Sunday, April 26, 2009

मातीचेच पाय

श्रद्धा, भक्ती, आत्मीयता, विश्वासाचा अर्थ काय?
जिथे माथा टेकवावा तिथे मातीचेच पाय!


मंदिराची शोभा न्यारी, मूर्ती मात्र भंगलेली
वैभवाची ऐट हंड्या झुम्बरात टांगलेली
देवाच्याच दारी होई देवाचाही निरुपाय


मांगल्याची, पावित्र्याची चंद्रभागा का आटली?
सुकला स्तब्ध अश्वत्थ, इंद्रायणीही गोठली
पापभार सांभाळून झिजले देवाचे पाय


किती, कशी जोजवावी माया ममतेची नाती ?
त्याग राहिला गहाण लालची स्वार्थाच्या हाती
कधी देव, कधी दैव, सारे थकले उपाय

Sunday, April 19, 2009

पाहिली मी पंढरी

अमृताची चंद्रभागा झुळझुळे या अंतरी
याचि देही याचि डोळा पाहिली मी पंढरी

मीपणाचे कवच गळले निर्गुणाच्या दर्शने
ते अलौकिक रूप पाहून तृप्त झाली लोचने
नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी


माळ तुळशीची गळा, कासे पिताम्बर, कर कटी
भाळि कस्तुरीटिळक, कानी मकरकुंडल शोभती
स्वर्ग भीमेच्या तिरी, वैकुण्ठ शोभे भूवरी

भान हरपे आणि होई मूक वाचा बोलकी
चरणी माथा ठेविता हा जन्म होई सार्थकी
आज प्राणांतून घुमली सावळ्याची पावरी

Tuesday, April 7, 2009

संभ्रम

सत्य जाणूनही कसे मन संभ्रमात होते?
माझ्या आयुष्याचे प्रश्न तुझ्या उत्तरात होते


काजळल्या रात्रींचेही भय वाटले ना कधी,
अंधाराला पेलण्याचे बळ चांदण्यात होते


फुले वेचता वेचता हात रक्ताळले तरी ,
काट्यांना फुलविण्याचे व्रत प्राक्तनात होते


डोळे मिटून घेताना अश्रू ओघळावे गाली ,
तुझे आमंत्रण तसे भिजल्या स्वरात होते


क्षितिजाला रोखणारी एक तरी वाट हवी,
आले हाताशी वाटता, दूर ते क्षणात होते


माझ्या नियतीने मला दिली शिकवण नवी,
कल्पनेतल्या गुन्ह्याची शिक्षा वास्तवात होते