Sunday, May 31, 2009

डाव

पुरा जो होणार नाही, डाव असा मांडू नको
पापण्यांच्या शिंपीतले मोती कुठे सांडू नको

जिवाभावाचे अनाम नाते कधी तोडू नको
अर्ध्या वाटेवर मला वादळात सोडू नको

आर्त, उदास, हळवे सूर पुन्हा छेडू नको
रानभरी वा-यापरी सांजवेळी वेढू नको

झाले गेले विसर ते, त्याचा माग काढू नको
ओल्या पदरात माझ्या दु:ख आता वाढू नको

जोगवा

नक्षत्रांच्या गावातून कुणी सांगावा धाडला?
जीव पाखरू होऊन माझा आभाळा भिडला

वैशाखातल्या दुपारी कुणी गारवा पेरला?
मनी फुलोरा फुलला, रानी मयूर भारला

आला मैफलीला रंग, ताल सुराला भेटला,
अंतरंगी आनंदाचा असा उमाळा दाटला

मोतीपोवळे माळून दारी प्राजक्त डोलला
हळुवार गूज काही वारा कानात बोलला

झाकोळल्या नजरेला दिसे प्रकाश आतला
माझ्या फाटक्या झोळीत असा जोगवा घातला!

मी

मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
मंद ज्योत ती मीच तेवती
विरघळणा-या चंदनात मी
कधि मीरेची एकतारि मी
कधि राधेच्या मंथनात मी
वससी माझ्या अंतरात तू
अविरत तुझिया चिंतनात मी
कळी पाकळी फुलवित जाते
जणु भ्रमराच्या गुंजनात मी
पारिजातकापरी फुलविले
सौख्य तुझ्या रे अंगणात मी
तुझ्या प्रीतिचा चंद्र जडविला
नक्षत्रांच्या कोंदणात मी
भाग्यदैवता तुलाच जपले
भाळावरच्या गोंदणात मी