Monday, March 26, 2012

म्हणावे कशाला ?

झुगारून वैशाख आषाढगाणे म्हणावे कशाला ?
झरे मेघ तेव्हा उन्हाचे तराणे म्हणावे कशाला ?

कुणी बद्द वाजे, कुणी चेपलेले, कुणी गंजलेले
मला सांग आता, खरे चोख नाणे म्हणावे कशाला ?

खरी प्रीत सर्वस्व देण्यात आहे असे जाणुनी जे
जिवा जीव देती, अशांना दिवाणे म्हणावे कशाला ?

कधी सूर नाही जरी लागले, गीत का थांबवावे ?
मनाने म्हणावे, सुरांच्या प्रमाणे म्हणावे कशाला ?

खुळ्यांचाच बाजार आहे जगी, थोर सांगून गेले
असावे खरे ते, स्वत:ला शहाणे म्हणावे कशाला ?

जशी येत जाती, तशी सोडवावीत आयुष्यकोडी
'उगा ईश्वरा घालसी का उखाणे' म्हणावे कशाला ?

इथे गुंतला जीव का एवढा, ही घडीची सराई
प्रवासात आयुष्य जाते, रहाणे म्हणावे कशाला ? 
 

No comments:

Post a Comment