Friday, October 19, 2012

हरवून जाते

भास-आभासात ती तरळून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

रोज होते गूढ, कातर सांज थोडी
घालते काही अनाकलनीय कोडी
उत्तरांआधी मला रडवून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

त्याच गुंत्यातून धूसर रात्र येते
चांदण्यांनी ओंजळी सजवून देते
मात्र जाताना दिशा बदलून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

देशकाराची सुरावट छेडताना
पाखरे स्वच्छंद गगना वेढताना
रंगते प्राची, जुई बहरून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

सूर्य होतो स्वर्णवर्खी लख्ख पाते
तापली मध्यान्ह सारंगात न्हाते
सावलीसाठी उन्हे उजळून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

अन् पुन्हा ती गूढ कातर सांजछाया
लागते स्वर मारव्याचे आळवाया
त्या क्षणी कविता पुन्हा जवळून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

Thursday, October 18, 2012

पाऊस पडतो

पाऊस पडतो 
धारांनी वेढतो 
ओढ लावी जाता जाता 
एकटी गाठतो 
डोळ्यांत दाटतो 
कशी मी सावरू आता ?

येताना दिलेली 
भिजून गेलेली
वचने मागतो सारी
स्वप्नात घेतली
त्याच्या-माझ्यातली
शपथ नेतो माघारी

पाऊस पडतो
जिवाला भिडतो
कोसळतो अतोनात
सागर बेभान
लाटांचं थैमान
किनाऱ्याचा सुटे हात

रानात वनात
तनात मनात
असोशी की हुरहूर
स्वप्न दाखवून
आस जागवून
साजण चालला दूर

पाऊस पडतो
आतून रडतो
लपतो निळ्या तळ्यात
डोळ्यांतून सरी
झरतात तरी
हळवे गाणे गळ्यात 

गोंधळ

आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ 
जळे प्राणांची दिवटी, वाजे श्वासांची संबळ 
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

दहा दिशांचा मंडप, चौक ग्रहांचा मांडला 
सूर्य चंद्र दोन दिवे, घट सागर भरला 
नऊ दिस, नऊ रात्री गर्जे ब्रम्हांड सकळ 
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

गणराया, सरस्वती, रखुमाईचा विठ्ठल
तेहतीस कोटी देवांना ग आवतण दिलं
तुझं आसन मांडलं आई काळजाजवळ
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

माझा जीव कुरवंडी, तुझी काढते ग दीठ
घाल लेकराच्या परडीत कृपा पीठ-मीठ
तुझ्या मायेचा जोगवा देई सोसायाचं बळ
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

देह कवडीमोलाचा, त्याची माळ ही गळ्यात
स्वार्थ, वासना चिंध्यांचा पोत जळतो हातात
आई, करुणेच्या ज्योतीनं या जन्माला उजळ
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये