळं मनापासून तुला?
वाटलं नाही कधी जरा जिप्सी व्हावं आपणही?
चटक-भडक रंगाचा घेरदार लेहंगा ल्यावा,
धसमुसळ्या वाऱ्यानं विस्कटलेल्या
भुरभुरणाऱ्या केसांत माळावा
रानफुलांचा मादक गजरा
खळखळून हसावं झऱ्यासारखं निर्मळ
कोकीळ गातो तशीच घ्यावी विना साथीची मोकळी तान
आणि नाचावं मोरासारखं देहभान विसरून, सर्वस्व उधळून
वैशाखाचा वणवा प्यावा, आषाढाला भिजवून द्यावं
शरदचांदण्यालाही आपलं निष्पाप हसू उधार द्यावं
उधळून द्याव्यात यम-नियमांच्या जाचक बेड्या काही काळ
खुल्या, निरभ्र आकाशाशी जोडून घ्यावं आपलं नातं
अन् गावीत मुक्तीची सुरेल गाणी पाखरांच्या संगतीत

वाटतंय ना?
चल तर मग, एक गंमत सांगते तुला
केलं तुला साच्यातून मोकळं, घे सजून आता मनासारखं
दाखव मला तुझं नवं रूप, निरागस, निष्पाप, मोहक, अवखळ
बागडणाऱ्या वनहरिणीचं, भिरभिरणाऱ्या फुलपाखराचं
भारावलेल्या चिरतरुणीचं, सळसळणाऱ्या वेळूवनाचं

खरंच, येशील कधीतरी जिप्सी होऊन
माझ्यातून माझ्याकडे.................................कविते?

Tuesday, April 2, 2013

अज्ञ प्रवासी

अज्ञ प्रवासी 
वळण येइतो सोबत होतो 
मिळून गेलो मुक्कामाला 

कधी सराई
कधी मोकळे मेघ सावळे 
घेत राहिलो आडोशाला 

वेळोवेळी
सुरेल संगत टिपून रंगत 
दिवस सुखाने सरले होते 

अन् क्षितिजाशी 
गेल्यानंतर चिमणेसे घर 
बांधावे हे ठरले होते 

वळणावरती 
तुला गवसली, मला न दिसली 
नव्या दिशेची प्रसन्न गावे 

हेच बरे की 
तू बहराच्या, मी शिशिराच्या 
ठरलेल्या वाटेने जावे