Friday, October 8, 2010

वाढती का अंतरे?

शून्य, भाकड प्रश्न माझा, व्यर्थ त्याची उत्तरे
साधण्या जवळीक जाता, वाढती का अंतरे?

काल वैराची सुपारी, आज मैत्रीचे हसू,
वागणे या जीवनाचे कोणते मानू खरे?

कोण तो? त्याच्या नि माझ्या वेगळ्या होत्या दिशा,
पाडली त्याच्या स्मृतींनी काळजाला का घरे?

मूळ आवृत्ती जशी होती तशी, कोरी, नवी!
वाचता आली कुणाला गूढ त्याची अक्षरे?

लाकडे ओली असो की चंदनी राहो चिता,
शेवटी या चौथर्‍यावर फक्त उरते राख रे!

4 comments:

  1. छान गज़ल आहे..

    ReplyDelete
  2. मूळ आवृत्ती जशी होती तशी, कोरी, नवी!
    वाचता आली कुणाला गूढ त्याची अक्षरे?

    लाकडे ओली असो की चंदनी राहो चिता,
    शेवटी या चौथर्‍यावर फक्त उरते राख रे!

    अगंगं, हे अफलातून लिहीलंयंस तू! आणि ’मूळ आवृत्ती जशी होती तशी, कोरी, नवी!’ हे तर कमाल आहे. ग्रेट आहेस गं तू!

    ReplyDelete
  3. “लाकडे ओली असो की चंदनी राहो चिता,
    शेवटी या चौथर्‍यावर फक्त उरते राख रे!”
    …… मन हेलावून टाकणारी गजल

    ReplyDelete
  4. खरच शेवटच्या दोन ओळी अगदी आत आत भिडतात.
    फारच छान, अप्रतिम.
    शशांक

    ReplyDelete