Tuesday, December 13, 2011

नाममात्र

दुरावलेलीच रात्र आहे
मनात काळोख मात्र आहे

मरायची वेळ येत नाही,
जगायला मी अपात्र आहे

तिथे दुधी चांदणे फुलू दे
इथे जरी काळरात्र आहे

असेल आजार जीवघेणा,
इलाज का गलितगात्र आहे ?

मधेच किंचाळतात बेड्या,
'तिचा गुन्हा दखलपात्र आहे !'

उगाच अस्तित्व पाळते मी,
तसेहि ते नाममात्र आहे !

Monday, December 5, 2011

वसा

कुणा माहिती काल होतो कसा ?
मला मीच ना आठवे फारसा !

प्रवाहातल्या ओंडक्यासारखा
किती दूर वाहून आलो असा

दगा देतसे सावलीही मला
भरोसा करावा कुणाचा कसा ?

खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !

खरा चेहरा दाखवू पाहता
चरे पाडले, फेकला आरसा

नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा ?

उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !

Saturday, December 3, 2011

भूमिका

नव्हतेच मुळी मी येथे हा पडदा उठतानाही
अन् पडद्यामागे होते पडदा पडला तेव्हाही
टाळयांवर पडल्या टाळ्या, कौतुकात नाटक सरले
अन् मुख्य भूमिका माझी होती, हे तेव्हा कळले !

हे विचित्र नाटक, ज्याला नाट्याचा गंधहि नव्हता
मी गुंतुन जाण्याजोगा थोडासा बंधहि नव्हता
मी नसतानाही माझ्या नावावर होते चढले
माझ्याविन सर्वांना ते रुचले, पटले, उलगडले

'हे निर्विवाद यश माझे' दिग्दर्शक असे समजला
'ही दाद संहितेसाठी' लेखक या भ्रमात रमला
बोलले समीक्षक, 'अवघे नाटक पुरते भरकटले'
(अन् मुख्य नाट्य होते ते पडद्याच्या आडच घडले!)