Thursday, November 17, 2011

पुन्हा नव्याने

मनाप्रमाणे घडी बसावी पुन्हा नव्याने
जुनीच नाती जुळून यावी पुन्हा नव्याने

कणाकणाला कवेत घेण्या बहार यावी,
सुक्या डहाळीत जान यावी पुन्हा नव्याने

अजूनही ती तिच्यात नाही, अलिप्त आहे
तिला तिची ओढ जाणवावी पुन्हा नव्याने

पुन्हा घुमावी खुळावणारी सुरेल गाणी,
अबोल वाणीस जाग यावी पुन्हा नव्याने

कुणास ठावे, असेल काही मनात त्याच्या,
मलाच माझी कथा कळावी पुन्हा नव्याने

निळ्या नभाचे ठसे-वसे ओंजळीत यावे,
दयाघनाची कृपा झरावी पुन्हा नव्याने

नकोनकोसा प्रवास येथेच थांबवावा,
हवीहवीशी दिशा धरावी पुन्हा नव्याने !

Monday, November 7, 2011

माग


त्या सावळ्या सख्याचा कोठून माग घ्यावा ?
शब्दांत शोधता मी अर्थात तो असावा !

यमुना, कदंब, धेनू, नवनीत, रासलीला
का मोरपीस अजुनी कुरवाळते दिठीला 
मनगोकुळात घुमतो त्याचा सुरेल पावा 

ते रूप लाघवी मी काव्यात गुंतवावे
तालासुरांत त्याला गुंफून नित्य गावे
वाटे, परी उडे तो भारी खट्याळ रावा !

माळून कौतुकाने वेणीत चांदराती 
मी वाटुली पहावी उजळून नेत्रवाती 
तो खोडसाळ वारा, दारावरून जावा !

भासात मी जगावे, ध्यासात दंग व्हावे
लावून आस वेडी ज्योतीपरी जळावे
त्याने उगा छळावे, करुनी कुटील कावा 

असतो सभोवताली तरिही कुठे दिसेना
माझ्याच अंतरी तो, नेत्रांत का ठसेना ?
स्वप्नात भेटणारा सत्यात का नसावा ?

[मराठी कविता समूहाच्या ई-दिवाळी अंक-२ मध्ये पूर्वप्रकाशित]

Friday, November 4, 2011

भेटते, हरवून जाते

भेटण्याच्या चाहुलींनी एवढी हरखून जाते,
रोज त्याच्या कल्पनांना भेटते, हरवून जाते

आसमंती धून मुरलीची, मनाने गोकुळी मी
भेटलो जेथे कधी, तेथे पुन्हा जाते खुळी मी
मोरपंखी आठवांना भेटते, हरवून जाते

लाजवंती प्रीत माझी स्वप्नझूला झुलत जाई
रंगुनी हलकेच हाती हळुहळू जी खुलत जाई
शकुनमेंदीच्या क्षणांना भेटते, हरवून जाते

सप्तरंगी धुंद गीते घेरती अलवार वेळी
तन तरंगे, मनहि रंगे चांदण्याच्या धुंद मेळी
राजवर्खी सावल्यांना भेटते, हरवून जाते