Thursday, April 4, 2013

येशील?

काय गंमत आहे ना?
नेहमीच मी तुला सजवत आलेय माझ्या रंगा-ढंगानं
साच्यातून काढलेल्या मूर्तींसारखं
आखीव-रेखीव, प्रमाणबद्ध, कोरीव शिल्पच जसं.
साचे बदलतील तसे भाव फक्त बदलले आहेत 
आणि वेगळा दिलाय जामानिमा तुला
कधी भरजरी पैठणी न् पदरावरचे मोर,
टोप-पदरी नऊवारी इरकल कधी,
कधीतरी फुलंपानं रेखाटलेलं झुळझुळीत रेशीम
अन् त्यातही
सांज सरत्या आकाशाचे झरझर बदलत जाणारे रंग,
क्वचित जराशा हिरव्या-पिवळ्या आनंदाच्या मंद छटा,
अन् अवसेच्या अंधाराचा काळाभोर टिळा बहुधा नेहमीच.
टापटिपीचं, विचारपूर्वक, निरखून-पारखून वागणं दिलं
ओठांपुरतं मोजकं हसणं, तोलून-मापून बोलणं दिलं
यम-नियमांत बांधलेलं वेळेत बांधलेलं गाणं दिलं
अगदी माझ्याचसारखं!

खरंच सांग, भावलं का ग हे सगळं मनापासून तुला?
वाटलं नाही कधी जरा जिप्सी व्हावं आपणही?
चटक-भडक रंगाचा घेरदार लेहंगा ल्यावा,
धसमुसळ्या वाऱ्यानं विस्कटलेल्या
भुरभुरणाऱ्या केसांत माळावा
रानफुलांचा मादक गजरा
खळखळून हसावं झऱ्यासारखं निर्मळ
कोकीळ गातो तशीच घ्यावी विना साथीची मोकळी तान
आणि नाचावं मोरासारखं देहभान विसरून, सर्वस्व उधळून
वैशाखाचा वणवा प्यावा, आषाढाला भिजवून द्यावं
शरदचांदण्यालाही आपलं निष्पाप हसू उधार द्यावं
उधळून द्याव्यात यम-नियमांच्या जाचक बेड्या काही काळ
खुल्या, निरभ्र आकाशाशी जोडून घ्यावं आपलं नातं
अन् गावीत मुक्तीची सुरेल गाणी पाखरांच्या संगतीत

वाटतंय ना?
चल तर मग, एक गंमत सांगते तुला
केलं तुला साच्यातून मोकळं, घे सजून आता मनासारखं
दाखव मला तुझं नवं रूप, निरागस, निष्पाप, मोहक, अवखळ
बागडणाऱ्या वनहरिणीचं, भिरभिरणाऱ्या फुलपाखराचं
भारावलेल्या चिरतरुणीचं, सळसळणाऱ्या वेळूवनाचं

खरंच, येशील कधीतरी जिप्सी होऊन
माझ्यातून माझ्याकडे.................................कविते?

No comments:

Post a Comment