Saturday, October 29, 2011

तुझी आठवण


मनात भरते एक रितेपण
संध्याकाळी तुझी आठवण

तुझी धावती भेट अचानक,
मोहरलेले ते अपुरे क्षण

वरवरचे ते कुशल सांगणे,
उदास तूही, उदास मी पण !

गूज मनीचे मनी राहिले,
कसले ते अधुरे संभाषण ?

निरोप घेता मळभ दाटले
धूसरले क्षितिजाचे अंगण

अवचित येणे, नकळत जाणे
असे जसे वळवाचे शिंपण !

तुझ्याचसाठी कातरवेळी
अजुन बरसतो नयनी श्रावण

हळव्या रात्री चंद्र जागतो
तुझ्या स्मृतींचे घेउन दर्पण !

- क्रांति

[मायबोली हितगुज दिवाळी अंक २०११ इथे पूर्वप्रकाशित]

3 comments:

  1. मनात भरते एक रितेपण
    apratim ...

    ReplyDelete
  2. छान.... अगदी सहज मनाला स्पर्शून गेली ही कविता.
    शेवटच्या दोन ओळी सर्वात मस्त.

    ReplyDelete
  3. वरवरचे ते कुशल सांगणे,
    उदास तूही, उदास मी पण !

    kya baat hai mastach.......

    ReplyDelete