Sunday, December 22, 2013

वादळ

तो कोसळत रहातो बाहेर,
अखंड, अपरिमित, अनंत, अथांग.
भर दिवसा अंधारून येतं,
खिडकीच्या काचांवर फांद्यांचा बेभान झुलवा,
अंगात वारं आल्यागत!
कडाडत कोसळणाऱ्या बेफाम विजा,
थेट काळजात, राखरांगोळी करत!
काळोखल्या घरांच्या निर्जीव सावल्या,
पिसाटल्या वाऱ्याचं उन्मत्त तांडव.

मीही कोसळत रहाते आतल्याआत
अखंड, अपरिमित, अनंत, अथांग,
त्याच्यासारखीच.
घुसमटत्या भावनांचं गच्च मळभ,
भरकटत्या विचारांची दिशाहीन वावटळ,
अर्थहीन शब्दांचं अनाठायी थैमान,
भिऊन, भिजून थरथरणारं,
काळोखात काळोखाचाच आधार शोधणारं बावरं मन........

आतबाहेर सगळं तेच, तसंच,
फरक एकच 
त्याला ठाऊक आहे तो कोणत्या वादळासाठी कोसळतोय 
आणि मला..............................?

Tuesday, December 3, 2013

दोष

तुझी तीच माझी व्यथाही, कथाही 
सुखे साचला डोह, दु:खे प्रवाही 

जरी मोकळे हास्य सांगे खुशाली 
छुपे मौन बोले निराळेच काही 

रित्या कोटराला लळा लावला मी 
निवारा जपावा, असो तो कसाही 

निराळ्या दिशा दैव देऊन गेले 
दुरावा म्हणे 'हे पुरे सत्य नाही'

किती धोरणी वार होता फुलांचा 
न फांदीस अंदाज आला जराही 

तुला झेलणे चूक माझीच होती
तुझा जीवना दोष नाही तसाही

Thursday, November 21, 2013

चंद्रकळा

दुपारीनं दिलेला जरा जास्तच कोरडा
रखरखीत, पिवळट-पांढुरका रंग पुसत
तिनं उगवतीचे चटक रंग दिले मावळतीला.
जरासा भगवा, चिमुटभर किरमिजी, थोडा सोनेरी पिवळा, बोटभर लाल, कणभर जांभळा अन् इवलासा करडा.
रंगवायच्या नादात जरा जास्तच होत गेला करडा.
नुकतीच घडी मोडलेल्या 
भरजरी पैठणीच्या काठपदरातले रंग
अंगभर डागाळल्यासारखे पसरून तिचं पार पोतेरं करावं 
अवेळी आलेल्या पावसानं, तसं
सगळं चित्रच बिघडत चाललं,
तर तिनं अख्खं आभाळ काळंभोर रंगवलं न् दिली ओंजळभर चंदेरी चमकी उधळून.
पैठणीच्या पोतेर्याचं रंगरूप बदललं
न्
काळीभोर, खडीमाखली चंद्रकळा सजली!

हल्ली ती फक्त चंद्रकळाच मिरवते
कौतुकानं, अभिमानानं ....