Monday, April 23, 2012

आडनिडा गाव



जन्म सरू आला, संपली ना धावाधाव 
अजूनही दूर त्याचा आडनिडा गाव 

अनवाणी पावलांना वैशाखाची झळ
अतोनात छळणारी काळजाची कळ
पळसाच्या आगेमागे बाभळीचे फाटे
काट्यांतून चालले की माझ्यातच काटे?
मैलोगणती वस्तीचा नाही काही ठाव
अजूनही दूर त्याचा आडनिडा गाव

सरली ना वाट जरी दुपार सरली
चोरपावलांनी सांज वनात शिरली
थकून थांबले आभाळात घोडे साती
हळूहळू पायांखाली थंडावली माती
पार ना आडोसा, कुठं टाकावा पडाव?
अजूनही दूर त्याचा आडनिडा गाव

वाटेवर कोणी चिटपाखरू फिरेना
रात किर्र अंधाराची सरता सरेना
पिसाट सावल्या, रातकिड्यांचा कल्लोळ
मन सैरभैर जसं उठावं मोहोळ
थरकाप होतो, कसा लागावा निभाव?
अजूनही दूर त्याचा आडनिडा गाव

आता थकली पाउले, जडावला जीव
मंदावत जाती श्वास, देही भरे हीव
मिट्ट काळोखाचं रान आत-बाहेरून
राही अजगरापरी आयुष्य घेरून
सरड्याची कुठे कुंपणाच्या पुढे धाव?
अजूनही दूर त्याचा आडनिडा गाव


Friday, April 20, 2012

जमाखर्च

हवेसे वाटणारे बंध फासासारखे झाले 
दिल्याने घेतल्याने शब्द बाणासारखे झाले 


तुला बोलायचे होते, मला ऐकायचे होते
कसा संवाद, जेव्हा मौन वादासारखे झाले ?

दिली माझी फुले अन् घेतले काटे तुझे थोडे
मिळो काही, जमा अन् खर्च आता सारखे झाले

कुठे मुक्काम त्याचा आणि तो जाई कुण्या गावा,
पुरे आयुष्य त्या वेड्या प्रवाशासारखे झाले

गुन्हा काहीतरी मोठाच मी केला, कळे तेव्हा
सग्यांचे वागणे जेव्हा लवादासारखे झाले

उन्हाळा पावसाचा अन् हिवाळा ताप देणारा
ऋतू हल्ली तुझ्या-माझ्या स्वभावासारखे झाले !

Saturday, April 14, 2012

पेच


प्रश्न ते साधेच होते
उत्तरांना पेच होते 

वेदना होती नवी अन 
घावही ताजेच होते 

नाव नात्याचे निराळे, 
जोडणारे तेच होते 

प्राक्तनाचे गारद्यांशी
बोलणे झालेच होते

काळजी आतून कोठे?
फक्त देखावेच होते

दु:ख त्याच्या सांत्वनाला
नेमके माझेच होते 

Friday, April 13, 2012

विरामचिन्हे

नेहमीच 
तिच्या बोलक्या डोळ्यांत उद्गारचिन्हं 
भाव भिन्न भिन्न
नवलाई, आनंद, कौतूक, 
भीती, वेदना, त्रागा 
सगळं काही उच्चाराविना उद्गारणारी 
उद्गारचिन्हं !!!

तिच्या बंद ओठांवरच्या अवतरणचिन्हांत
कायमच वसलेलं गूढसं मौन
आणि तिचे शब्द त्या भक्कम कवाडाच्या आत अडकलेले
जन्मठेपेचे कैदी
" "

चुकून एखादा शब्द ओठांबाहेर आलाच
तर त्याच्यापुढे अपरिहार्यपणे धावणारं
अपसरणचिन्ह ...................................
तिचं अपुरेपण सिद्ध करायला सिद्ध............

अर्ध ; स्वल्प , अपूर्ण :
विरामांना तिच्या आयुष्यात स्थानच नाही
हवाय कशाला तिला विराम?
विरेल तेव्हा पाहू ; , :

हो, पूर्णविराम मात्र आहे
भाळावरच्या गोंदणटिकलीत.
'बस, सगळं संपलं इथे, सुरू होण्याआधीच.'
ही नियतीच्या लेखाची इतिश्री दाखवणारा.

संयोगचिन्हे -
तिला ठाउकच नाहीत
संयोग नामक काही संकल्पना अस्तित्वात तरी आहे?
यदाकदाचित असलीच, तर भ्रामक असावी - बहुधा नसावीच.

आता उरलं काय?
अरे हो, प्रश्नचिन्ह राहिलंच ना ...........
ते तर तिच्या पाचवीच्याही बरंच आधी पुजलेलं
तिच्या गर्भातल्या अस्तित्वापासून
तिची सोबत करणारं
हो की नाही?????????????

Thursday, April 12, 2012

तुझी आठवण येते

तुझी आठवण येते सांज घुटमळताना 
तुझ्या वाटेत पाउल पुन्हा पुन्हा वळताना
तुझी आठवण येते मनपाखी उडताना
केशराच्या सागरात सूर्यबिंब बुडताना

तुझी आठवण येते रात दरवळताना
स्वप्न जागे होते 
नीज पापणीत ढळताना
तुझी आठवण येते चंद्र मेघी दडताना
वाट रोजचीच तरी चाल माझी अडताना

तुझी आठवण येते जीव तळमळताना
आसवांच्या सागरात जन्म विरघळताना
तुझी आठवण येते तुला उलगडताना
माझे दबलेले सूर, तुझ्या अवघड ताना 

डाव आता संपला'

चालले येथून आता, आवरावी स्पंदने 
सोडवावी बंधने 
जायचे वाटेवरी ज्या, ती कुठे, आहे कशी?
का करावी चौकशी?

न्यायला येईल त्याला काळजी आहे पुरी
न्यायचे कोण्या घरी
या प्रवासाला न काही सोबतीला न्यायचे
सर्व काही द्यायचे

बंद होती मूठ आले त्या क्षणी, आता खुली
संपण्याच्या चाहुली
मी समाधानी तरी, जे लाभले होते भले
जे बुरे, ते त्यागले

खंत नाही, खेद नाही, ना मनी अस्वस्थता
या घराला सोडता
एक आहे मागणे, सोडून दे झाल्या चुका
त्या सवे येतील का?

आणि माघारी नको माझ्या सयींची पालखी
मर्मबंधासारखी
'नीघ आता, सोड सारे बंध' सांगे तो मला
'डाव आता संपला'


Monday, April 9, 2012

पूर्णत्वाचे लाभे दान

अर्ध्या रात्री कानी घुमली आतुरल्या चंद्राची साद 
'आज मंदिरी येइल दैवत, तू हाकेला दे प्रतिसाद' 

अर्ध्या रात्री कानी घुमली गूढ गहन, लाटांची गाज 
'त्या विभुतीला सामोरी जा शब्द-सुरांचे लेवुन साज'

अर्ध्या रात्री कानी घुमला राउळातला घंटानाद
'स्वत्व अर्पुनी त्या चरणांवर उधळुन दे सारा उन्माद'

अर्ध्या रात्री कानी घुमली कदंबपर्णांची कुजबूज
'स्वरतरंग ते अंतरात जप, ज्या स्वरांत घुमते अलगूज'

अर्ध्या रात्री अर्धी निद्रा, अर्ध जागृती, अर्धे भान
वेढुनि देहा कालिंदीजळ, तृप्त चित्त अन मोहित प्राण

अर्ध्या रात्री अर्धोन्मीलित नेत्रांपुढती सुंदर ध्यान
दर्शनमात्रे या अधुरीला पूर्णत्वाचे लाभे दान

Wednesday, April 4, 2012

हसावे कसे


उगा व्यथित व्हायचे फिरुन मोकळे व्हायचे 
पुन्हा करुण सावल्या बघत चांदणे प्यायचे 
सरीवर सरी उरी तरिहि कोरड्या पापण्या 
बळेच हसुनी उदासपण सारुनी द्यायचे

कुठे अटळ वासना, विफल भावना गांजती
अशांत हृदयी कुठून उठती तरंगाकृती
भकास वळणावरून फिरता कधी एकटे
कितीक फसवी अबोध वचने दिशा घेरती

मनात कुठला विचार तरळे लुळापांगळा
कसा उतरवू, कुठून मिटवू व्यथेच्या कळा
इथे बदलती क्षणात सगळे सखेसोबती
कुणी न सहजी सवे तुडविती उन्हाच्या झळा

हलाहल कुणी किती पचविले, न येई नशा
जरी समजते, तरी कुणि न त्यागिते या विषा
नसे क्षणिक ही, अनंत मरणांतुनी येतसे
फिरून जगण्यास बाध्य करते विषाची तृषा

अभंग मनिषा पुन्हा सुचविते जगावे कसे
सुकून गळली फुले शिकविती फुलावे कसे
हसून म्हणती उदास हृदयातली स्पंदने
'चला, समजले व्यथा विसरुनी हसावे कसे'

बुद्धीबळ


'सफेद-काळ्या चौकटीत तू एक-एक पाऊल पुढे जा' कुणी म्हणाले 
हुकूम त्याचा मानुन मीही डोळ्यांवरती झापड बांधुन पुढे निघाले 

कुणी मुसंडी पुढे मारली चाल चालुनी तिरकी, दुडकी, भलती-सलती 
कुणी अचानक नियम तोडले, वचन मोडले, मार्ग सोडले, चढले वरती 

कुणी कुणाला कुठे दिले शह, कुणी कुणाची घरे हडपली कुण्या पटावर 
कधी न झापड दूर करुन मी लक्ष घातले, काढले न वा कधी अवाक्षर 

मुकाट माझी चाल चालले, एक एक पाऊल टाकले जपुन स्वत:ला
कुणी कातडीबचाव म्हणती, कुणी म्हणे स्वार्थी, मी पर्वा करू कशाला?

किती विचारी, किती संयमी, स्थितप्रज्ञ मी, गुलामीतही निवांत होते
घडून गेली महाभारते, अधर्मयुद्धे किती तरी स्तब्ध, शांत होते

चिडून सारे सैन्य उधळले, कुणी कुणाचे शस्त्र ओढले, कुणी झिंगले
अखेरचा तो निर्णायक क्षण, बेसावध राजाला उडवुन मीच जिंकले! 

पाहिजे आता


तुटे फांदी, पडे खोपा, उडाया पाहिजे आता 
नवा मुक्काम शोधाया निघाया पाहिजे आता 

तुला चालेल ते केले, तुला सोसेल ते केले 
मला भावेलसे काही कराया पाहिजे आता 

दिशा झाकोळल्या दाही, भिडे काळोख प्राणांना 
उजेडाला चिता माझी जळाया पाहिजे आता 

तुला मी शोधले, माझ्यात तू आहेस आयुष्या
मला माझा ठिकाणाही कळाया पाहिजे आता

नकोशा वेदनांनी केवढी समृद्ध मी झाले,
हवासा घाव एखादा मिळाया पाहिजे आता

तसा मी एकदा त्याचा उबारा भोगला होता,
पुन्हा गर्भात मातीच्या रुजाया पाहिजे आता

स्मृतींची कोवळी पाने, कळ्या गर्भार स्वप्नांच्या
असे काहीतरी मागे उराया पाहिजे आता