Sunday, October 10, 2010

जोगवा

दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माउली
गांजती त्रिविध ताप, संताप, व्याप, तू होई साउली ॥

घेउनी कायेची परडी, तुझ्या मी आले ग दारी
चेतवी पोत मनाचा, आई अंबे सत्वर उद्धारी
दीन ही लेक तुझी विनवी येई करुणेच्या पाउली ॥

त्यागुनी तुझी पायरी, सांग कशी जाऊ मी माघारी,
दाह हा तनामनाचा सोसेना, विटले या संसारी
तुझ्या चरणांचे अमृत दे माते, थांबव ही काहिली ॥

नांदती गर्वासुर, दंभासुर, नगरी मलीन ही झाली
मातले षड्रिपु, फिरती अस्त्रे-शस्त्रे परजित भवताली
चंडिका माय भवानी दुष्टांच्या संहारा धावली ॥

तुझी मंगलमय मूर्ती सदैव नांदो माझ्या अंतरी
ज्योत आशिर्वादाची अखंड तेवत राहो मंदिरी
ब्रम्ह तू, माया तू, शक्ती-दुर्गा तू, सकळां पावली ॥

2 comments:

  1. “नांदती गर्वासुर, .... भवानी दुष्टांच्या संहारा धावली ॥“
    व्वा ! .... फक्त स्वत:साठीच नव्हे तर समाजासाठी देखील मागितलेला हा जोगवा आवडला.

    ReplyDelete
  2. तू ग्रेट आहेस क्रांति. आदिमायेचा एक अंश तुझ्यातही आहे. ज्या ताकदीने तू हे सगळं लिहू शकतेस, त्यासाठी तुलाही दंडवत.

    ReplyDelete