Thursday, March 25, 2010

चैत्रगौर

गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला

घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे

सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी

सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी

गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी

रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती

जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

Wednesday, March 24, 2010

अक्षय

नाही मनाला कुंपण, कल्पनेला नाही भय
नाही स्वप्नांना बंधन, भावनेला नाही वय

अंतराची नाही क्षिती, मन जाणते मनाला,
शब्द वेगळे तरीही एक सूर, ताल लय

क्षितिजाशी भेटण्याची ओढ गगनधरेची,
सूर्योदय उषेसंगे, संध्येसाठी चंद्रोदय

दारी मोगरा फुलतो आठवणींच्या फुलांनी,
मन पाकळी पाकळी होते येता तुझी सय

मृदु रेशमाचे गोफ तसे ऋणानुबंध हे,
तुझ्या माझ्या नात्यापरी नित्य अभंग, अक्षय

Tuesday, March 16, 2010

समर्थ

संहिता जुनी नवीन अर्थ मागते
अन्यथा विसर्जनास गर्त मागते

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)

कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते

तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?

स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते