Wednesday, April 4, 2012

हसावे कसे


उगा व्यथित व्हायचे फिरुन मोकळे व्हायचे 
पुन्हा करुण सावल्या बघत चांदणे प्यायचे 
सरीवर सरी उरी तरिहि कोरड्या पापण्या 
बळेच हसुनी उदासपण सारुनी द्यायचे

कुठे अटळ वासना, विफल भावना गांजती
अशांत हृदयी कुठून उठती तरंगाकृती
भकास वळणावरून फिरता कधी एकटे
कितीक फसवी अबोध वचने दिशा घेरती

मनात कुठला विचार तरळे लुळापांगळा
कसा उतरवू, कुठून मिटवू व्यथेच्या कळा
इथे बदलती क्षणात सगळे सखेसोबती
कुणी न सहजी सवे तुडविती उन्हाच्या झळा

हलाहल कुणी किती पचविले, न येई नशा
जरी समजते, तरी कुणि न त्यागिते या विषा
नसे क्षणिक ही, अनंत मरणांतुनी येतसे
फिरून जगण्यास बाध्य करते विषाची तृषा

अभंग मनिषा पुन्हा सुचविते जगावे कसे
सुकून गळली फुले शिकविती फुलावे कसे
हसून म्हणती उदास हृदयातली स्पंदने
'चला, समजले व्यथा विसरुनी हसावे कसे'

बुद्धीबळ


'सफेद-काळ्या चौकटीत तू एक-एक पाऊल पुढे जा' कुणी म्हणाले 
हुकूम त्याचा मानुन मीही डोळ्यांवरती झापड बांधुन पुढे निघाले 

कुणी मुसंडी पुढे मारली चाल चालुनी तिरकी, दुडकी, भलती-सलती 
कुणी अचानक नियम तोडले, वचन मोडले, मार्ग सोडले, चढले वरती 

कुणी कुणाला कुठे दिले शह, कुणी कुणाची घरे हडपली कुण्या पटावर 
कधी न झापड दूर करुन मी लक्ष घातले, काढले न वा कधी अवाक्षर 

मुकाट माझी चाल चालले, एक एक पाऊल टाकले जपुन स्वत:ला
कुणी कातडीबचाव म्हणती, कुणी म्हणे स्वार्थी, मी पर्वा करू कशाला?

किती विचारी, किती संयमी, स्थितप्रज्ञ मी, गुलामीतही निवांत होते
घडून गेली महाभारते, अधर्मयुद्धे किती तरी स्तब्ध, शांत होते

चिडून सारे सैन्य उधळले, कुणी कुणाचे शस्त्र ओढले, कुणी झिंगले
अखेरचा तो निर्णायक क्षण, बेसावध राजाला उडवुन मीच जिंकले! 

पाहिजे आता


तुटे फांदी, पडे खोपा, उडाया पाहिजे आता 
नवा मुक्काम शोधाया निघाया पाहिजे आता 

तुला चालेल ते केले, तुला सोसेल ते केले 
मला भावेलसे काही कराया पाहिजे आता 

दिशा झाकोळल्या दाही, भिडे काळोख प्राणांना 
उजेडाला चिता माझी जळाया पाहिजे आता 

तुला मी शोधले, माझ्यात तू आहेस आयुष्या
मला माझा ठिकाणाही कळाया पाहिजे आता

नकोशा वेदनांनी केवढी समृद्ध मी झाले,
हवासा घाव एखादा मिळाया पाहिजे आता

तसा मी एकदा त्याचा उबारा भोगला होता,
पुन्हा गर्भात मातीच्या रुजाया पाहिजे आता

स्मृतींची कोवळी पाने, कळ्या गर्भार स्वप्नांच्या
असे काहीतरी मागे उराया पाहिजे आता