Monday, August 5, 2013

अपेक्षा

अपेक्षेप्रमाणेच आयुष्य जावे 
असे वाटणे केवढी मूढता 
विधीच्या विधानास आव्हान देत्या 
निराळ्या कथेला नसे मान्यता 

इथे जे घडे, पूर्वसंचीत सारे 
तुला भोगणे प्राप्त आहे मना 
सुखे लाभती त्याहुनी जास्त दु:खे 
तुलावी कशी प्रेरणा-वंचना?

न किंतू धरावा, न काही अपेक्षा
सभोती असो वा नसोही कुणी
स्वतः आखुनी घेत जाव्यात कक्षा
वसावे कुठे आणि कोण्या क्षणी

धरावा असा मार्ग जेथे न थांबा,
निघावे दिशा घेउनी संगती
असो घाट वा वाट साधीसुधी ती,
मिळो सारखी पावलांना गती

जिथे शांततेच्या निनादासभोती
घुमाव्यात मौनातल्या बंदिशी
अशा गूढ देशी उषा जागवावी,
अशा मुक्त क्षेत्री विरावी निशी


[वृत्त - सुमंदारमाला]

भातुकलीचा खाऊ

शिंग मोडल्या कपिलेचं गोंडस वासरू 
कोवळासा चिगूर, गाभुळलेली चिंच 
कैरीच्या चिकानं माखलेली सकाळ,
आजोळची आमराई हिरवीकंच

नरसोबाच्या पारावर गणपतीचा मेळा
नऊवारी गुंडाळून चवळीची शेंग
भक्त बाळ प्रल्हादाचं रंगलेलं कीर्तन,
खारुलीच्या डोळ्यांवर साईसारखी पेंग

आजोबांच्या फेट्यात जास्वंदीचा तुरा
आजीच्या हातावर मेंदीचा काला
मुरमुऱ्याचे लाडू, राजगिऱ्याची चिक्की,
कान्होबाची दहीहंडी, गोविंदा आला!

कौलावरच्या वानराला दावलेल्या वाकुल्या
ओसरीवर मांजरींच्या भांडणाची नक्कल
मोत्याशी झटापट, पाडीमागे पळापळ
रोज नवी खोडी, रोज नवी शक्कल

लडिवाळ, खोडसाळ, खळाळतं बालपण
मोठेपणात शिरलं पुस्त्या-वह्या गिरवुन
सरलं, थोडंफार उरलेलं जपलंय
भातुकलीचा खाऊ, तसं पुरवुन पुरवुन ...... 

अलख

नकोसे वाटे हे समर, दुबळा जीव थकला
दिशांच्या गर्भाशी तम वितळले, सूर्य झुकला
जराशा श्वासाने मरण सरले, दु:ख उरले
हवी होती मुक्ती, क्षण निसटला, नेम हुकला

निळ्या डोहाकाठी गळुन पडले पंख इवले
तरंगांच्या ओठी शिशिरहळवे गीत दबले
कुणा पाकोळीचा करुण भिजला आर्त स्वर तो
भुलावा होता की पुसट चकवा हे न कळले

फकीराचा यावा अलख घुमता ती गहनता
भरे संध्याकाळी गगन तमरंगात ढळता
तिथे माझी काया सरण नसुनी मूक जळते
तुझी गीते गाती सजल नयनांची विकलता


[वृत्त -शिखरिणी]