Saturday, October 22, 2011

हरवून जायचे का?

ये, चांदण्यात थोडे हरवून जायचे का?
झाकोळल्या स्मृतींना उजळून घ्यायचे का?

मागे कधीतरी हे तारे मुठीत होते
साधेच बोलणेही तेव्हा सुनीत होते
डोळ्यांत भावनांचे हळुवार गीत होते
त्या लोपल्या सुरांना मिळवून गायचे का?

स्पर्शात पारिजाताचा मुग्ध भास हळवा
ती तरल स्पंदने अन् प्रत्येक श्वास हळवा
होता परस्परांचा सहवास खास हळवा
तो काळ साद देतो, परतून जायचे का?

भावूक आर्जवांची होती सुरेल गाणी
लाडीक विभ्रमांची ती आगळी कहाणी
आता उरे दुरावा, डोळ्यांत थेंब पाणी
हास्यात आसवांना बदलून द्यायचे का?

सुख पाहिले जरासे, मन मोहरून गेले
तेही क्षणांत दोघांना ठोकरून गेले
वाळूत बांधलेले घर ओसरून गेले
चल, शिंपले स्मृतींचे जमवून न्यायचे का?

[पूर्वप्रकाशन - मोगरा फुलला ई-दिवाळी अंक २०११]

1 comment: