Tuesday, December 28, 2010

सोबत

मी पुसट पुसट शब्दांचे अन्वयार्थ शोधत होते,
हातावरच्या मिटलेल्या रेषांना जोडत होते


केव्हाच संपली होती पुनवेची अल्लड गाणी,
अवसेचे दार बिचार्‍या चंद्राला रोखत होते


टाकून देववत नव्हते निर्माल्य ओंजळीमधले,
ताज्या स्वप्नांची परडी हातातुन सोडत होते


आजन्म चालला माझा हा खेळ विचित्रपणाचा,
तुटलेले जोडत होते, जुळले की तोडत होते!


"ती हरली आहे, आता शेवटचा घाला घालू"
ते दैव पाशवी माझे कोणाशी बोलत होते?


मायेच्या पाशामधली एकेक वीण सोडवली,
विरल्या आशेचे थडगे जाताना सोबत होते!

Saturday, December 11, 2010

मिसरे

रदीफ़ ना काफ़िया- अलामत, सुटेसुटेसे चुकार मिसरे
जुन्या वहीचे कवाड खोलुन खुणावणारे हजार मिसरे

अनंत वाटांवरून माझा प्रवास चाले तुझ्या दिशेने,
जिथेतिथे सोबतीस माझ्या नवेजुने बेसुमार मिसरे

जमीन नाही पहात, मात्रा मोजत नाही, वृत्तहि नाही,
मनात येते तेच सांगती, बहर नसे तरि बहार मिसरे

तुझी ठेव ही धुंद शायरी, तुझ्याच गझला, तुझेच नग़मे,
घुसमटताना जगण्यासाठी तूच दिलेले उधार मिसरे!

नकार खोटा ओठांवरचा, मनात आहे रुकार दडला,
नकार होकारात बदलती खुल्या दिलाची पुकार मिसरे

तिच्या खळीच्या शिंपल्यातला मोती पाउस घेउन गेला,
उनाड वारा तिच्या बटांवर लिहून गेला चिकार मिसरे!

Thursday, December 2, 2010

बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!

जातात वृक्ष वादळात, तरती पाती,
आभाळ पेल तू, नकोस विसरू माती

प्रत्येक पावलागणिक बेट काट्यांचे,
माझीच पैंजणे दगा देउनी जाती

केव्हाच सोडली माझी वाट दिव्यांनी,
अंधार एकला जन्माचा सांगाती

पाने निखळावी जुन्या डायरीमधली,
निखळली, विखुरली तशी बेगडी नाती

तहहयात माझे निशाण शुभ्र, (तहाचे),
बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!