Wednesday, October 27, 2010

वेणा

आतून उमलते काही, घुसमटते, पण प्रसवेना
छळतात जिवाला कधिच्या, सृजनाच्या फसव्या वेणा
गर्भात अंकुरे तेव्हा आभाळनिळाई झरली
रंध्रांतुन फुटल्या लाटा, गात्रांतुन वीज लहरली
हासले, उमलले, फुलले, आतल्या आत मोहरले
अन् तिथेच गुंतुन गेले, त्या काळोखाला भुलले
गुंत्यात जीव गुंतावा, इतके गुंतावे का रे?
विझतील अंतरामधले अस्फुट, अव्यक्त धुमारे
आतल्या आत हुंकारे, "मज व्यक्त व्हायचे आहे,
कुणि कवाड उघडुन द्या रे, मज मुक्त व्हायचे आहे!"
भेदून कवच डोकावे, चांदणी जशी उमलावी,
आभाळ मोकळे व्हावे, की नीरगाठ उकलावी
जरि धूसरसे, अधुरेसे, पूर्णत्वाने प्रकटेना,
मन हलके, तृप्त, निवांत अन् धन्य, सार्थ त्या वेणा!

Wednesday, October 20, 2010

थांबावे का?

थेंब थेंब डोळ्यांत साठते,
सुख जन्माचे उरी दाटते,
या घटकेला असे वाटते,
इथेच सगळे संपावे का?

जे लाभे ते भाग्य भोगले,
ते केले, जे कधि न योजले,
किति मैलांचे दगड मोजले,
या वळणावर थांबावे का?

किती ग्रीष्म, किति शिशिर पेलले,
वर्षाघन रंध्रांत झेलले
शारदचांदणभूल खेळले,
इतके येथे गुंतावे का?

फुलासारखे भार वाहिले,
वास्तवातही स्वप्न पाहिले,
अजून किति मुक्काम राहिले?
नकोच आता, थांबावे का?

Sunday, October 10, 2010

जोगवा

दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माउली
गांजती त्रिविध ताप, संताप, व्याप, तू होई साउली ॥

घेउनी कायेची परडी, तुझ्या मी आले ग दारी
चेतवी पोत मनाचा, आई अंबे सत्वर उद्धारी
दीन ही लेक तुझी विनवी येई करुणेच्या पाउली ॥

त्यागुनी तुझी पायरी, सांग कशी जाऊ मी माघारी,
दाह हा तनामनाचा सोसेना, विटले या संसारी
तुझ्या चरणांचे अमृत दे माते, थांबव ही काहिली ॥

नांदती गर्वासुर, दंभासुर, नगरी मलीन ही झाली
मातले षड्रिपु, फिरती अस्त्रे-शस्त्रे परजित भवताली
चंडिका माय भवानी दुष्टांच्या संहारा धावली ॥

तुझी मंगलमय मूर्ती सदैव नांदो माझ्या अंतरी
ज्योत आशिर्वादाची अखंड तेवत राहो मंदिरी
ब्रम्ह तू, माया तू, शक्ती-दुर्गा तू, सकळां पावली ॥