Sunday, March 25, 2012

सख्या आज तरी ये ना रे

मराठी कविता समुहाच्या काव्यछंद - लावणी या उपक्रमासाठी   लावणी रचण्याचा हा माझा पहिलावहिला [नवसाचा] प्रयत्न.  या प्रकारच्या लावणीला बैठकीची लावणी म्हणतात, असं जाणकारांनी सांगितलं. 

मनी रातराणी दरवळे, तरी तळमळे जीव हा सजणा
जशी रात अनावर चढे, जाऊ कुणिकडे सांग मनरमणा
तुझी याद अशी गुलजार, करी बेजार, सोसवेना रे 
सख्या आज तरी ये ना रे

बघ गर्द निळी पैठणी, नार देखणी आज ही नटली
ठुशी, चंद्रहार, गळसरी, सुबक साजिरी अंगठी सजली
तुजवीण सुना शृंगार, जिवाला भार सोसवेना रे
सख्या आज तरी ये ना रे

पदी पैंजण शोभुन दिसे, मेंदीचे ठसे लाल हे भलते
हातात काकणे-चुडे, घडवुनी विडे वाट मी बघते
तुझी प्राणसखी सुकुमार, विरह आजार सोसवेना रे
सख्या आज तरी ये ना रे

कुठे गुंतलास राजसा, येईना कसा अजून दारात
तुझ्या वाटेवर बावरा, जीव घाबरा झुरतो दिनरात
बरसावी शीतल धार, उरी अंगार सोसवेना रे
सख्या आज तरी ये ना रे

3 comments:

  1. तुझ्या वाटेवर बावरा ....अंगार सोसवेना रे ..हे विशेष आवडले ... खूप छान चाल लागू शकते ह्या लावणीला ... सुंदर शब्द आहेत...!! त्या दिशेने प्रयत्न झाल्यास खूप बर होईल ...

    ReplyDelete